Friday, December 5, 2014

द ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी : दिल ढूँढता है!

सौंदर्य हे एक अजब रसायन आहे. (आणि सौंदर्याचा आस्वाद ही एक अजब रसनिष्पत्ती आहे!) मुळात सौंदर्य म्हणजे नक्की काय यावर आणि त्याच्या आजूबाजूच्या अनेक अंगांवर सौंदर्यमीमांसेच्या क्षेत्रात तात्त्विक दृष्टीने घणाघाती चर्चा होत असते. यात सौदर्याबरोबरच 'कला म्हणजे काय?' याचाही अंतर्भाव होतो. संकल्पना, अनुभव आणि सामाजिक संदर्भ या सर्व बाजूंनी एक मूलगामी शोध म्हणून अशा विषयांचं महत्त्व आहेच. पण कधीकधी मात्र पुलंच्या 'एक नवे सौंदर्यवाचक विधान' या लेखातील पात्राच्या (म्हणजे 'मी'च्या) धर्तीवर सौंदर्याचे काही खुलासे करायचा मोह होतो. यातला 'मी' मित्राशी बोलताना चहाच्या भांड्यात साखर टाकता टाकता 'सौंदर्य म्हणजे….' म्हणत कॉलेजातील काही मुलींचा उल्लेख करतो. तसंच मला,  अगदी व्यक्तीकेंद्री होत,  'सौंदर्य म्हणजे मेरिल स्ट्रीप' असं विधान धाडकन करावसं वाटतं! 

मेरिल स्ट्रीप आठवायचं कारण म्हणजे 'द ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी'. क्लिंट ईस्टवूड या हॉलीवुडमधल्या नामांकित दिग्दर्शक, अभिनेता, निर्मात्याचा १९९५ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट. या चित्रपटाचा (एक) निर्माता, दिग्दर्शक आणि नायक तोच आहे. रॉबर्ट वॉलर या लेखकाच्या याच नावाच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट एका अमेरिकन गृहिणीच्या चार दिवसांच्या प्रेमानुभवाची ('अफ़ेअर'साठी हा शब्द कसा वाटतो?) कथा सांगतो. 

चित्रपट सुरू होतो तो फ्रँचेस्का जॉन्सन (मेरिल स्ट्रीप) हिच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर. तिच्या मृत्यूनंतर तिच्या इस्टेटीबाबतचे निर्णय घ्यायला तिची मुलं (मुलगा मायकेल, मुलगी कॅरोलिन) तिच्या घरी आलेले आहेत. फ्रांसेस्काच्या एका जुन्या पेटीत कॅरोलिनला काही गोष्टी सापडतात. या गोष्टींमधून दोघांनाही आपल्या आईच्या भूतकाळातील एक गोष्ट उलगडत जाते. ही गोष्ट म्हणजेच 'द ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी' हा चित्रपट. 

आयोवा राज्यातील 'मॅडिसन काऊंटी'मध्ये राहणारं एक कुटुंब. नवरा-बायको आणि त्यांची दोन मुलं. नवरा आणि दोन्ही मुलं चार दिवसांसाठी बाहेरगावी गेले असताना फ्रांसेस्का जॉन्सनला रॉबर्ट किनकेड (क्लिंट ईस्टवूड) हा नॅशनल जिऑग्राफिकमध्ये काम करणारा छायाचित्रकार भेटतो. तो इथले प्रसिद्ध पूल बघायला आणि त्यांचे फोटो घ्यायला आला आहे. पत्ता विचारायला आलेल्या रॉबर्टला फ्रँचेस्का एक पूल दाखवायला घेऊन जाते आणि दोघांची मैत्री होते. मैत्री पुढे सरकते आणि दोघांनाही 'देअर इज समथिंग बिटवीन अस' ही जाणीव होते. प्रेम पुढे जातंच, पण हे दोघं अखेरीस मागे होतात आणि गोष्ट तिथेच संपते. 

चित्रपटाची कथा घडते ती १९६५ मध्ये. लग्नसंस्था आज जितकी भक्कम आहे त्यापेक्षा पुष्कळ अधिक भक्कम असलेला हा काळ आहे. खरं सांगायचं तर फ्रँचेस्काला रॉबर्टबद्दल जे वाटतं ते त्या काळातील एका गृहिणीला इतक्या सहजी वाटेल का आणि वाटलं तरी ती ते प्रत्यक्षात आणेल का असा प्रश्न चित्रपट बघताना कदाचित काहीजणांना पडू शकेल, पण फ्रँचेस्कामध्ये क्रमाक्रमाने होत जाणारे बदल, तिचं रॉबर्टविषयीचं वाढतं आकर्षण हाच चित्रपटातला रोचक धागा आहे आणि मेरिल स्ट्रीपने या भूमिकेला जे रंगवलं आहे ते विलक्षण प्रभावी आहे. दोन तासात मांडलेली प्रेमकथा आवडण्यासाठीचा जो एक महत्त्वाचा निकष असतो तो म्हणजे ते प्रेम प्रेक्षकाला 'कन्व्हिंसिंग' वाटायला लागतं, किंबहुना हे घडायलाच हवं आता' असं जेव्हा प्रेक्षकाला त्या व्यक्तिरेखांबाबत आतून वाटायला लागतं तेव्हा ती प्रेमकथा त्याच्यापर्यंत पोचलेली असते. हे कन्व्हिन्स करण्यासाठी दोघे अभिनेते ताकदीचे लागतात आणि इथे तर दोघे पॉवरहाऊस परफॉरमर्स आहेत! त्यामुळे या दोघांच्या बाबतीत ते पुरेपूर घडतं.

चित्रपटात दोघांचं मानसिक पातळीवर जसं नातं तयार होतं तसंच ते शारीर पातळीवरही होतं. यातला शारीर पातळीवरचा संबंध दिग्दर्शकाने फार परिणामकारकपणे चित्रित केला आहे. शारीरिक जवळीक दाखवताना त्या दोघांचं एकमेकातलं 'रमलेपण' जेव्हा प्रेक्षकापर्यंत पोचतं तेव्हा त्यातील सौंदर्याचा अनुभव लालसेचं कुंपण ओलांडणारा, काही वेगळाच असतो. 

फ्रँचेस्का आणि रॉबर्ट दोघेही आपल्या प्रेमाला इच्छित मुक्कामी नेत नाहीत आणि परत फिरुन आपलं पहिलं आयुष्य जगू लागतात तेव्हा 'इथे काही वेगळं घडू शकलं असतं का?' असा प्रश्न पडतो. पण एक सर्वसामान्य संसारी स्त्री आणि एक सर्वसामान्य मुक्त पुरुष यांची ही कथा प्रेमाची आहे आणि बंधनाचीही आहे. लग्नानंतर काही वर्षांनी कुणीतरी दुसरं माणूस आवडतंय हे मोकळेपणाने एकमेकांना सांगता यावं अशी माझी कल्पना आहे. यातून जे उद्भवू शकतं ते निभावून नेण्यासाठी भावनिक आणि बौद्धिक ताकद लागते हे खरं आहे. पण प्रेमासारख्या निखळ, सच्च्या भावनेला दडपून टाकून तरी आपण कुठे जातो असा प्रश्न पडतो. माणसाचं सामर्थ्य हे त्याच्या व्यवस्थानिर्मितीच्या कौशल्यात, अनेक अवघड गोष्टी 'पेलण्यात' आहे, पण बहुधा आपल्याला आपण निर्माण केलेल्या व्यवस्थेच्या ओझ्यामुळे प्रेम मात्र सहजासहजी 'पेलत' नाही हे खरं! त्यामुळे अशी एखादी कथा चटका लावून जाते. अर्थात 'प्रेमाच्या नियोजना' बद्दल स्वतंत्रपणे विचार होऊ शकेल, त्यामुळे सध्या फक्त आस्वादकाच्या भूमिकेतून  फ्रांसेस्का आणि रॉबर्टकडे बघत 'चीअर्स' म्हणूया!  

(दिव्य मराठी, मधुरिमा)

Friday, November 7, 2014

आँखों देखी : सत्याचं थेट प्रक्षेपण

'आँखों देखी' हा याच वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट. फारसा कुणाला माहीत असेल असं वाटत नाही. चित्रपटगृहातही त्याचा मुक्काम थोडेच दिवस होता. रजत कपूरचा चित्रपट म्हणून त्याची नोंद मी घेतली होती, पण तो बघितला गेला नव्हता. गेल्या महिन्यात तो पाहिला आणि 'शिप ऑफ थिसियस'नंतर आत्मशोधाच्या प्रक्रियेची मांडणी करणारा आणखी एक अप्रतिम चित्रपट पाहिल्याचं समाधान मिळालं. 

रजत कपूर हा हिंदीमध्ये ज्याची आवर्जून नोंद घ्यावी असा दिग्दर्शक. 'मिक्स्ड डबल्स' आणि 'मिथ्या' मुळे चांगलाच लक्षात राहिलेला. 'आँखों देखी' मात्र त्याचा मास्टरपीस म्हणावा असा चित्रपट. इतक्या घट्ट विणीचे चित्रपट क्वचितच बघायला मिळतात. आणि इतक्या खोल जाणारेही. 

दिल्लीतल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाची ही कथा आहे आणि त्या कुटुंबातल्या सर्वात ज्येष्ठ, साधारण पन्नाशीतल्या पुरुषाचा हा 'आत्मशोध' आहे. एकत्र कुटुंबव्यवस्था महत्त्वाची मानणारा हा एक सरळ, मध्यमवर्गीय गृहस्थ. बायको, एक मुलगी, एक मुलगा असं त्याचं कुटुंब. धाकटा भाऊ, त्याची बायको, एक मुलगा असं दुसरं कुटुंब. सगळ्यांचं एकत्र जगणं रीतसर सुरु आहे. आखून दिलेल्या वाटेवरून प्रत्येकजण चालतोय. मात्र एके दिवशी आपल्या कथानायकाला एक जाणीव होते. ती जाणीव आहे सत्याच्या प्रचलित, 'बळजबरीच्या' अस्तित्वाची आणि त्याला छेद देणाऱ्या त्याच्या स्वतःच्या सत्यशोधनाच्या ऊर्मीची. आपण दुसऱ्यांनी सांगितलेल्या कशावरही विश्वास ठेवतो आणि आपली मतं बनवतो, आपल्या डोक्यात हजारो कल्पना कोंबल्या जातात हे त्याला टोचू लागतं. वस्तू हातातून पडली की ती खालीच का पडते याचं सर्वमान्य उत्तर 'गुरुत्वाकर्षण' हे आहे, पण याचं 'माझं' उत्तर काय असायला हवं? - 'वस्तू हातातून सोडली की ती खाली पडते हे सत्य आहे, कारण ते मी बघतो, पण ती खालीच का पडते हे मला माहीत नाही' हे! मंदिरात मिळतो त्याला 'प्रसाद' म्हणतात, पण वस्तुतः तो एक गोड पदार्थ असतो. मला जर तो 'एक गोड पदार्थ' म्हणूनच अनुभवास येतो तर त्याला मी 'प्रसाद' का म्हणू? त्याचं हे तर्कशास्त्र आसपासच्या लोकांना त्याच्याकडे आकर्षित करतं. हा कुणीतरी 'ज्ञानी' माणूस आहे असं त्यांना वाटू लागतं. मात्र तो कुठलंही 'गुरू'पद स्वीकारायचं नाकारतो. मी पाटी कोरी करून नव्याने सगळीकडे पाहतो आहे, 'माझं सत्य' शोधतो आहे, तुम्ही तुमचं शोधा असा त्याचा त्यांना आग्रह असतो.  

त्याच्या सत्यशोधनाचा प्रवास चित्रपटात छोट्या-छोट्या, जिवंत प्रसंगांतून, संवादांतून उलगडत जातो. या प्रवासाला चित्रपटात प्रमुख पार्श्वभूमी आहे ती त्याच्या मुलीच्या लग्नाची. मुलीच्या प्रेमप्रकरणाच्या संबंधाने चित्रपट सुरु होतो आणि तिच्या लग्नापाशी संपतो. तिचं प्रेम, लग्न ठरेपर्यंतच्या घटना, लग्नाची गडबड याच्या पार्श्वभूमीवर त्याचा आंतरिक प्रवास सुरु राहतो आणि तो आपल्याला चांगलाच गुंतवून ठेवतो. हा त्याचा आंतरिक प्रवास शेवटी त्याला एका मुक्कामाला नेतो, पण ते प्रत्यक्ष पाहणंच इष्ट. (चित्रपटाची डीव्हीडी फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. बाजारातही असावी.)   

चित्रपटातील फ्रेम्स अतिशय जिवंत आहेत. पात्रांची निवड, त्यांचा अभिनय याला विशेष दाद द्यायला हवी. दिल्लीतल्या त्या घरात कॅमेरा लावून ठेवला आहे असं वाटावं इतकं सगळं सहज आहे. कथानायकाचा आत्मशोध आणि इतरजणांचं 'रुटीन', त्यांचं ऐहिकातलं जगणं याची रोचक सांगड घालण्यात रजत कपूर यशस्वी झाला आहे. एक उल्लेख करावाच लागेल तो चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखांचा. 'आदर्श हिंदू' कुटुंबातल्या या आदर्श स्त्रिया आहेत. सतत घरातल्या कुठल्या ना कुठल्या कामात गर्क असलेल्या, नवऱ्याला सकाळी डबा करुन ऑफिसला पाठवणाऱ्या, त्याची न्याहारी होईपर्यंत हातात पाण्याचा ग्लास धरून उभ्या असलेल्या, वटसावित्रीला वडाला फेऱ्या मारणाऱ्या, नवऱ्याच्या मित्रमंडळाला चहा करुन देणाऱ्या स्त्रिया. चित्रपटात कथानायकाच्या मानसिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्याची बायको, मुलगी, त्याच्या भावाची बायको यांचं असं संसारात 'लुप्त' झालेलं दर्शन ठसठशीतपणे समोर येतं. कुठलाही मूल्यसंघर्ष, संरचनात्मक संघर्ष उपस्थित न करता, लग्न-कुटुंब ही कार्यात्मक (फंक्शनल) व्यवस्था आहे आणि ती जपायला हवी या विचाराने, 'श्रमविभागणी' या दृष्टीने कामात असणाऱ्या या स्त्रिया बघताना मला काहीतरी वेगळं वाटत होतं. काय ते सांगता येत नाही, पण मौज वाटत होती. माझ्या स्त्रीवादी दृष्टीकोनातला एक कोन प्रश्नांकित रुपात वर आल्यासारखं काहीतरी. असो. 

'प्रश्न विचारणारे' चित्रपट फार कमी असतात. 'आँखों देखी' असा चित्रपट आहे. रजत कपूरने चित्रपट लिहिताना आणि दिग्दर्शित करताना तात्विक आणि आधिभौतिक दोघांची उत्तम जोड दिली आहे. संजय मिश्रा याचा मुख्य भूमिकेतला अभिनय लाजवाब. जी कलाकृती स्वतः प्रश्न विचारते, तुम्हाला प्रश्नात टाकते, तुमच्या आकलनाचं पेज 'रिफ्रेश' करायला लावते तिचं स्थान वेगळं असतं. 'आँखों देखी' असा अनुभव देतो. 'मी कोण आहे?' हा माणसाला पडलेला पुरातन प्रश्न आहे, पण 'सत्य काय आहे?' हा मला एक 'उत्क्रांत झालेला' प्रश्न वाटतो. या प्रश्नाचा आपल्या परीने शोध घेणाऱ्याची ही कथा आवर्जून बघावी अशी आहे. माध्यमांचा, माहितीचा भडिमार होत असताना शांतपणे, प्रत्यक्ष अनुभवाला प्राधान्य देत आपल्या धारणा नक्की करणं गरजेचं झालेल्या अस्वस्थ वर्तमानात तर हा चित्रपट फारच सुसंगत ठरतो!

(दिव्य मराठी, मधुरिमा)

Saturday, September 6, 2014

ओ कॅप्टन! माय कॅप्टन!

रॉबिन विल्यम्स ही काय जादू आहे ते पहिल्यांदा कळलं 'मिसेस डाऊटफायर'मुळे. त्यावेळी 'इंग्लिश पिक्चर' या सदरात प्रामुख्याने अर्नोल्ड श्वार्झनेगर नावाच्या एका महाकाय प्रकरणाचा अंतर्भाव होत असे. आम्ही त्याच्याकडे दिपून गेल्यासारखे बघत होतो आणि त्याच्या दंडांची मापे इतरांना सांगण्यात धन्यता मानत होतो. कमांडो, टर्मिनेटर, ट्रू लाईज वगैरेंनी मनावर गारूड केलं होतं. अर्नोल्ड श्वार्झनेगर हा 'इंग्लिश पिक्चर'मधला अंतिम शब्द होता. अशा उन्मनी अवस्थेत असताना 'मिसेस डाऊटफायर' आला. १९९३ मध्ये. तो बघितला गेला त्यानंतर काही वर्षांनी. तोपर्यंत 'अभिनय म्हणजे काय?' या विषयात थोडी प्रगती झाली होती आणि म्हणूनच मग 'मिसेस डाऊटफायर' या एका चित्रपटातून रॉबिन विल्यम्सने कब्जा घेतला. 

चित्रपटाची सुरुवात होते ती एका स्टुडिओत. स्क्रीनवरच्या अ‍ॅनिमेटेड पक्ष्यांना रॉबिन विल्यम्स आपला आवाज देतोय. एका क्षणी त्याचा तिथल्या संयोजकाशी खटका उडतो आणि तो हेडफोन तिथेच टाकून बाहेर पडतो. पण संयोजकाशी बोलत  बाहेर पडताना पाचच सेकंदासाठी बेन किंग्जलेच्या 'गांधी'ची हुबेहूब आवाजात जी लाजवाब नक्कल तो करतो त्याने मी अवाक झालो होतो. आवाजावर कमालीची हुकूमत असणारा हा अभिनेता खराखुरा बहुरूपी आहे हे पुढे चित्रपटातून दिसलंच आणि रॉबिन विल्यम्स आवडता झाला!

आपल्याकडे 'मिसेस डाऊटफायर' अधिक माहीत झाला तो या चित्रपटावर बेतलेल्या कमल हसनच्या चाची ४२० मुळे. (चाची ४२० ला मूळ चित्रपटाची सर नाही हे सांगायला हरकत नसावी.) व्हॉईस आर्टिस्ट असणारा डॅनियल हिलार्ड (रॉबिन विल्यम्स),  मोठ्या पगाराची नोकरी करणारी त्याची बायको मिरांडा (सॅली फील्ड) आणि त्यांची तीन मुलं. नवऱ्याच्या कलेबद्दल कौतुक असणारी पण त्याच्या मनस्वीपणाचा त्रासही होणारी मिरांडा अखेरीस घटस्फोटाचा निर्णय घेते आणि डॅनियल मुलांपासून वेगळा होतो. वेगळं घर घेऊन राहू लागतो. मिरांडा मुलांसाठी 'बेबीसिटर' शोधते आहे हे कळल्यावर तो स्वतः स्त्रीवेषात तिच्याकडे जातो आणि आपल्या लाघवी स्वभावाने, घरकामातील कौशल्याने आणि मुख्य म्हणजे मुलांशी जमवून घेण्याने मिरांडाचं मन जिंकून घेतो. पुढे मग यथावकाश सगळा उलगडा होतो आणि कथा एका वळणापाशी संपते.           

'मिसेस डाऊटफायर' हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा चित्रपट. कथेचं वेगळेपण आणि रॉबिन विल्यम्सचा कमाल अभिनय हे तर होतंच, पण कुटुंबाच्या सरधोपट व्याख्येला आणि बाप हा एक कडक, रागीट, आपल्या मुलांमध्ये कमीत कमी रस घेणारा शिस्तबद्ध पुरूष असला पाहिजे या गृहीतकाला या चित्रपटाने तडा दिला. मुलांमध्ये मूल होऊन मिसळणारा हा बाप बघताना पुलंचे 'चितळे मास्तर' आठवले आणि हे दोघेही मायनॉरिटीमध्ये आहेत हे जाणवलं. रॉबिन विल्यम्सने साकारलेला डॅनियल हिलार्ड हा खरंच बापमाणूस होता! विशेष म्हणजे त्याच्यातला प्रेमळ बाप दाखवताना तो नवरा म्हणून सद्गुणांचा पुतळा आहे असं दाखवायचा अट्टाहास हा चित्रपट करत नाही. त्याचं आणि मिरांडाचं नातं एका क्षणी तुटतं तेव्हा तिची बाजूही आपल्याला कळत असते. कलंदर वृत्तीचा कलाकार नवरा आणि व्यवहारात पाय घट्ट रोवून उभी असलेली बायको बघताना आपली सहानुभूती दोघांनाही जाते. आणखी एक विशेष म्हणजे चित्रपट सकारात्मक रीतीने संपतो पण तो '…आणि मग ते दोघे पुन्हा एकत्र आले व सुखाने नांदू लागले' छापाने नव्हे. दोघांचा घटस्फोट कायमच राहतो, फक्त डॅनियलला आता स्त्रीवेषात 'मिसेस डाऊटफायर' बनून बायकोच्या घरी जाऊन मुलांना सांभाळायचं नसतं. आपली मुलं वडिलांपासून दूर राहू शकत नाहीत हे मिरांडाला उमगलेलं असतं आणि म्हणून ती मुलांचा नवीन बेबीसिटर म्हणून डॅनियलला बोलावते. कुटुंब या महत्त्वाच्या संस्थेला धक्का न लावता, फक्त आई-बाबा-मुलं म्हणजेच कुटुंब असं नाही, कुटुंबाचे विविध प्रकार असू शकतात आणि सर्व प्रकारात समजुतीने निर्णय घेऊन, प्रसंगी एकमेकांपासून दूर होऊन माणसं आनंदात राहू शकतात हा एक महत्त्वाचा विचार ही चित्रपट अधोरेखित करतो.

चित्रपटातील विविध प्रसंगातील बारकावे बरेच सांगता येतील. पण मला आत्ता अर्थातच सारखा आठवतोय तो रॉबिन विल्यम्स. या अभिनेत्याने टाकलेला प्रभाव अद्वितीय आहे. माणसातला निखळपणा, मूलपणा, प्रेमळपणा त्याने आपल्या भूमिकांमधून जिवंत केला. मिरांडाने घटस्फोट मागितल्यावर आणि मुलांना आपल्यापासून वेगळं करण्यात येतंय हे समजल्यावर अतीव कळवळलेल्या डॅनियलचा चेहरा अजूनही नजरेसमोर आहे. आणि त्याच डॅनियलचा मुलांबरोबर असतानाचा आनंदलेला चेहराही. ‘डेड पोएट्स सोसायटी’ मधला त्याने साकारलेला कवी प्राध्यापक विसरणं अशक्य आहे. डिस्नेच्या 'अल्लादीन' मधल्या जीनीचा अफलातून व्हॉईस ओव्हर त्याचाच. रॉबिन विल्यम्सने आत्महत्या केली याचा धक्का तर बसलाच. पण नंतर असं वाटलं की यात खरं तर नवल नाही. तो बहुधा 'टोकांवर जगणारा'च माणूस होता. अनेक मनस्वी कलाकारांसारखा. त्यांना अनुभवाचीच ओढ असते. त्यामुळे मृत्यूच्याही अनुभवाची ओढ त्यांना नाही वाटणार तर कुणाला?            

(दिव्य मराठी, मधुरिमा)

Friday, August 8, 2014

एक रूका हुआ फैसला - न्यायाचा अंतःस्वर

छोटी सी बात, रजनीगंधा, खट्टा-मीठा, चितचोर, पिया का घर (हा चित्रपट म्हणजे आपल्या 'मुंबईचा जावई' या राजा ठाकूर दिग्दर्शित चित्रपटाचा रीमेक) ही सत्तरीतल्या काही चित्रपटांची नावं घेतली की मनात एका साध्या-सरळ आनंदाचा गहिवर दाटून येतो. तुमच्या-माझ्यासारख्या प्रत्येकाची, त्याच्या/तिच्या कुटुंबाची कथा किंवा कथेचा एखादा तुकडा दिसेल असे हे चित्रपट आणि त्यातील व्यक्तिरेखा. बासु चॅटर्जी यांनी सांगितलेल्या या गोष्टी अनेकांना आपल्या वाटल्या आणि त्यांच्या चित्रपटांचा एक मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. पुढे बासु चॅटर्जींनी 'रजनी' आणि 'ब्योमकेश बक्षी' या लोकप्रिय मालिकांचंही दिग्दर्शन केलं. त्यांचे काही निवडक चित्रपट मात्र चांगलेच 'हटके' होते. १९८६ साली आलेला 'एक रूका हुआ फैसला' त्यापैकीच एक. 12 Angry Men या अतिशय गाजलेल्या आणि अतिशय परिणामकारक चित्रपटाचं हे भारतीय रूप त्याच ताकदीचं, खिळवून ठेवणारं आहे. 

झोपडीत राहणाऱ्या एका मुलावर आपल्या वडिलांचा खून केल्याचा आरोप आहे. या केसवर कोर्टात सात दिवस चर्चा झालेली आहे आणि आता न्यायाधीशांनी १२ ज्यूरी मेंबर्सना केसवर अंतिम विचार करून तो मुलगा दोषी आहे की नाही हा निर्णय द्यायला सांगितलं आहे. त्यासाठी या बाराजणांना एका बंद खोलीत बसून या केसवर विचार करायचा आहे. हे बाराही जण वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे, समजातील वेगवेगळ्या स्तरातून आलेले आहेत. ते एकत्र बसून चर्चेला सुरुवात करतात. बहुतेकांच्या मते ही आता अगदी 'ओपन अँड शट' केस आहे. शंकेला जागाच नाही. तो मुलगा शंभर टक्के दोषी आहेच! सुरुवात होतानाच सार्वमत घ्यायचं ठरतं आणि बारापैकी एकजण - ज्यूरर क्रमांक ८ (के. के. रैना) - 'दोषी नाही' असं मत देतो. त्याचं म्हणणं असतं की हा त्या मुलाच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे, त्यमुळे सर्व बाजूंनी चर्चा झाल्याशिवाय घाईने निर्णय घेता येणार नाही. इतर अकरांपैकी काहींचा मात्र विरस होतो, कारण त्यांच्या मते सात दिवस चाललेल्या चर्चेनंतर पुन्हा चर्चेची खरं तर गरजच नसते. त्यामुळे आता पुन्हा इथे वेळ जाणार या विचाराने त्यांचा त्रागा सुरू होतो. 

इथून पुढची सारी चर्चा, ज्यूरर्सचे उद्रेक, मतभिन्नता, टोकाची वादावादी हे सगळं बघताना आपण अंतर्मुख होऊ लागतो. के. के. रैना आपलं म्हणणं अतिशय शांतपणे, अजिबात विचलित न होता, एकदाही आवाज न चढवता मांडत राहतो आणि आपली बाजू पटवत राहतो. सगळी केस तो पुन्हा उभी करतो. त्याच्या युक्तीवादाने एकजण त्याच्या बाजूला जातो आणि चित्रपट संपतो तेव्हा अकराच्या अकरा जण त्याच्या बाजूला असतात!

समाजाचं प्रातिनिधिक चित्र उभं करणारा 'एक रूका हुआ फैसला' आपल्याला चांगलाच झटका देतो आणि बहुसंख्य लोकांच्या विचारपद्धतीवर विचार करायला भाग पाडतो. पुढ्यातल्या कुठल्याही प्रश्नाचं विश्लेषण (मग तो प्रश्न सामाजिक, व्यक्तिगत, व्यवस्थात्मक -  कोणताही असो) वैज्ञानिक पद्धतीने, पूर्वग्रह, भावनिक कल बाजूला ठेवून, व्यक्तिगत अनुभव, निष्कर्ष यावर अवास्तव भर न देता, केवळ 'सत्य काय आहे' या एकाच उद्दिष्टाने व्हायला हवं. ते करण्यात आपण बरेचदा कमी पडतो आणि मग तार्किक विश्लेषणापेक्षा भावना किंवा 'मला काय वाटतं' हे आपल्यावर अधिराज्य गाजवू लागतं. दुसरं म्हणजे चित्रपटात के. के. रैनाचं पात्र ज्या शांतपणे सगळं हाताळतं ते उल्लेखनीय आहे. अर्थात मोठ्या स्केलवरील विविध प्रश्नांचा विचार करताना हे लक्षात येतं की आंदोलनात, सामाजिक चळवळीत न्याय्य हक्कांसाठी आवाज चढवायलाच लागतो, धरणं द्यायलाच लागतं - तिथे शांतपणाचा तसा उपयोग होत नाही. पण हा शांतपणाचा, न्यायाचा 'अंतःस्वर' महत्त्वाचा आहे. रणनीतीचा भाग म्हणून आवाज चढवताना तो 'रणनीतीचा भाग' आहे याचं भान असणं आवश्यक असतं. मूळ उद्देश हाच की समोरच्या माणसामध्ये मुळातून परिवर्तन व्हावं. त्याला विचार करायची योग्य पद्धत गवसावी. 

'एक रूका हुआ फैसला' एक केस सोडवता सोडवता ती सोडवणाऱ्या माणसांचे आतले गुंते अतिशय प्रभावीपणे समोर मांडतो. सशक्त लेखन असणाऱ्या या चित्रपटातील कलाकारही कमाल आहेत. विशेषतः अन्नू कपूर आणि पंकज कपूरच्या भूमिका म्हणजे अभिनयाचा वस्तुपाठ आहेत. 

'शांतता! कोर्ट चालू आहे' जसं आपल्याला 'सोलून' काढतं तसाच अनुभव हा चित्रपट बघताना येतो. मात्र 'शांतता…' सामान्य दिसणाऱ्या माणसांचं भीषण 'असामान्यत्व' दाखवत शेवटाकडे आपल्याला उन्मळून पाडतं तसं न होता हा चित्रपट एका पॉझिटिव्ह नोटवर संपतो. विजय तेंडुलकरांनी वाचकाला 'साहित्यातून रखरखीत सत्याकडे' नेलं तसं ही कलाकृतीदेखील करते पण शेवटी आपल्याला दिलासाही देते. आणि सामाजिक संदर्भात विचार करताना आणि काम करताना आतली ज्योत तेवती ठेवण्यासाठी असा दिलासा मिळणं कधीकधी फारच गरजेचं असतं!

(दिव्य मराठी, मधुरिमा)

Friday, July 11, 2014

मोनालिसा बियाँड स्माईल

'मोनालिसा स्माईल' हा माईक नेवेल या दिग्दर्शकाचा २००३ साली प्रदर्शित झालेला चित्रपट. 'फोर वेडिंग्ज अँड अ फ्यूनरल' या गाजलेल्या ब्रिटिश चित्रपटाचा हा दिग्दर्शक. 'मोनालिसा स्माईल'च्या केंद्रस्थानी एक गुरू आणि तिच्या शिष्या आहेत आणि त्यांच्यातील संघर्ष चित्रपटाची एक मुख्य बाजू आहे. कॅथरीन वॉटसन (ज्युलिया रॉबर्ट्स) ही कॅलिफोर्निया विद्यापीठातून 'कलेचा इतिहास' या विषयात पदवी घेतलेली तरूणी मॅसेच्युसेट्समधील वेलस्ली कॉलेजमध्ये याच विषयाची शिक्षिका म्हणून रूजू होते. वेलस्ली कॉलेज हे परंपरा जपणारं 'आधुनिक' कॉलेज आहे. तिथे मुलींना सर्व प्रकारचं शिक्षण दिलं जातं, पण अंतिम उद्देश 'उत्तम गृहिणी' तयार करणं हाच आहे. कॅथरीन स्वतंत्र विचारांची कलाशिक्षक आहे. ती मुलींना अभ्यासक्रमाबाहेरील चित्रकारांची, सौंदर्याच्या रूढ व्याख्येत न बसणाऱ्या त्यांच्या चित्रांची ओळख करून देऊ लागते आणि तिच्या शिकवण्याच्या दिशेबाबत तिचे आणि तिच्या एका विद्यार्थिनीचे -  बेटी वॉरेनचे (कर्स्टन डंस्ट) खटके उडू लागतात. बेटी अभिजन वर्गाची प्रतिनिधी आहे, परंपराप्रिय आहे आणि तिच्या कलाविषयक भूमिका ठाम आहेत. एकूणातच 'जे आहे ते कायम ठेवण्याकडे' तिचा कल आहे. कॅथरीन वयाच्या तिसाव्या वर्षीही अविवाहित आहे यावर तिचा विशेष रोष आहे. कॉलेजच्या वर्तमानपत्रातून ती कॅथरीनवर हल्ला चढवते आणि गुरू शिष्येचं नातं बिघडू लागतं. 

बेटीच्या तीन मैत्रिणी कॅथरीनच्या जवळ येतात. मुलींनी लग्न करावं पण ते सर्वस्व आहे असं मानू नये, लग्नापलिकडे स्वतःचा शोध घ्यावा हे कॅथरीन मुलींच्या मनावर ठसवायचा प्रयत्न करते. या तिघींपैकी एक - जोन - हुशार आहे. तिला वकील व्हायचं आहे, पण तिने आपल्या आवडत्या पुरूषाबरोबर लग्न करून संसार थाटणं पसंत केलं आहे. तिने पुढे शिकावं असा कॅथरीनचा आग्रह आहे. यावर जोन 'गृहिणी ही जणू काही एक निर्बुद्ध माणूस आहे, गृहिणी किंवा आई होण्याला प्राधान्य देणं कमीपणाचं आहे असं तुला का वाटतं?' असा प्रश्न विचारते तेव्हा कॅथरीन निरूत्तर होते आणि तिला शुभेच्छा देऊन थांबते. 

लग्नाकरता उत्सुक असणाऱ्या बेटीचं लग्न होतं, पण नवऱ्याचं अफ़ेअर सुरू आहे हे कळल्यावर ती कोसळून पडते. तिची आई पारंपरिक पद्धतीने 'काहीही झालं तरी आता तो तुझा नवरा आहे, त्याचं घर हेच तुझं घर' असं सांगते तेव्हा तिचा कॅथरीनबद्दलचा दृष्टिकोन बदलू लागतो. वेलस्ली कॉलेजसारख्या ठिकाणी आपण फार काळ राहू शकणार नाही हे लक्षात आल्यावर कॅथरीन तिथून निघायचं ठरवते तेव्हा तिला निरोप देताना बेटी, जोन आणि इतर दोघी आपापल्या सायकलींवरून तिच्या टॅक्सीची सोबत करतात. बेटीचं अखेरचं संपादकीय कॅथरीनबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारं असतं. 

'मोनालिसा स्माईल'बद्दल खरं तर समीक्षकांचा नकारात्मक सूर होता. १९५० च्या दशकाचं अधिक प्रत्ययकारी चित्रण चित्रपटातून व्हायला हवं होतं असं काहींचं मत पडलं. ज्युलिया रॉबर्ट्सने समरसून काम केलेलं नाही असंही काहींचं मत होतं. पण हा चित्रपट काही मूलभूत मुद्द्यांना स्पर्श करतो हे खरं. मुख्य म्हणजे गुरू आणि शिष्य हे नातं अगदी मानवी पातळीवर समोर येतं. शिक्षकाचं स्थान असाधारण खरंच, पण शिक्षकदेखील त्याच्या अंतर्मनातील झगड्यांमध्ये सापडलेला असतो, प्रसंगी त्याचे विद्यार्थीच त्याला आव्हान देतात हे या नात्याला वेगळं परिमाण देतं. परंपरा आणि नवता यातला संघर्ष सततच सुरू आहे. पण कळीचा प्रश्न हा की जगण्याचं श्रेयस कशात आहे यावर आपल्यात एकवाक्यता होऊ शकते का? 

कॅथरीन तिच्या भूमिकेवर ठाम आहे आणि व्यक्तीच्या (इथे स्त्रीच्या) अभ्युदयाच्या व्यक्तीकेंद्रित दृष्टीने तिचा विचार योग्यच आहे. मात्र परंपरेकडून तिला मिळालेल्या आव्हानापुढे ती शेवटी हार मानते. अर्थात त्याला हार तरी कसं म्हणायचं? नोकरी टिकवण्याकरता तिने समझोता केला असता तर ती हार ठरली असती. कॅथरीन आपला मार्ग सोडत नाही आणि आपल्या विद्यार्थिनींनाही नवा मार्ग दाखवते. स्त्रीच्या आत्मभानाबद्दल, तिच्या स्वातंत्र्याबद्दल बोलत असताना स्त्रीच्या स्वतंत्र विचाराला आणि तिने लग्नसंस्थेला आव्हान देण्याला केंद्रीय महत्त्व आहे. 'उंबरठा' चित्रपटातली सुलभा महाजन त्यामुळेच मला आश्वासक वाटते. कारण प्रस्थापित रचनेतील दोषांची उत्तरं त्या रचनेच्या बाहेर पडल्याशिवाय मिळत नाहीत. (आईन्स्टाईन म्हणतो तसं - The significant problems we face cannot be solved at the same level of thinking we were at when we created them.) माणसाची 'सहजीवनाची आस' जर केंद्रस्थानी आहे तर लग्न करणं, न करणं यातील चूक-बरोबर निकालात निघतं. कॅथरीन वॉटसन किंवा सुलभा महाजन जेव्हा वेगळी वाट शोधू पाहतात तेव्हा त्याचं स्वागत करणं आणि एका व्यक्तीच्या अस्तित्वाला त्या व्यक्तीच्या मनाजोगा अर्थ देण्याच्या प्रयत्नात ती वाट सुकर होईल, एका नवीन रचनेकडे नेईल यासाठी आपल्या परीनं प्रयत्न करणं हे सगळ्यांचंच काम आहे. प्रयोगाला न घाबरणं हे मला वाटतं निर्भीड आणि घट्ट मुळं असतील तरच जमू शकतं. मोनालिसाच्या स्माईलचा अर्थ लावण्याच्या प्रयत्नातली कॅथरीन अशीच आहे. व्यक्ती म्हणूनही आणि शिक्षक म्हणूनही. पुस्तकाबरहुकूम शिकवणं, शिकणं हे व्यवस्थेचा भाग म्हणून ठीकच, पण आपला मनोविकास पुस्तक मिटल्यावर आपण काय करतो त्याच्यावरही अवलंबून असतो!  

(दिव्य मराठी, मधुरिमा)

Friday, June 13, 2014

हजारों ख्वाहिशें ऐसी : गोष्ट हातातली, पण हातात नाही!

सुधीर मिश्रा हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं ते 'इस रात की सुबह नही' या चित्रपटामुळे. १९९६ साली आलेला हा चित्रपट कॉलेजमध्ये असलेल्या आम्हाला फारच आवडून गेला होता. पुढे १९९८ मध्ये रामगोपाल वर्माचा 'सत्या' प्रदर्शित झाला आणि त्याने हिंदी चित्रपटांना वास्तवदर्शी वळण दिलं. पण सत्याच्याही आधी सुधीर मिश्रांनी 'इस रात की…' मधून मुंबईचं एकमेकात गुंतलेलं वास्तव दाखवलं होतं. त्याच्याही आधी 'धारावी'सारख्या चित्रपटातूनही त्यांनी मुंबई समोर आणली होती. अर्थात 'सत्या'ला पूर्णपणे 'अंडरवर्ल्ड' पार्श्वभूमी होती आणि चित्रपटाचा 'सिनेमॅटिक' परिणाम कमाल होता हे खरं!

पुढे २००५ मध्ये सुधीर मिश्रांनी 'हजारों ख्वाहिशें ऐसी' केला आणि मी हलून गेलो. इतका मुळापासूचा अस्वस्थ, इतका तरूण, इतका आर्त, खोलवरचा अनुभव देणारा आणि त्याचवेळी इतका रोमँटिक चित्रपट? सुधीर मिश्रांचं आमच्या लिस्टमधलं स्थान एकदम वर गेलं! 'हजारों ख्वाहिशें ऐसी'ने फार म्हणजे फार क्वचित येऊ शकेल असा जळजळीत अनुभव दिला होता.  

ही तीन मित्रांची कथा आहे आणि चित्रपटाच्या ओपनिंग स्क्रोलमध्ये म्हटल्याप्रमाणे 'अनेक दिशांनी ओढल्या जाणाऱ्या' भारतातल्या एका काळाचीही ही गोष्ट आहे. सत्तरचं अस्वस्थ दशक. स्वातंत्र्यानंतर केंद्रस्थानी स्थिरावलेली काँग्रेस. इंदिरा गांधींचा उदय आणि त्यांचा काँग्रेसवर प्रस्थापित झालेला एकछत्री अंमल. १९७४ साली जयप्रकाश नारायण यांनी दिलेला 'संपूर्ण क्रांती'चा नारा आणि मग १९७५ साली लागू झालेली आणीबाणी. पश्चिम बंगालमधील नक्षलबारीमध्ये १९६७ मध्ये सुरू झालेल्या कडव्या डाव्या चळवळीने या दशकात आपली मुळं पसरायला सुरूवात केली होती. २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ ही दोन वर्षे भारताच्या राजकीय-सामाजिक इतिहासात घुसळण घडवून आणणारी वर्षे ठरली. 

'हजारों ख्वाहिशें ऐसी' घडतो तो हा अस्वस्थ काळ आहे. सिद्धार्थ तय्यबजी (केके मेनन), विक्रम मल्होत्रा (शायनी आहुजा) आणि गीता राव (चित्रांगदा सिंग) हे तिघे कॉलेजमधले मित्र. सिद्धार्थ एका श्रीमंत घरातला, निवृत्त न्यायाधीशाचा मुलगा, पण आतून क्रांतीच्या कल्पनेने पेटलेला. गीता लंडनहून परतलेली एक दाक्षिणात्य मुलगी. सिद्धार्थच्या विचारांच्या प्रभावात असलेली. विक्रम एका मध्यमवर्गीय घरातला, गांधीवादी वडिलांचा मुलगा. त्याला वडिलांबद्दल प्रेम आहेपण वडिलांच्या आदर्शांचा काहीसा जाचही आहे. त्याचं गीतावर मनापासून प्रेम आहे आणि मोठा व्यावसायिक होण्याची त्याची इच्छा आहे. गीता मात्र सिद्धार्थच्या प्रेमात बुडालेली आहे. 

तिघांच्या वाटा एका टप्प्यावर वेगळ्या होतात. जात आणि सरंजामशाहीच्या वरवंट्याखाली भरडल्या जाणाऱ्या बिहारमधल्या खेड्याकडे सिद्धार्थ निघतो. विक्रम दिल्लीत राजकीय वर्गाशी सलगी वाढवत आपलं स्थान पक्कं करू लागतो आणि गीता पुढच्या शिक्षणासाठी ऑक्सफर्डला जाते. 

काही वर्षांनी गीता आणि विक्रम एका पार्टीत भेटतात. विक्रम आता दिल्लीत 'फिक्सर' म्हणून चांगला स्थिरावला आहे. गीताने एका आयएएस ऑफिसरशी लग्न केलं आहे. 'सिद्धार्थ कुठे आहे?' या विक्रमच्या प्रश्नाला उत्तर न देता गीता निघून जाते. मात्र विक्रमला त्याचा पुढे उलगडा होतो. सिद्धार्थ आणि गीता एकमेकांना भेटतात हे त्याला कळतं. गीता कालांतराने नवऱ्याला सोडून सिद्धार्थबरोबर खेड्यात काम करू लागते. विक्रमचं गीतावरील प्रेम आजही तसंच आहे, ती आपली होऊ शकणार नाही हेही त्याला माहीत आहे, बिहारमधला संघर्ष तीव्र होतो आणि गीता-सिद्धार्थ दोघेही पोलिसांच्या हाती लागतात. गीताचा नवरा तिची सुटका करतो, पण सिद्धार्थ अडकतो. गीतावरील प्रेमापोटी, तिच्या विनंतीवरून सिद्धार्थचा माग काढत विक्रम बिहारमध्ये पोचतो आणि ध्यानीमनी नसताना संकटात सापडतो. एका भीषण मारहाणीत तो कायमचा जायबंदी होतो. 

क्रांतीचा मार्ग चोखाळणारा सिद्धार्थ सगळ्यातून बाहेर पडायचं ठरवतो आणि इंग्लंडला मेडिकलचा अभ्यास करण्यासाठी जातो. गीता मात्र विक्रमबरोबर थांबते.

मी या चित्रपटाशी खूप जास्त रिलेट करू शकलो याचं कारण म्हणजे भोवतीचं जग बदलायला तडफडणारा आणि त्याचवेळी स्वतःशी झगडणारा सिद्धार्थ, आदर्श आणि व्यवहार यांची कसरत करणारा, 'तडप' सहन करीत प्रेम करणारा विक्रम हे दोघेही मला फार जवळचे वाटले. डाव्या विचारांनी भारावलेल्या, परात्मतेचा अनुभव घेणाऱ्या, पण त्याचवेळी व्यवहाराच्या ऊबेला नाईलाजाने शरण जाणाऱ्या कुणालाही या कथेत आपली कथा दिसू शकेल. १९७५ पासून आजपर्यंत काळ खूप बदलला आहे आणि समाजबदलाच्या मार्गांनीही वेगवेगळी वळणं घेतली आहेत. मात्र बुद्धिमान आणि संवेदनशील माणसांच्या मनाच्या तळाशी असलेल्या 'हजारों ख्वाहिशें' तशाच आहेत. या माणसांचे काही मूलभूत गुणधर्म अजूनतरी बदललेले नाहीत. आयुष्याकडून खूप काही मागणाऱ्या अशांपैकीच तिघांची ही कथा. हिंदीतील उत्तम राजकीय चित्रपटांपैकी एक म्हणून गौरवला गेलेला हा चित्रपट प्रत्ययकारी राजकीय भाष्य तर करतोच, पण तो तीन माणसांच्या जागेवरून भोवताली बघत अन्वयार्थ लावायचा जो प्रयत्न करतो ते विशेष आहे. भगभगीत वास्तव आणि त्याच्याशी भांडायचा प्रयत्न करणारे हे तिघेजण आपल्याला आपलेसे वाटतात कारण ते चित्रपटात खोटे वाटावेत इतके खरे आहेत. 

'हजारों ख्वाहिशें ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले' या गालिबच्या ओळी. आणि गालिबच्या कुठल्याही ओळींइतकाच या चित्रपटाचा अनुभवही विलक्षण आहे!

(दिव्य मराठी, मधुरिमा)

Friday, May 2, 2014

पार्टी : आपली सुटका नाही!

काही चित्रपट रूतून बसतात. पार्टी मी पहिल्यांदा पाहिला तेव्हा ते आजपर्यंत - रूतून बसला आहे. सिनेमॅटोग्राफर म्हणून १९७३-७४ पासून काम करणाऱ्या गोविंद निहलानी यांचा दिग्दर्शक म्हणून हा चौथा चित्रपट. त्यांच्या गाजलेल्या 'अर्धसत्य'नंतर एका वर्षाने, १९८४ साली प्रदर्शित झालेला. मुळात 'पार्टी' हे महेश एलकुंचवारांचं नाटक. या चित्रपटाची संवाद आणि पटकथाही त्यांचीच.

ही पार्टी चाललीय दमयंती राणे (विजया मेहता) यांच्या घरात. दिवाकर बर्वे (मनोहर सिंग) या ज्येष्ठ लेखकाला भारत सरकारतर्फे साहित्याचं पारितोषिक जाहीर झालं आहे आणि त्यांच्या सन्मानार्थ दमयंतीबाईंनी ही पार्टी आयोजित केली आहे. पार्टीत साहित्य, नाटक, पत्रकारिता अशा क्षेत्रातील नामवंत मंडळी हळूहळू येऊ लागली आहेत. दमयंती राणे म्हणजे मुंबईतील कला आणि सामाजिक सर्कलमधलं एक प्रस्थ आहे आणि त्यांच्या घरची पार्टी ही समस्त कलाकार मंडळींसाठी तशी नित्याची बाब आहे.

पार्टीसाठी जे येत आहेत त्यात एक श्रीमंत कम्युनिस्ट स्त्री आहे, एक होतकरू लेखक आहे, एक व्यावसायिक नाटकांचा लेखक आहे, एका इंग्लिश मासिकाची संपादक आहे, रंगभूमीवरचा एक यशस्वी नट आहे आणि इतरही लोक आहेत. पार्टीच्या सुरूवातीपासूनच या व्यक्तिरेखा उलगडत जातात. त्यांच्या धारणा आणि त्यांचे मुखवट्याआडचे चेहरे दिसू लागतात. त्यांच्यात संवाद होतोय, वाद होतोय आणि त्यातूनही आपल्याला त्यांच्याबद्दल कळतंय. त्यांच्या गप्पांतून कलाविषयक चर्चा होतेय आणि सामाजिक प्रश्नही पुढे येतायत. त्यांचं व्यक्तिगत दुःखही दिसतंय आणि त्यांचे परस्परसंबंध, जे प्रेम, द्वेष, ओढ अशा मानवी भावनांवरच आधारलेले आहेत, दिसत आहेत. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून की काय पण या प्रतिभावान, बुद्धिमान माणसांचं एक काहीसं अगतिक रूप आपल्यासमोर येतंय.

या रंगलेल्या चर्चेत एक उल्लेख येतो तो अमृतचा. अमृत (नसीरूद्दीन शहा) हा मुळात कवी, पण सध्या आदिवासी भागात सरकार आणि भांडवलशहांच्या दडपशाहीविरुद्ध आंदोलन करतोय. त्याचा पत्रकार मित्र अविनाश (ओम पुरी) पार्टीच्या शेवटाकडे हजर होतो आणि अमृतची बातमी आणतो. एका हल्ल्यात अमृत थोडा जखमी झाला आहे आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेतो आहे हे उपस्थितांना समजतं. अमृतच्या एका कवितेच्या सादरीकरणातून कला आणि जीवन हा वाद सुरू होतो. कलाकार राजकीयदृष्ट्या कमिटेड नसेल तर त्याची कला रिलेव्हंट नाही असं मत अविनाश मांडतो. कलेची आराधना करताना एकाच माणसामध्ये 'माणूस' आणि 'कलाकार' अशा दोन ओळखी तयार होतात आणि दोन वेगळ्या नैतिक बांधीलकी तयार होऊ शकतात या मुद्द्याला उत्तर देताना अविनाश कळीचा प्रश्न पुढे आणतो - माणसातला माणूस आणि कलाकार केव्हा ना केव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात आणि एकाच प्रश्नाचं उत्तर शोधू लागतात. अशा वेळी निर्णय घ्यावा लागतो की तुम्हाला कलाकार म्हणून जगायचं आहे की माणूस म्हणून?

हा प्रश्न अनुत्तरित सोडून चित्रपट शेवटाकडे येतो आणि फोनवर बातमी येते की अमृतची हत्या झालेली आहे.

पार्टी संपते. सगळे घराकडे परत निघतात. पण कला आणि मानवी अस्तित्वाच्या प्रयोजनाबद्दलचे अविनाशने उपस्थित केलेले प्रश्न आणि अमृतची आठवण मात्र सगळ्यांच्या विचारपटलावर त्रासदायकरित्या पसरून राहिली आहे.

पार्टी हा असाधारण चित्रपट आहे. महेश एलकुंचवारांनी अतिशय मूलगामी चिंतन या कथेतून पुढे आणलं आहे. एक व्यामिश्र अशी समाजव्यवस्था आणि त्याचे भाग असणारे आपण. आपला यातला रोल कुठला? सभोवती रण माजलेलं असताना आपण आपल्या स्थानावरच पक्कं राहायचं की न्याय हे अंतिम तत्त्व मानून रणात उडी घ्यायची? पार्टी बघावा कारण तो प्रश्न विचारतो. आणि अवघड प्रश्न विचारतो. आपण कुठे आहोत आणि आपण कुठे असलं पाहिजे असे अडचणीत आणणारे हे प्रश्न आहेत. प्रस्थापित व्यवस्थेतल्या धुरीणांचे खरे आणि सामान्य चेहरे पार्टी समोर आणतो, पण आपण स्वतःला त्याच लोकांमध्ये बघू लागतो कारण थोड्या-बहुत फरकाने आपण सगळेच असहाय आणि परिस्थितीनुरूप आकार घेणारे असतो. त्यामुळे पार्टीतील कुठल्याच पात्राचा राग येत नाही, ते पात्र एका क्षणी ढोंगी, सामान्य वाटलं तरी. मूलभूत प्रश्न विचारणारा 'पार्टी' प्रस्थापिततेची, सोप्या भूमिकांची चिकित्सा करतो, पण अगदी तटस्थपणे.

उत्तम कलाकृती 'डिस्टर्ब' करणारी असते. पार्टी हे चांगलंच डिस्टर्बिंग प्रकरण आहे. त्यात एका मानवीय अशा आंतरिक कोलाहलाचा आविष्कार आहे आणि दुसरीकडे या आंतरिक कोलाहलावर प्रश्नचिन्हही आहे. अमरीश पुरी, दीपा साही, शफी इनामदार, रोहिणी हट्टंगडी, आकाश खुराना, के.के. रैना आणि इतर अनेक कसलेल्या कलाकारांची टीम पार्टीला जिवंत करते. आणि बहुधा आपल्यालाही.          

चित्रपट किती कोटींचा धंदा करतो यावर त्याची गुणवत्ता ठरण्याच्या काळात शांत, गंभीर आणि आंतरिक सूर लावणाऱ्या 'पार्टी'चे शोज मल्टीप्लेक्समधून मुद्दाम व्हावेत!

(दिव्य मराठी, मधुरिमा)

Thursday, April 3, 2014

रातातुय - एका उंदराने

'टॉय स्टोरी' पासून चित्रपटनिर्मितीची सुरूवात केलेल्या पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओचा 'फ़ाईंडिंग नीमो' हा चित्रपट पाहिल्यावर पिक्सारने जे गारूड केलं ते आजतागायत कायम आहे. पिक्सारचा कुठलाही सिनेमा आला की निमूटपणे तिकीट काढणे आणि थिएटरमध्ये जाऊन बसणे हे मी जवळजवळ व्रतासारखं पाळतो. 'रातातुय' रिलीज झाला तेव्हाही व्रत पाळलं होतं. २००७ मध्ये वॉल्ट डिस्ने पिक्चर्सने हा सिनेमा रिलीज केला होता.

'एनीवन कॅन कुक' हे घोषवाक्य असलेला गुस्ताव हा पॅरिसमधला एक नामवंत शेफ. अंतोन इगो हा पॅरिसमधला एक प्रख्यात 'फूड क्रिटिक' - अन्न समीक्षक. गुस्तावच्या घोषवाक्याशी असहमत असणारा. त्याच्या एका नकारात्मक लेखामुळे 'गुस्ताव्ज' या रेस्टॉरंटचे 'रेटिंग' घसरते आणि त्या धक्क्याने गुस्ताव मरण पावतो. दुसरीकडे आहे आपला कथानायक - रेमी. रेमी हा उंदीर आपल्या टोळीबरोबर राहतोय, पण त्याचं वेड आहे स्वयंपाक. बाकीचे सगळे भाईबंद काहीही, कसंही, कुठेही खायला उत्सुक असताना रेमीला आस आहे ती निगुतीने अन्न शिजवून खाण्याची. रेमी अपघाताने एकदा 'गुस्ताव्ज'मध्ये पोचतो आणि तिथे त्याला दिसतो लिंग्विनी. कुमारवयातला हा गोंधळलेला पण सरळ मनाचा मुलगा या रेस्टॉरंटमध्ये सफाईचं काम करायला रूजू झालेला आहे. त्याच्याकडून एकदा किचनमध्ये शिजत असलेल्या सूपचं भांडं पडतं आणि सूप सांडल्यामुळे तो काहीतरी करून ते सुधारायचा प्रयत्न करू लागतो. रेमीच्या ते लक्षात येतं आणि तो सूप 'दुरूस्त' करतो. (हे सगळं वाचताना विचित्र वाटत असेल कदाचित, पण ते चित्रपटात जरूर पाहा. कल्पनाशक्तीची झेप म्हणजे काय आणि तिचं एकसंध, प्रभावी सादरीकरण कसं करायचं याचं 'रॅटाटुई' इतर अनेक अ‍ॅनिमेशनपटांसारखंच उत्तम उदाहरण आहे!) लिंग्विनी सूप करतो आहे म्हणून चिडलेला स्किनर ('गुस्ताव्ज'चा सध्याचा मालक आणि चीफ शेफ) जेव्हा ते सूप एका अन्न समीक्षकाला, जी जेवायला तिथे आली आहे, खूप आवडतं तेव्हा अचंभित होतो. 'गारबेज बॉय' लिंग्विनी सूप करतो आहे म्हणून चिडलेला स्किनर कॉलेटच्या (किचनमधली एकमेव स्त्री शेफ) आग्रहामुळे लिंग्विनीला काढून न टाकता त्याला किचनमध्ये सामील करून घेतो.

यानंतर सुरू होतो लिंग्विनी आणि रेमी यांचा 'किचनप्रवास'. तो कसा होतो, शेवटी अंतोन इगो एका उंदराने केलेल्या 'रॅटाटुई' या फ्रेंच डिशमुळे अवाक होऊन 'एनीवन कॅन कुक' मान्य कसं करतो हे प्रत्यक्ष बघण्यातच मजा आहे.

'द आयर्न जायंट' आणि 'इन्क्रेडीबल्स' या चित्रपटांचा दिग्दर्शक ब्रॅड बर्ड याचा हा तिसरा चित्रपट. रातातुयबद्दल सांगावं असं पुष्कळ काही असलं तरी त्यातला हायलाईट म्हणता येईल अशी एक गोष्ट, जी चित्रपटाचं सारच आहे, ती म्हणजे अंतोन इगोचं चित्रपटाच्या अखेरचं कला, कलाकार आणि समीक्षक यांच्याविषयीचं स्वगत. आपण कल्पनाही करू शकत नव्हतो अशा एका जिवाकडून आपल्या आईच्या हातच्या 'रातातुय'ची आठवण करून देणारं रातातुय खायला मिळाल्यावर इगो समीक्षक म्हणून आपल्या ताठर भूमिकेवर पुनर्विचार करतो. नवीन काहीतरी करण्याची ऊर्मी असलेला कलाकार, आपल्या निर्मितीतून बोलणारा कलाकार आणि कसलीही रिस्क न घेता फक्त कलाकृतींची चिरफाड करणारा समीक्षक यात अखेरीस निर्मितीक्षम कलाकारच महत्त्वाचा ठरतो हे इगो मान्य करतो.

मुळात कलानिर्मिती ही कशातही आणि मुख्य म्हणजे 'कोणा एकात' बांधून ठेवता येत नाही. निर्मिती एकीकडे सुरू असते, तिची ओढ असलेले जातिवंत निर्माते त्यात रमलेले असतात, धडपडत असतात आणि ती अस्सल आहे की टाकाऊ, तिचे दृश्य-अदृश्य परिणाम याची चर्चा दुसरीकडे सुरू असते. समीक्षेचं एक महत्त्व नक्कीच आहे, पण मुद्दा हा की समीक्षा कलानिर्मितीवर भारी पडतेय का? आणि तसं होत असेल तर तिथे चिंतेला जागा आहे!

रंग, स्वाद, गंध याची ओढ लागलेल्या एका उंदराची स्वयंपाक करण्याची 'प्रोसेस', त्याच्या सगळ्या मोहक हालचाली, त्याने आणि लिंग्विनीने मिळून केलेला स्वयंपाक हे पाहत असताना किंवा पिक्सार, डिस्ने, ड्रीमवर्क्स यांचे कुठलेही चित्रपट पाहत असताना जाणवतं की प्रत्यक्षात हे काहीच शक्य नाही हे आपल्याला कळतंय, पण चित्रपटाचे कर्ते या कल्पित दुनियेत नेऊन जे दाखवत आहेत ते आवडतंय, ते भन्नाट आहे आणि ते आपल्याला वेगळ्या सजीवाच्या स्थानावरून माणसाला विचारात पाडणारं भाष्य करत आहेत. त्यामुळे 'रातातुय ' किंवा इतर चित्रपट बघत असताना मला अल्बर्ट आईन्स्टाईनचं एक प्रसिद्ध विधान सारखं आठवतं – इमॅजिनेशन इज इंटेलिजंस हॅविंग फन!

आणि या 'फन'मधून अवचित जे गवसत आलं आहे त्याने मी कायमच भारून जात आलो आहे! कारण ते कधीकधी वस्तुनिष्ठ विचार करूनही गवसत नाही! 

(दिव्य मराठी, मधुरिमा)

Thursday, February 20, 2014

'दृष्टी' देणारा 'शौर्य'


समर खान या दिग्दर्शकाचा 'शौर्य' हा चित्रपट बघण्याआधी मी त्याचा 'कुछ मीठा हो जाए' हा एक हलकाफुलका चित्रपट पाहिला होता.  'शौर्य' हा त्याचा दुसरा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 'अ फ्यू गुड मेन' या गाजलेल्या अमेरिकन चित्रपटावर आधारित आहे असं कळलं होतं. मी तोपर्यंत 'अ फ्यू गुड मेन' पाहिला नव्हता. पण 'शौर्य' पाहिला गेला. आणि तो अतिशय आवडला! कोर्ट मार्शलची एक केस, त्याच्याशी संबंधित नौदलातील एक मोठा अधिकारी आणि त्याला अखेरीस अटक असं  'अ फ्यू गुड मेन'चं साधारण सूत्र होतं. 'शौर्य'मध्ये हा धागा कायम आहे. फक्त कथा मात्र भारतीय लष्करात घडणारी आहे. 

चित्रपट सुरू होतो तो सिद्धांत (राहुल बोस) आणि आकाश (जावेद जाफरी) या आर्मीत वकील असणाऱ्या दोन मित्रांपासून. सिद्धांतचे वडील सीमेवर लढताना मारले गेले आहेत. वडिलांच्या आठवणीने कमालीचा अस्वस्थ होणाऱ्या सिद्धांतचं एक रूप 'हॅप्पी गो लकी' असं आहे. तो एकूणच आयुष्याच्या आणि करिअरच्या बाबतीत फारसा गंभीर नाही. आकाश मात्र गंभीर प्रकृतीचा आहे. दोघांची मैत्री अभेद्य आहे. काश्मीरमध्ये कॅप्टन जावेद (दीपक डोबरियाल) आपल्या कमांडिंग ऑफिसरला गोळी घालून मारतो म्हणून त्याच्यावर खटला सुरू होतो तेव्हा त्यात डिफेन्स काउन्सेल म्हणून सिद्धांतला त्या केसवर आणण्यासाठी आकाश प्रयत्न करतो. तो स्वतः सिद्धांतच्या विरुद्ध केस लढणार आहे. कॅप्टन जावेद अटक झाल्यापासून एक अक्षरही बोलत नाहीये, त्याला गोळी चालवताना त्याच्या सहकारी जवानांनी पाहिलं आहे, त्यामुळे ही अगदी 'ओपन अँड शट' अशी केस आहे, सिद्धांतला फारसं काही करायला लागणार नाही याची आकाशला खात्री आहे. आपल्या आळशी मित्राला एक सोपी केस मिळवून देणे इतकाच आकाशचा उद्देश आहे.

केस सुरू होते आणि मग मात्र सिद्धांत त्यात गुंतत जातो. काहीही न बोलणाऱ्या कॅप्टन जावेदकडे खरं तर बोलण्यासारखं खूप काही आहे याचा सिद्धांतला हळूहळू उलगडा होऊ लागतो आणि तो केसच्या मुळाशी जायचा आटापिटा करू लागतो. यात त्याच्याबरोबर आहे काव्या शास्त्री (मिनिषा लांबा) -  एक पत्रकार. मेजर राठोड हा कॅप्टन जावेदचा कमांडिंग ऑफिसर स्वभावाने कसा होता,  त्याला गोळी घालावी असं जावेदला का वाटलं याचा शोध घेताना सिद्धांत पोचतो ब्रिगेडियर रूद्रप्रताप सिंग (के के मेनन) पर्यंत. ब्रिगेडियर प्रताप हा नावासारखाच भारदस्त माणूस. बुद्धिमान, अहंकारी, स्वतःच्या सैन्यात असण्याचा अभिमान असलेला आणि जगण्यातील उच्च अभिरूची जोपासणारा - अभिजनवादी विचारांचा पक्का पुरस्कर्ता! ब्रिगेडियर प्रताप आणि मेजर राठोड यांच्यात काहीतरी नातं आहे आणि या दोघांचीही हिंदुत्वाबाबतची वैचारिक धारणा सारखी आहे हे सिद्धांतला उमगतं आणि निर्दोष मुस्लिमांना एका सर्च ऑपरेशनच्या दरम्यान बिनदिक्कतपणे मारून टाकणाऱ्या मेजर राठोडला जावेदने नाईलाजाने गोळी घातली हे सत्य अखेरीस समोर येतं. राठोडचा पाठीराखा असलेल्या प्रतापला अटक करण्यात येते आणि जावेद निर्दोष सुटतो. 

अतिशय बांधीव पटकथा, ताकदीचे संवाद आणि कमाल अभिनय ही 'शौर्य'ची तीन बलस्थाने आहेत. चित्रपट प्रभावी असला तरी हिंदू-मुस्लिम मुद्द्याचं या चित्रपटात सुलभीकरण केलं गेलं आहे असं काही समीक्षकांचं मत होतं. मी स्वतः चित्रपटातील कथेकडे फक्त हिंदू-मुस्लिम संदर्भातच न बघता थोड्या अधिक व्यापकपणे बघतो. आपल्या बायकोवर आणि मुलीवर घरातील मुस्लिम नोकराने एके दिवशी बलात्कार केला आणि त्यांचा खून केला म्हणून सर्व मुस्लिमांवर पेटून उठलेला प्रताप सिद्धांतच्या प्रश्नांना कोर्टात तीक्ष्ण उत्तरे देतो तेव्हा एका मोठ्या जबाबदार अधिकाऱ्याच्या मनातील द्वेषाचा, त्याच्या आततायी वागण्याचा राग येतोच पण दुसरीकडे त्याचं व्यक्तिगत दुःखही आपण अमान्य करत नाही. आणि इथेच हा चित्रपट आपल्याला काही 'मूलभूत' सांगू पाहतो.  

हे 'मूलभूत' काय? तर ते हे की माणसाच्या दुःखाशी कुणाचंच वैर नाही. माणसाला दुःख आहे, समाजजीवनात शेकडो प्रश्न आहेत आणि हे नाहीसं कसं करायचं हा सगळ्यावर कडी करणारा महाप्रश्न आहे! तेव्हा या सगळ्याबद्दल सहानुभूती असली तरी माणूस म्हणून आपली धारणा काय? आपण सूडाच्या भावनेत जगत सुखी राहू शकू का? आपण आपल्या दुःखाचं विश्लेषण कसं करतो? याची उत्तरं शोधणं आपल्याला भाग आहे. सिद्धांत प्रतापला प्रश्न विचारतो की सगळ्या मुस्लिमांना नाहीसं करणं हे जर तुझं उत्तर असेल तर मग ज्याने मार्टिन ल्यूथर किंगला मारलं किंवा ज्याने गांधीजींना मारलं त्याच्या धर्माच्या सगळ्या माणसांना मारून टाकायचं का? तेव्हा प्रश्न हा की आपण आपल्याला व्यक्तिगत दुःख देणाऱ्या माणसाकडे माणूस म्हणून बघतो की लेबलं लावून बघतो ?

धर्माला राष्ट्रवादाचा आधार करण्याचे प्रयत्न होत असताना सम्यक दृष्टी, समता, न्याय आणि स्वातंत्र्य हेच कुठल्याची देशाच्या राष्ट्रीयतेचे आधारस्तंभ असायला हवेत हे पुन्हा पुन्हा सांगण्याची आज गरज आहे. या पार्श्वभूमीवर 'शौर्य'सारखा चित्रपट एक मोठीच दृष्टी देऊन जातो!  

(दिव्य मराठी, मधुरिमा)

Thursday, January 16, 2014

जुनी न होणारी दोन गणपतरावांची कथा!

कॉलेजमधलं एखादं लेक्चर बंक करून, त्याबद्दल अपराधीभाव बाळगत, सिनेमा बघायचं जे वय असतं त्या वयात मी 'कथा दोन गणपतरावांची' हा चित्रपट बघितला होता. मात्र हा चित्रपट लेक्चर बंक करून पाहिला नव्हता, तर पुण्यातल्या 'नॅशनल फिल्म अर्काइव्हज'मध्ये रीतसर बघितला होता. हा चित्रपट तेव्हा तर मला आवडला होताच, पण दहा-पंधरा वर्षांनी जेव्हा तो परत पाहिला तेव्हा तर तो अधिकच आवडू लागला. कारण माणसाचे मनोव्यापार आणि त्यातून घडणारे-बिघडणारे मानवी संबंध याचा प्रत्यक्षातला अनुभवही थोडा अधिक परिपक्व झाला होता.

अरुण खोपकर हे कलाक्षेत्रातलं भारदस्त नाव. 'कथा दोन गणपतरावांची' हा त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट म्हणजे 'स्टोरीटेलिंग'चा वस्तुपाठ तर आहेच, पण 'स्टोरी ट्रीटमेंट'चा आणि अभिनयाचादेखील वस्तुपाठ आहे. निकोलाय गोगोलच्या 'इव्हान निकिफोरोविचबरोबर इव्हान इव्हानोव्हीच'कसा भांडला याची कथा' यावर आधारित हा चित्रपट. अक्कडगाव या काल्पनिक गावात घडणारी ही कथा. गणपतराव मोरे पाटील (मोहन आगाशे) आणि गणपतराव तुरे पाटील (दिलीप प्रभावळकर) या दोन जिवलग मित्रांची ही गोष्ट. सोबतीला गावातली इतर नमुनेदार माणसं आहेतच, पण कथेचे नायक हे दोघे. आणि कथेचा विषय म्हणजे त्यांची अतूट मैत्री आणि या मैत्रीला गेलेला तडा. 

पाश्चात्त्य राहणीमानाचा प्रभाव असणारे तुरे पाटील आणि संपूर्ण देशी मोरे पाटील हे दोघे लहानपणापासूनचे मित्र. दोघांनीही लग्न केलेलं नाही. तुरे पाटील शिडशिडीत बांध्याचे, नीटनेटके, शिस्तीला महत्त्व देणारे, काहीसे धूर्त आणि चलाख. मोरे पाटील म्हणजे अगदी अघळपघळ गडी. साधे सरळ आणि आळशी. पण दोघांमधली मैत्री मात्र विशेषच. गावाच्या चर्चेचा विषय असणारी. आई-वडील आपल्या मुलांना उदाहरण देतात अशी मैत्री. एकदा तुरे पाटील मोरे पाटलांच्या घरातली एक जुनी तलवार बघतात आणि तिच्या मोहात पडतात. मोरे पाटलांची ती 'खानदानी' तलवार. तुरे पाटलांनी 'नाहीतरी तुझ्या घरी ती ट्रंकेतच पडून आहे, त्यापेक्षा मला दे, मी काळजी घेईन' असं आर्जव करूनही मोरे पाटील काही बधत नाहीत. त्यात त्यांना चिथवायला मदत होते ती आत्याबाईंची. (उत्तरा बावकरांनी साकारलेली ही व्यक्तिरेखा केवळ लाजवाब!) तुरे पाटील तलवारीच्या मोबदल्यात काही देऊन 'मैत्री नाही तर नाही, व्यवहारच करू' असाही प्रयत्न करून बघतात. पण यश येत नाही. वितुष्ट मात्र येतं. आणि ते चांगलंच गंभीर रूप घेतं. 

आता दोन्ही पाटील एकमेकांना भेटणं तर सोडाच, एकमेकांकडे पाहायलाही तयार नसतात. मैत्रभाव संपतो आणि अस्सल मानवी द्वेषभाव डोकं वर काढतो. मग एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न सुरू होतात. एका टप्प्यावर दोघांची दिलजमाई होतेही, पण ती क्षणापुरतीच. आधीचं उसवलेलं काही शिवून निघत नाही आणि दोघे दोस्त कोर्टाच्या चकरा मारू लागतात. मैत्रीचा एक निखळ अध्याय संपतो. 

चित्रपटाबाबत पुष्कळ बोलण्यासारखं असलं तरी दोन गोष्टी खास सांगायच्या आहेत. एक म्हणजे मोहन आगाशे आणि दिलीप प्रभावळकर काय ताकदीचे अभिनेते आहेत हे पहायचं असेल किंवा अगदी 'अभिनय म्हणजे काय?' हे शिकायचं असेल तरी हा चित्रपट बघावा. पु. ल. देशपांडे दिलीप प्रभावळकरांबाबत 'असा आर्टिस्ट तिकडे हॉलिवूडमध्ये असता तर त्याने रान पेटवलं असतं' असं एकदा म्हणाले होते. त्याची खात्रीच पटते! मोहन आगाशे ही काय चीज आहे हेही वेगळं सांगायची गरज नाही.  'बेगम बर्वे' आणि 'घाशीराम कोतवाल'मधून प्रेक्षकांची विकेट घेणारे आगाशे इथेही अभिनयाचा जो मानदंड समोर ठेवतात त्याला तोड नाही. या दोघा कसलेल्या अभिनेत्यांची जुगलबंदी या चित्रपटाला अफाट उंचीवर नेऊन ठेवते. 

दुसरं म्हणजे एखाद्या वस्तूची अभिलाषा आपल्याला काय काय गमवायला लावते याचा प्रत्यय हा चित्रपट देतो. एका वस्तूसाठी तुरे पाटील हट्ट धरतात, तो ताणतात आणि पुढे मग हा हट्ट मैत्रीच्याही डोक्यावर बसतो! आता ती तलवार मोरे पाटलांच्याही उपयोगाला येत नव्हती हे खरं, पण ती अगदी 'जीवनावश्यक' गोष्टसुद्धा नव्हतीच. अशावेळी अभिलाषा सोडायची की मैत्री? वस्तूच्या लालसेपायी माणसात विकार प्रवेश करतो आणि बघता बघता त्याच्या नियंत्रणाबाहेर जात त्याच्याही नकळत तो त्या माणसावर कसा राज्य गाजवू लागतो हे या चित्रपटात दिसतं. एखाद्या क्षुल्लक गोष्टीमार्फत सूक्ष्मपणे माणसात हा कली कसा शिरतो आणि हसत्या खेळत्या नात्याची कशी धूळधाण करतो हे बघणं चकित करतं, उदास करतं आणि महत्त्वाचं म्हणजे काही कानपिचक्याही देऊन जातं. 

दोन गणपतरावांची ही गोष्ट मी कधीही बघू शकतो. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर आणि इतरही सगळ्यांच्या अभिनयासाठी, शांता गोखले यांच्या बांधीव पटकथेसाठी, सतीश आळेकरांच्या संवादासाठी आणि अरुण खोपकरांचा कॅमेऱ्यामागचा डोळा आणि दिग्दर्शकीय दृष्टी जे 'दर्शन' घडवते त्यासाठी!  

(दिव्य मराठी, मधुरिमा)