Friday, December 5, 2014

द ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी : दिल ढूँढता है!

सौंदर्य हे एक अजब रसायन आहे. (आणि सौंदर्याचा आस्वाद ही एक अजब रसनिष्पत्ती आहे!) मुळात सौंदर्य म्हणजे नक्की काय यावर आणि त्याच्या आजूबाजूच्या अनेक अंगांवर सौंदर्यमीमांसेच्या क्षेत्रात तात्त्विक दृष्टीने घणाघाती चर्चा होत असते. यात सौदर्याबरोबरच 'कला म्हणजे काय?' याचाही अंतर्भाव होतो. संकल्पना, अनुभव आणि सामाजिक संदर्भ या सर्व बाजूंनी एक मूलगामी शोध म्हणून अशा विषयांचं महत्त्व आहेच. पण कधीकधी मात्र पुलंच्या 'एक नवे सौंदर्यवाचक विधान' या लेखातील पात्राच्या (म्हणजे 'मी'च्या) धर्तीवर सौंदर्याचे काही खुलासे करायचा मोह होतो. यातला 'मी' मित्राशी बोलताना चहाच्या भांड्यात साखर टाकता टाकता 'सौंदर्य म्हणजे….' म्हणत कॉलेजातील काही मुलींचा उल्लेख करतो. तसंच मला,  अगदी व्यक्तीकेंद्री होत,  'सौंदर्य म्हणजे मेरिल स्ट्रीप' असं विधान धाडकन करावसं वाटतं! 

मेरिल स्ट्रीप आठवायचं कारण म्हणजे 'द ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी'. क्लिंट ईस्टवूड या हॉलीवुडमधल्या नामांकित दिग्दर्शक, अभिनेता, निर्मात्याचा १९९५ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट. या चित्रपटाचा (एक) निर्माता, दिग्दर्शक आणि नायक तोच आहे. रॉबर्ट वॉलर या लेखकाच्या याच नावाच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट एका अमेरिकन गृहिणीच्या चार दिवसांच्या प्रेमानुभवाची ('अफ़ेअर'साठी हा शब्द कसा वाटतो?) कथा सांगतो. 

चित्रपट सुरू होतो तो फ्रँचेस्का जॉन्सन (मेरिल स्ट्रीप) हिच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर. तिच्या मृत्यूनंतर तिच्या इस्टेटीबाबतचे निर्णय घ्यायला तिची मुलं (मुलगा मायकेल, मुलगी कॅरोलिन) तिच्या घरी आलेले आहेत. फ्रांसेस्काच्या एका जुन्या पेटीत कॅरोलिनला काही गोष्टी सापडतात. या गोष्टींमधून दोघांनाही आपल्या आईच्या भूतकाळातील एक गोष्ट उलगडत जाते. ही गोष्ट म्हणजेच 'द ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी' हा चित्रपट. 

आयोवा राज्यातील 'मॅडिसन काऊंटी'मध्ये राहणारं एक कुटुंब. नवरा-बायको आणि त्यांची दोन मुलं. नवरा आणि दोन्ही मुलं चार दिवसांसाठी बाहेरगावी गेले असताना फ्रांसेस्का जॉन्सनला रॉबर्ट किनकेड (क्लिंट ईस्टवूड) हा नॅशनल जिऑग्राफिकमध्ये काम करणारा छायाचित्रकार भेटतो. तो इथले प्रसिद्ध पूल बघायला आणि त्यांचे फोटो घ्यायला आला आहे. पत्ता विचारायला आलेल्या रॉबर्टला फ्रँचेस्का एक पूल दाखवायला घेऊन जाते आणि दोघांची मैत्री होते. मैत्री पुढे सरकते आणि दोघांनाही 'देअर इज समथिंग बिटवीन अस' ही जाणीव होते. प्रेम पुढे जातंच, पण हे दोघं अखेरीस मागे होतात आणि गोष्ट तिथेच संपते. 

चित्रपटाची कथा घडते ती १९६५ मध्ये. लग्नसंस्था आज जितकी भक्कम आहे त्यापेक्षा पुष्कळ अधिक भक्कम असलेला हा काळ आहे. खरं सांगायचं तर फ्रँचेस्काला रॉबर्टबद्दल जे वाटतं ते त्या काळातील एका गृहिणीला इतक्या सहजी वाटेल का आणि वाटलं तरी ती ते प्रत्यक्षात आणेल का असा प्रश्न चित्रपट बघताना कदाचित काहीजणांना पडू शकेल, पण फ्रँचेस्कामध्ये क्रमाक्रमाने होत जाणारे बदल, तिचं रॉबर्टविषयीचं वाढतं आकर्षण हाच चित्रपटातला रोचक धागा आहे आणि मेरिल स्ट्रीपने या भूमिकेला जे रंगवलं आहे ते विलक्षण प्रभावी आहे. दोन तासात मांडलेली प्रेमकथा आवडण्यासाठीचा जो एक महत्त्वाचा निकष असतो तो म्हणजे ते प्रेम प्रेक्षकाला 'कन्व्हिंसिंग' वाटायला लागतं, किंबहुना हे घडायलाच हवं आता' असं जेव्हा प्रेक्षकाला त्या व्यक्तिरेखांबाबत आतून वाटायला लागतं तेव्हा ती प्रेमकथा त्याच्यापर्यंत पोचलेली असते. हे कन्व्हिन्स करण्यासाठी दोघे अभिनेते ताकदीचे लागतात आणि इथे तर दोघे पॉवरहाऊस परफॉरमर्स आहेत! त्यामुळे या दोघांच्या बाबतीत ते पुरेपूर घडतं.

चित्रपटात दोघांचं मानसिक पातळीवर जसं नातं तयार होतं तसंच ते शारीर पातळीवरही होतं. यातला शारीर पातळीवरचा संबंध दिग्दर्शकाने फार परिणामकारकपणे चित्रित केला आहे. शारीरिक जवळीक दाखवताना त्या दोघांचं एकमेकातलं 'रमलेपण' जेव्हा प्रेक्षकापर्यंत पोचतं तेव्हा त्यातील सौंदर्याचा अनुभव लालसेचं कुंपण ओलांडणारा, काही वेगळाच असतो. 

फ्रँचेस्का आणि रॉबर्ट दोघेही आपल्या प्रेमाला इच्छित मुक्कामी नेत नाहीत आणि परत फिरुन आपलं पहिलं आयुष्य जगू लागतात तेव्हा 'इथे काही वेगळं घडू शकलं असतं का?' असा प्रश्न पडतो. पण एक सर्वसामान्य संसारी स्त्री आणि एक सर्वसामान्य मुक्त पुरुष यांची ही कथा प्रेमाची आहे आणि बंधनाचीही आहे. लग्नानंतर काही वर्षांनी कुणीतरी दुसरं माणूस आवडतंय हे मोकळेपणाने एकमेकांना सांगता यावं अशी माझी कल्पना आहे. यातून जे उद्भवू शकतं ते निभावून नेण्यासाठी भावनिक आणि बौद्धिक ताकद लागते हे खरं आहे. पण प्रेमासारख्या निखळ, सच्च्या भावनेला दडपून टाकून तरी आपण कुठे जातो असा प्रश्न पडतो. माणसाचं सामर्थ्य हे त्याच्या व्यवस्थानिर्मितीच्या कौशल्यात, अनेक अवघड गोष्टी 'पेलण्यात' आहे, पण बहुधा आपल्याला आपण निर्माण केलेल्या व्यवस्थेच्या ओझ्यामुळे प्रेम मात्र सहजासहजी 'पेलत' नाही हे खरं! त्यामुळे अशी एखादी कथा चटका लावून जाते. अर्थात 'प्रेमाच्या नियोजना' बद्दल स्वतंत्रपणे विचार होऊ शकेल, त्यामुळे सध्या फक्त आस्वादकाच्या भूमिकेतून  फ्रांसेस्का आणि रॉबर्टकडे बघत 'चीअर्स' म्हणूया!  

(दिव्य मराठी, मधुरिमा)

No comments: