Saturday, September 6, 2014

ओ कॅप्टन! माय कॅप्टन!

रॉबिन विल्यम्स ही काय जादू आहे ते पहिल्यांदा कळलं 'मिसेस डाऊटफायर'मुळे. त्यावेळी 'इंग्लिश पिक्चर' या सदरात प्रामुख्याने अर्नोल्ड श्वार्झनेगर नावाच्या एका महाकाय प्रकरणाचा अंतर्भाव होत असे. आम्ही त्याच्याकडे दिपून गेल्यासारखे बघत होतो आणि त्याच्या दंडांची मापे इतरांना सांगण्यात धन्यता मानत होतो. कमांडो, टर्मिनेटर, ट्रू लाईज वगैरेंनी मनावर गारूड केलं होतं. अर्नोल्ड श्वार्झनेगर हा 'इंग्लिश पिक्चर'मधला अंतिम शब्द होता. अशा उन्मनी अवस्थेत असताना 'मिसेस डाऊटफायर' आला. १९९३ मध्ये. तो बघितला गेला त्यानंतर काही वर्षांनी. तोपर्यंत 'अभिनय म्हणजे काय?' या विषयात थोडी प्रगती झाली होती आणि म्हणूनच मग 'मिसेस डाऊटफायर' या एका चित्रपटातून रॉबिन विल्यम्सने कब्जा घेतला. 

चित्रपटाची सुरुवात होते ती एका स्टुडिओत. स्क्रीनवरच्या अ‍ॅनिमेटेड पक्ष्यांना रॉबिन विल्यम्स आपला आवाज देतोय. एका क्षणी त्याचा तिथल्या संयोजकाशी खटका उडतो आणि तो हेडफोन तिथेच टाकून बाहेर पडतो. पण संयोजकाशी बोलत  बाहेर पडताना पाचच सेकंदासाठी बेन किंग्जलेच्या 'गांधी'ची हुबेहूब आवाजात जी लाजवाब नक्कल तो करतो त्याने मी अवाक झालो होतो. आवाजावर कमालीची हुकूमत असणारा हा अभिनेता खराखुरा बहुरूपी आहे हे पुढे चित्रपटातून दिसलंच आणि रॉबिन विल्यम्स आवडता झाला!

आपल्याकडे 'मिसेस डाऊटफायर' अधिक माहीत झाला तो या चित्रपटावर बेतलेल्या कमल हसनच्या चाची ४२० मुळे. (चाची ४२० ला मूळ चित्रपटाची सर नाही हे सांगायला हरकत नसावी.) व्हॉईस आर्टिस्ट असणारा डॅनियल हिलार्ड (रॉबिन विल्यम्स),  मोठ्या पगाराची नोकरी करणारी त्याची बायको मिरांडा (सॅली फील्ड) आणि त्यांची तीन मुलं. नवऱ्याच्या कलेबद्दल कौतुक असणारी पण त्याच्या मनस्वीपणाचा त्रासही होणारी मिरांडा अखेरीस घटस्फोटाचा निर्णय घेते आणि डॅनियल मुलांपासून वेगळा होतो. वेगळं घर घेऊन राहू लागतो. मिरांडा मुलांसाठी 'बेबीसिटर' शोधते आहे हे कळल्यावर तो स्वतः स्त्रीवेषात तिच्याकडे जातो आणि आपल्या लाघवी स्वभावाने, घरकामातील कौशल्याने आणि मुख्य म्हणजे मुलांशी जमवून घेण्याने मिरांडाचं मन जिंकून घेतो. पुढे मग यथावकाश सगळा उलगडा होतो आणि कथा एका वळणापाशी संपते.           

'मिसेस डाऊटफायर' हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा चित्रपट. कथेचं वेगळेपण आणि रॉबिन विल्यम्सचा कमाल अभिनय हे तर होतंच, पण कुटुंबाच्या सरधोपट व्याख्येला आणि बाप हा एक कडक, रागीट, आपल्या मुलांमध्ये कमीत कमी रस घेणारा शिस्तबद्ध पुरूष असला पाहिजे या गृहीतकाला या चित्रपटाने तडा दिला. मुलांमध्ये मूल होऊन मिसळणारा हा बाप बघताना पुलंचे 'चितळे मास्तर' आठवले आणि हे दोघेही मायनॉरिटीमध्ये आहेत हे जाणवलं. रॉबिन विल्यम्सने साकारलेला डॅनियल हिलार्ड हा खरंच बापमाणूस होता! विशेष म्हणजे त्याच्यातला प्रेमळ बाप दाखवताना तो नवरा म्हणून सद्गुणांचा पुतळा आहे असं दाखवायचा अट्टाहास हा चित्रपट करत नाही. त्याचं आणि मिरांडाचं नातं एका क्षणी तुटतं तेव्हा तिची बाजूही आपल्याला कळत असते. कलंदर वृत्तीचा कलाकार नवरा आणि व्यवहारात पाय घट्ट रोवून उभी असलेली बायको बघताना आपली सहानुभूती दोघांनाही जाते. आणखी एक विशेष म्हणजे चित्रपट सकारात्मक रीतीने संपतो पण तो '…आणि मग ते दोघे पुन्हा एकत्र आले व सुखाने नांदू लागले' छापाने नव्हे. दोघांचा घटस्फोट कायमच राहतो, फक्त डॅनियलला आता स्त्रीवेषात 'मिसेस डाऊटफायर' बनून बायकोच्या घरी जाऊन मुलांना सांभाळायचं नसतं. आपली मुलं वडिलांपासून दूर राहू शकत नाहीत हे मिरांडाला उमगलेलं असतं आणि म्हणून ती मुलांचा नवीन बेबीसिटर म्हणून डॅनियलला बोलावते. कुटुंब या महत्त्वाच्या संस्थेला धक्का न लावता, फक्त आई-बाबा-मुलं म्हणजेच कुटुंब असं नाही, कुटुंबाचे विविध प्रकार असू शकतात आणि सर्व प्रकारात समजुतीने निर्णय घेऊन, प्रसंगी एकमेकांपासून दूर होऊन माणसं आनंदात राहू शकतात हा एक महत्त्वाचा विचार ही चित्रपट अधोरेखित करतो.

चित्रपटातील विविध प्रसंगातील बारकावे बरेच सांगता येतील. पण मला आत्ता अर्थातच सारखा आठवतोय तो रॉबिन विल्यम्स. या अभिनेत्याने टाकलेला प्रभाव अद्वितीय आहे. माणसातला निखळपणा, मूलपणा, प्रेमळपणा त्याने आपल्या भूमिकांमधून जिवंत केला. मिरांडाने घटस्फोट मागितल्यावर आणि मुलांना आपल्यापासून वेगळं करण्यात येतंय हे समजल्यावर अतीव कळवळलेल्या डॅनियलचा चेहरा अजूनही नजरेसमोर आहे. आणि त्याच डॅनियलचा मुलांबरोबर असतानाचा आनंदलेला चेहराही. ‘डेड पोएट्स सोसायटी’ मधला त्याने साकारलेला कवी प्राध्यापक विसरणं अशक्य आहे. डिस्नेच्या 'अल्लादीन' मधल्या जीनीचा अफलातून व्हॉईस ओव्हर त्याचाच. रॉबिन विल्यम्सने आत्महत्या केली याचा धक्का तर बसलाच. पण नंतर असं वाटलं की यात खरं तर नवल नाही. तो बहुधा 'टोकांवर जगणारा'च माणूस होता. अनेक मनस्वी कलाकारांसारखा. त्यांना अनुभवाचीच ओढ असते. त्यामुळे मृत्यूच्याही अनुभवाची ओढ त्यांना नाही वाटणार तर कुणाला?            

(दिव्य मराठी, मधुरिमा)