Friday, August 8, 2014

एक रूका हुआ फैसला - न्यायाचा अंतःस्वर

छोटी सी बात, रजनीगंधा, खट्टा-मीठा, चितचोर, पिया का घर (हा चित्रपट म्हणजे आपल्या 'मुंबईचा जावई' या राजा ठाकूर दिग्दर्शित चित्रपटाचा रीमेक) ही सत्तरीतल्या काही चित्रपटांची नावं घेतली की मनात एका साध्या-सरळ आनंदाचा गहिवर दाटून येतो. तुमच्या-माझ्यासारख्या प्रत्येकाची, त्याच्या/तिच्या कुटुंबाची कथा किंवा कथेचा एखादा तुकडा दिसेल असे हे चित्रपट आणि त्यातील व्यक्तिरेखा. बासु चॅटर्जी यांनी सांगितलेल्या या गोष्टी अनेकांना आपल्या वाटल्या आणि त्यांच्या चित्रपटांचा एक मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. पुढे बासु चॅटर्जींनी 'रजनी' आणि 'ब्योमकेश बक्षी' या लोकप्रिय मालिकांचंही दिग्दर्शन केलं. त्यांचे काही निवडक चित्रपट मात्र चांगलेच 'हटके' होते. १९८६ साली आलेला 'एक रूका हुआ फैसला' त्यापैकीच एक. 12 Angry Men या अतिशय गाजलेल्या आणि अतिशय परिणामकारक चित्रपटाचं हे भारतीय रूप त्याच ताकदीचं, खिळवून ठेवणारं आहे. 

झोपडीत राहणाऱ्या एका मुलावर आपल्या वडिलांचा खून केल्याचा आरोप आहे. या केसवर कोर्टात सात दिवस चर्चा झालेली आहे आणि आता न्यायाधीशांनी १२ ज्यूरी मेंबर्सना केसवर अंतिम विचार करून तो मुलगा दोषी आहे की नाही हा निर्णय द्यायला सांगितलं आहे. त्यासाठी या बाराजणांना एका बंद खोलीत बसून या केसवर विचार करायचा आहे. हे बाराही जण वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे, समजातील वेगवेगळ्या स्तरातून आलेले आहेत. ते एकत्र बसून चर्चेला सुरुवात करतात. बहुतेकांच्या मते ही आता अगदी 'ओपन अँड शट' केस आहे. शंकेला जागाच नाही. तो मुलगा शंभर टक्के दोषी आहेच! सुरुवात होतानाच सार्वमत घ्यायचं ठरतं आणि बारापैकी एकजण - ज्यूरर क्रमांक ८ (के. के. रैना) - 'दोषी नाही' असं मत देतो. त्याचं म्हणणं असतं की हा त्या मुलाच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे, त्यमुळे सर्व बाजूंनी चर्चा झाल्याशिवाय घाईने निर्णय घेता येणार नाही. इतर अकरांपैकी काहींचा मात्र विरस होतो, कारण त्यांच्या मते सात दिवस चाललेल्या चर्चेनंतर पुन्हा चर्चेची खरं तर गरजच नसते. त्यामुळे आता पुन्हा इथे वेळ जाणार या विचाराने त्यांचा त्रागा सुरू होतो. 

इथून पुढची सारी चर्चा, ज्यूरर्सचे उद्रेक, मतभिन्नता, टोकाची वादावादी हे सगळं बघताना आपण अंतर्मुख होऊ लागतो. के. के. रैना आपलं म्हणणं अतिशय शांतपणे, अजिबात विचलित न होता, एकदाही आवाज न चढवता मांडत राहतो आणि आपली बाजू पटवत राहतो. सगळी केस तो पुन्हा उभी करतो. त्याच्या युक्तीवादाने एकजण त्याच्या बाजूला जातो आणि चित्रपट संपतो तेव्हा अकराच्या अकरा जण त्याच्या बाजूला असतात!

समाजाचं प्रातिनिधिक चित्र उभं करणारा 'एक रूका हुआ फैसला' आपल्याला चांगलाच झटका देतो आणि बहुसंख्य लोकांच्या विचारपद्धतीवर विचार करायला भाग पाडतो. पुढ्यातल्या कुठल्याही प्रश्नाचं विश्लेषण (मग तो प्रश्न सामाजिक, व्यक्तिगत, व्यवस्थात्मक -  कोणताही असो) वैज्ञानिक पद्धतीने, पूर्वग्रह, भावनिक कल बाजूला ठेवून, व्यक्तिगत अनुभव, निष्कर्ष यावर अवास्तव भर न देता, केवळ 'सत्य काय आहे' या एकाच उद्दिष्टाने व्हायला हवं. ते करण्यात आपण बरेचदा कमी पडतो आणि मग तार्किक विश्लेषणापेक्षा भावना किंवा 'मला काय वाटतं' हे आपल्यावर अधिराज्य गाजवू लागतं. दुसरं म्हणजे चित्रपटात के. के. रैनाचं पात्र ज्या शांतपणे सगळं हाताळतं ते उल्लेखनीय आहे. अर्थात मोठ्या स्केलवरील विविध प्रश्नांचा विचार करताना हे लक्षात येतं की आंदोलनात, सामाजिक चळवळीत न्याय्य हक्कांसाठी आवाज चढवायलाच लागतो, धरणं द्यायलाच लागतं - तिथे शांतपणाचा तसा उपयोग होत नाही. पण हा शांतपणाचा, न्यायाचा 'अंतःस्वर' महत्त्वाचा आहे. रणनीतीचा भाग म्हणून आवाज चढवताना तो 'रणनीतीचा भाग' आहे याचं भान असणं आवश्यक असतं. मूळ उद्देश हाच की समोरच्या माणसामध्ये मुळातून परिवर्तन व्हावं. त्याला विचार करायची योग्य पद्धत गवसावी. 

'एक रूका हुआ फैसला' एक केस सोडवता सोडवता ती सोडवणाऱ्या माणसांचे आतले गुंते अतिशय प्रभावीपणे समोर मांडतो. सशक्त लेखन असणाऱ्या या चित्रपटातील कलाकारही कमाल आहेत. विशेषतः अन्नू कपूर आणि पंकज कपूरच्या भूमिका म्हणजे अभिनयाचा वस्तुपाठ आहेत. 

'शांतता! कोर्ट चालू आहे' जसं आपल्याला 'सोलून' काढतं तसाच अनुभव हा चित्रपट बघताना येतो. मात्र 'शांतता…' सामान्य दिसणाऱ्या माणसांचं भीषण 'असामान्यत्व' दाखवत शेवटाकडे आपल्याला उन्मळून पाडतं तसं न होता हा चित्रपट एका पॉझिटिव्ह नोटवर संपतो. विजय तेंडुलकरांनी वाचकाला 'साहित्यातून रखरखीत सत्याकडे' नेलं तसं ही कलाकृतीदेखील करते पण शेवटी आपल्याला दिलासाही देते. आणि सामाजिक संदर्भात विचार करताना आणि काम करताना आतली ज्योत तेवती ठेवण्यासाठी असा दिलासा मिळणं कधीकधी फारच गरजेचं असतं!

(दिव्य मराठी, मधुरिमा)