Thursday, February 20, 2014

'दृष्टी' देणारा 'शौर्य'


समर खान या दिग्दर्शकाचा 'शौर्य' हा चित्रपट बघण्याआधी मी त्याचा 'कुछ मीठा हो जाए' हा एक हलकाफुलका चित्रपट पाहिला होता.  'शौर्य' हा त्याचा दुसरा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 'अ फ्यू गुड मेन' या गाजलेल्या अमेरिकन चित्रपटावर आधारित आहे असं कळलं होतं. मी तोपर्यंत 'अ फ्यू गुड मेन' पाहिला नव्हता. पण 'शौर्य' पाहिला गेला. आणि तो अतिशय आवडला! कोर्ट मार्शलची एक केस, त्याच्याशी संबंधित नौदलातील एक मोठा अधिकारी आणि त्याला अखेरीस अटक असं  'अ फ्यू गुड मेन'चं साधारण सूत्र होतं. 'शौर्य'मध्ये हा धागा कायम आहे. फक्त कथा मात्र भारतीय लष्करात घडणारी आहे. 

चित्रपट सुरू होतो तो सिद्धांत (राहुल बोस) आणि आकाश (जावेद जाफरी) या आर्मीत वकील असणाऱ्या दोन मित्रांपासून. सिद्धांतचे वडील सीमेवर लढताना मारले गेले आहेत. वडिलांच्या आठवणीने कमालीचा अस्वस्थ होणाऱ्या सिद्धांतचं एक रूप 'हॅप्पी गो लकी' असं आहे. तो एकूणच आयुष्याच्या आणि करिअरच्या बाबतीत फारसा गंभीर नाही. आकाश मात्र गंभीर प्रकृतीचा आहे. दोघांची मैत्री अभेद्य आहे. काश्मीरमध्ये कॅप्टन जावेद (दीपक डोबरियाल) आपल्या कमांडिंग ऑफिसरला गोळी घालून मारतो म्हणून त्याच्यावर खटला सुरू होतो तेव्हा त्यात डिफेन्स काउन्सेल म्हणून सिद्धांतला त्या केसवर आणण्यासाठी आकाश प्रयत्न करतो. तो स्वतः सिद्धांतच्या विरुद्ध केस लढणार आहे. कॅप्टन जावेद अटक झाल्यापासून एक अक्षरही बोलत नाहीये, त्याला गोळी चालवताना त्याच्या सहकारी जवानांनी पाहिलं आहे, त्यामुळे ही अगदी 'ओपन अँड शट' अशी केस आहे, सिद्धांतला फारसं काही करायला लागणार नाही याची आकाशला खात्री आहे. आपल्या आळशी मित्राला एक सोपी केस मिळवून देणे इतकाच आकाशचा उद्देश आहे.

केस सुरू होते आणि मग मात्र सिद्धांत त्यात गुंतत जातो. काहीही न बोलणाऱ्या कॅप्टन जावेदकडे खरं तर बोलण्यासारखं खूप काही आहे याचा सिद्धांतला हळूहळू उलगडा होऊ लागतो आणि तो केसच्या मुळाशी जायचा आटापिटा करू लागतो. यात त्याच्याबरोबर आहे काव्या शास्त्री (मिनिषा लांबा) -  एक पत्रकार. मेजर राठोड हा कॅप्टन जावेदचा कमांडिंग ऑफिसर स्वभावाने कसा होता,  त्याला गोळी घालावी असं जावेदला का वाटलं याचा शोध घेताना सिद्धांत पोचतो ब्रिगेडियर रूद्रप्रताप सिंग (के के मेनन) पर्यंत. ब्रिगेडियर प्रताप हा नावासारखाच भारदस्त माणूस. बुद्धिमान, अहंकारी, स्वतःच्या सैन्यात असण्याचा अभिमान असलेला आणि जगण्यातील उच्च अभिरूची जोपासणारा - अभिजनवादी विचारांचा पक्का पुरस्कर्ता! ब्रिगेडियर प्रताप आणि मेजर राठोड यांच्यात काहीतरी नातं आहे आणि या दोघांचीही हिंदुत्वाबाबतची वैचारिक धारणा सारखी आहे हे सिद्धांतला उमगतं आणि निर्दोष मुस्लिमांना एका सर्च ऑपरेशनच्या दरम्यान बिनदिक्कतपणे मारून टाकणाऱ्या मेजर राठोडला जावेदने नाईलाजाने गोळी घातली हे सत्य अखेरीस समोर येतं. राठोडचा पाठीराखा असलेल्या प्रतापला अटक करण्यात येते आणि जावेद निर्दोष सुटतो. 

अतिशय बांधीव पटकथा, ताकदीचे संवाद आणि कमाल अभिनय ही 'शौर्य'ची तीन बलस्थाने आहेत. चित्रपट प्रभावी असला तरी हिंदू-मुस्लिम मुद्द्याचं या चित्रपटात सुलभीकरण केलं गेलं आहे असं काही समीक्षकांचं मत होतं. मी स्वतः चित्रपटातील कथेकडे फक्त हिंदू-मुस्लिम संदर्भातच न बघता थोड्या अधिक व्यापकपणे बघतो. आपल्या बायकोवर आणि मुलीवर घरातील मुस्लिम नोकराने एके दिवशी बलात्कार केला आणि त्यांचा खून केला म्हणून सर्व मुस्लिमांवर पेटून उठलेला प्रताप सिद्धांतच्या प्रश्नांना कोर्टात तीक्ष्ण उत्तरे देतो तेव्हा एका मोठ्या जबाबदार अधिकाऱ्याच्या मनातील द्वेषाचा, त्याच्या आततायी वागण्याचा राग येतोच पण दुसरीकडे त्याचं व्यक्तिगत दुःखही आपण अमान्य करत नाही. आणि इथेच हा चित्रपट आपल्याला काही 'मूलभूत' सांगू पाहतो.  

हे 'मूलभूत' काय? तर ते हे की माणसाच्या दुःखाशी कुणाचंच वैर नाही. माणसाला दुःख आहे, समाजजीवनात शेकडो प्रश्न आहेत आणि हे नाहीसं कसं करायचं हा सगळ्यावर कडी करणारा महाप्रश्न आहे! तेव्हा या सगळ्याबद्दल सहानुभूती असली तरी माणूस म्हणून आपली धारणा काय? आपण सूडाच्या भावनेत जगत सुखी राहू शकू का? आपण आपल्या दुःखाचं विश्लेषण कसं करतो? याची उत्तरं शोधणं आपल्याला भाग आहे. सिद्धांत प्रतापला प्रश्न विचारतो की सगळ्या मुस्लिमांना नाहीसं करणं हे जर तुझं उत्तर असेल तर मग ज्याने मार्टिन ल्यूथर किंगला मारलं किंवा ज्याने गांधीजींना मारलं त्याच्या धर्माच्या सगळ्या माणसांना मारून टाकायचं का? तेव्हा प्रश्न हा की आपण आपल्याला व्यक्तिगत दुःख देणाऱ्या माणसाकडे माणूस म्हणून बघतो की लेबलं लावून बघतो ?

धर्माला राष्ट्रवादाचा आधार करण्याचे प्रयत्न होत असताना सम्यक दृष्टी, समता, न्याय आणि स्वातंत्र्य हेच कुठल्याची देशाच्या राष्ट्रीयतेचे आधारस्तंभ असायला हवेत हे पुन्हा पुन्हा सांगण्याची आज गरज आहे. या पार्श्वभूमीवर 'शौर्य'सारखा चित्रपट एक मोठीच दृष्टी देऊन जातो!  

(दिव्य मराठी, मधुरिमा)