Friday, June 13, 2014

हजारों ख्वाहिशें ऐसी : गोष्ट हातातली, पण हातात नाही!

सुधीर मिश्रा हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं ते 'इस रात की सुबह नही' या चित्रपटामुळे. १९९६ साली आलेला हा चित्रपट कॉलेजमध्ये असलेल्या आम्हाला फारच आवडून गेला होता. पुढे १९९८ मध्ये रामगोपाल वर्माचा 'सत्या' प्रदर्शित झाला आणि त्याने हिंदी चित्रपटांना वास्तवदर्शी वळण दिलं. पण सत्याच्याही आधी सुधीर मिश्रांनी 'इस रात की…' मधून मुंबईचं एकमेकात गुंतलेलं वास्तव दाखवलं होतं. त्याच्याही आधी 'धारावी'सारख्या चित्रपटातूनही त्यांनी मुंबई समोर आणली होती. अर्थात 'सत्या'ला पूर्णपणे 'अंडरवर्ल्ड' पार्श्वभूमी होती आणि चित्रपटाचा 'सिनेमॅटिक' परिणाम कमाल होता हे खरं!

पुढे २००५ मध्ये सुधीर मिश्रांनी 'हजारों ख्वाहिशें ऐसी' केला आणि मी हलून गेलो. इतका मुळापासूचा अस्वस्थ, इतका तरूण, इतका आर्त, खोलवरचा अनुभव देणारा आणि त्याचवेळी इतका रोमँटिक चित्रपट? सुधीर मिश्रांचं आमच्या लिस्टमधलं स्थान एकदम वर गेलं! 'हजारों ख्वाहिशें ऐसी'ने फार म्हणजे फार क्वचित येऊ शकेल असा जळजळीत अनुभव दिला होता.  

ही तीन मित्रांची कथा आहे आणि चित्रपटाच्या ओपनिंग स्क्रोलमध्ये म्हटल्याप्रमाणे 'अनेक दिशांनी ओढल्या जाणाऱ्या' भारतातल्या एका काळाचीही ही गोष्ट आहे. सत्तरचं अस्वस्थ दशक. स्वातंत्र्यानंतर केंद्रस्थानी स्थिरावलेली काँग्रेस. इंदिरा गांधींचा उदय आणि त्यांचा काँग्रेसवर प्रस्थापित झालेला एकछत्री अंमल. १९७४ साली जयप्रकाश नारायण यांनी दिलेला 'संपूर्ण क्रांती'चा नारा आणि मग १९७५ साली लागू झालेली आणीबाणी. पश्चिम बंगालमधील नक्षलबारीमध्ये १९६७ मध्ये सुरू झालेल्या कडव्या डाव्या चळवळीने या दशकात आपली मुळं पसरायला सुरूवात केली होती. २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ ही दोन वर्षे भारताच्या राजकीय-सामाजिक इतिहासात घुसळण घडवून आणणारी वर्षे ठरली. 

'हजारों ख्वाहिशें ऐसी' घडतो तो हा अस्वस्थ काळ आहे. सिद्धार्थ तय्यबजी (केके मेनन), विक्रम मल्होत्रा (शायनी आहुजा) आणि गीता राव (चित्रांगदा सिंग) हे तिघे कॉलेजमधले मित्र. सिद्धार्थ एका श्रीमंत घरातला, निवृत्त न्यायाधीशाचा मुलगा, पण आतून क्रांतीच्या कल्पनेने पेटलेला. गीता लंडनहून परतलेली एक दाक्षिणात्य मुलगी. सिद्धार्थच्या विचारांच्या प्रभावात असलेली. विक्रम एका मध्यमवर्गीय घरातला, गांधीवादी वडिलांचा मुलगा. त्याला वडिलांबद्दल प्रेम आहेपण वडिलांच्या आदर्शांचा काहीसा जाचही आहे. त्याचं गीतावर मनापासून प्रेम आहे आणि मोठा व्यावसायिक होण्याची त्याची इच्छा आहे. गीता मात्र सिद्धार्थच्या प्रेमात बुडालेली आहे. 

तिघांच्या वाटा एका टप्प्यावर वेगळ्या होतात. जात आणि सरंजामशाहीच्या वरवंट्याखाली भरडल्या जाणाऱ्या बिहारमधल्या खेड्याकडे सिद्धार्थ निघतो. विक्रम दिल्लीत राजकीय वर्गाशी सलगी वाढवत आपलं स्थान पक्कं करू लागतो आणि गीता पुढच्या शिक्षणासाठी ऑक्सफर्डला जाते. 

काही वर्षांनी गीता आणि विक्रम एका पार्टीत भेटतात. विक्रम आता दिल्लीत 'फिक्सर' म्हणून चांगला स्थिरावला आहे. गीताने एका आयएएस ऑफिसरशी लग्न केलं आहे. 'सिद्धार्थ कुठे आहे?' या विक्रमच्या प्रश्नाला उत्तर न देता गीता निघून जाते. मात्र विक्रमला त्याचा पुढे उलगडा होतो. सिद्धार्थ आणि गीता एकमेकांना भेटतात हे त्याला कळतं. गीता कालांतराने नवऱ्याला सोडून सिद्धार्थबरोबर खेड्यात काम करू लागते. विक्रमचं गीतावरील प्रेम आजही तसंच आहे, ती आपली होऊ शकणार नाही हेही त्याला माहीत आहे, बिहारमधला संघर्ष तीव्र होतो आणि गीता-सिद्धार्थ दोघेही पोलिसांच्या हाती लागतात. गीताचा नवरा तिची सुटका करतो, पण सिद्धार्थ अडकतो. गीतावरील प्रेमापोटी, तिच्या विनंतीवरून सिद्धार्थचा माग काढत विक्रम बिहारमध्ये पोचतो आणि ध्यानीमनी नसताना संकटात सापडतो. एका भीषण मारहाणीत तो कायमचा जायबंदी होतो. 

क्रांतीचा मार्ग चोखाळणारा सिद्धार्थ सगळ्यातून बाहेर पडायचं ठरवतो आणि इंग्लंडला मेडिकलचा अभ्यास करण्यासाठी जातो. गीता मात्र विक्रमबरोबर थांबते.

मी या चित्रपटाशी खूप जास्त रिलेट करू शकलो याचं कारण म्हणजे भोवतीचं जग बदलायला तडफडणारा आणि त्याचवेळी स्वतःशी झगडणारा सिद्धार्थ, आदर्श आणि व्यवहार यांची कसरत करणारा, 'तडप' सहन करीत प्रेम करणारा विक्रम हे दोघेही मला फार जवळचे वाटले. डाव्या विचारांनी भारावलेल्या, परात्मतेचा अनुभव घेणाऱ्या, पण त्याचवेळी व्यवहाराच्या ऊबेला नाईलाजाने शरण जाणाऱ्या कुणालाही या कथेत आपली कथा दिसू शकेल. १९७५ पासून आजपर्यंत काळ खूप बदलला आहे आणि समाजबदलाच्या मार्गांनीही वेगवेगळी वळणं घेतली आहेत. मात्र बुद्धिमान आणि संवेदनशील माणसांच्या मनाच्या तळाशी असलेल्या 'हजारों ख्वाहिशें' तशाच आहेत. या माणसांचे काही मूलभूत गुणधर्म अजूनतरी बदललेले नाहीत. आयुष्याकडून खूप काही मागणाऱ्या अशांपैकीच तिघांची ही कथा. हिंदीतील उत्तम राजकीय चित्रपटांपैकी एक म्हणून गौरवला गेलेला हा चित्रपट प्रत्ययकारी राजकीय भाष्य तर करतोच, पण तो तीन माणसांच्या जागेवरून भोवताली बघत अन्वयार्थ लावायचा जो प्रयत्न करतो ते विशेष आहे. भगभगीत वास्तव आणि त्याच्याशी भांडायचा प्रयत्न करणारे हे तिघेजण आपल्याला आपलेसे वाटतात कारण ते चित्रपटात खोटे वाटावेत इतके खरे आहेत. 

'हजारों ख्वाहिशें ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले' या गालिबच्या ओळी. आणि गालिबच्या कुठल्याही ओळींइतकाच या चित्रपटाचा अनुभवही विलक्षण आहे!

(दिव्य मराठी, मधुरिमा)