Wednesday, October 11, 2017

सबस्टन्स, स्टाइल...सिनेमा!

हिंदी चित्रपटाला शंभर वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २०१३ साली 'बॉम्बे टॉकीज' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. करण जोहर, झोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी आणि अनुराग कश्यप या चार दिग्दर्शकांच्या चार शॉर्ट फिल्म्स या चित्रपटात होत्या. सगळ्याच फिल्म्स चांगल्या होत्या (करण जोहरची फिल्मसुद्धा!), पण दिबाकर बॅनर्जीची फिल्म (स्टार) जादुई ताकदीची होती. सत्यजीत रे यांच्या कथेवर आधारित ही फिल्म होती. अभिनयाच्या क्षेत्रात अपयशी ठरलेला आणि आता नोकरी-धंदा शोधणारा पुरंदर नावाचा एक इसम (नवाजुद्दीन सिद्दीकी) रस्त्यात शूटिंग बघायला म्हणून थांबतो आणि त्याला अचानक एका मिनिटभराच्या रोलसाठी विचारणा होते. तो 'हो' म्हणतो. त्याला संवाद असा काही नसतो. नायक रस्त्यातून चाललाय आणि त्याला एका माणसाचा धक्का लागतो. तो माणूस म्हणजे पुरंदर. इतकंच. 'माझा डायलॉग काय?' असं पुरंदरने विचारल्यावर दिग्दर्शकाचा सहायक वैतागून त्याला एका कागदावर 'ऐ' असं लिहून देतो. या 'संवादाची प्रॅक्टिस' करायला पुरंदर लोकेशनजवळच्या एका मोकळ्या जागेत जातो तेव्हा तिथे त्याला भ्रम (hallucination) होतो आणि त्याचे नाटकाचे गुरु (सदाशिव अमरापूरकर) भेटतात. या दोघांचा जो संवाद होतो तो या फिल्मचा अर्क आहे. अभिनय, मग तो धक्का लागला म्हणून साधं 'ऐ' म्हणण्याचा असला तरी, गंभीरपणे घ्यायची गोष्ट आहे असं सुचवत पुरंदरच्या निष्क्रिय, चंचल स्वभावावर त्याचा हा एकेकाळचा गुरु नेमकं बोट ठेवतो.

या लहानशा फिल्मच्या प्रभावातून मी आजवर बाहेर आलेलो नाही. दिबाकर बॅनर्जीच्या फिल्म्स मला अतिशय आवडतात आणि या शॉर्ट फिल्मने तर माझ्यावर विशेष गारूड केलं. या फिल्मबद्दल एकदा लिहिलंही होतं. पण मला याच चित्रपटातल्या अनुराग कश्यपच्या फिल्मबद्दल (मुरब्बा) जे वाटलं; किंबहुना या फिल्ममुळे माझ्या मनात जो गोंधळ / संघर्ष उभा राहिला त्याबद्दल लिहायचं आहे. अमिताभ बच्चनचा आज वाढदिवस आहे आणि तोही धागा इथे जुळलेला आहे. खरं तर तो एक मुख्य ट्रिगर आहे.

उत्तर प्रदेशातील एक तरुण त्याच्या आजारी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुंबईला येतो. त्याला अमिताभला भेटायचं आहे आणि वडिलांनी दिलेला 'मुरब्बा' अमिताभला खाऊ घालायचा आहे. अनेक सायास करून तो अखेरीस अमिताभला पाच मिनिटं भेटतो, त्याला आपल्या डोळ्यांसमोर मुरब्बा खाताना बघतो आणि मग परत आपल्या गावी जातो. अशी ही कथा. आता कथेत एक गमतीदार ट्विस्ट आहे, पण ते इथे सांगण्याचं काही प्रयोजन नाही.

ही फिल्म पहिल्यांदा पाहिली तेव्हा मला एकदम वाटलं की अनुराग कश्यपने अमिताभ बच्चनभोवती फिल्म का केली असेल? कारण दिग्दर्शक म्हणून त्याची प्रकृती वेगळी आहे. खरं तर 'बॉम्बे टॉकीज' मधली दिबाकर बॅनर्जीची फिल्म 'सिनेमा आणि सामान्य माणूस' या चित्रपटाच्या मुख्य थीमला सर्वाधिक न्याय देणारी होती. इतर फिल्म्समध्येही सिनेमाचा संदर्भ अर्थातच होता, परंतु दिबाकर बॅनर्जीने 'सिनेमा' या कलेविषयी (त्यातल्या अभिनय या एका प्रमुख अंगाविषयी) काही मूलभूत सांगायचा प्रयत्न केला होता. इतर फिल्म्समध्ये 'सिनेमाचा प्रभाव' आणि त्यातून तयार झालेली गोष्ट हा मुख्य आशय होता. अनुराग कश्यपच्या फिल्ममध्ये सिनेमापेक्षाही 'अमिताभ बच्चनचा प्रभाव' हा मुख्य आशय होता. त्यामुळे दिबाकर बॅनर्जीने जसं सिनेमाकडे एका व्यापक दृष्टीने बघत फिल्म केली तशी अनुराग कश्यपने का नाही केली असा मला प्रश्न पडला होता. दुसरं म्हणजे एखाद्या अभिनेत्याला भेटायला गर्दी करणारे, त्याच्या व्यक्तिमत्वाच्या आकंठ प्रेमात असलेले लोक गंडलेले असतात असं माझं मत होतं. अजूनही आहे. शिवाय या सुपरस्टार प्रकरणामुळे चांगले, अर्थपूर्ण चित्रपट दुर्लक्षित राहतात असंही वाटतं. पण ही फिल्म मी दुसऱ्यांदा पाहिली तेव्हा मला काहीतरी वेगळं वाटलं. कदाचित मी त्या फिल्मकडे माझ्या अपेक्षांच्या चौकटीत न बघता त्या तरुणाच्या नजरेतून पाहिल्यामुळे असेल, पण मी बच्चन क्रेझ एन्जॉय करू शकलो. (माणसं अतार्किक का वागतात हा प्रश्न बरेचदा गैरलागू असतो. ती अतार्किक वागतात इतकंच खरं असतं.) फिल्मचा नायक अमिताभला भेटतो तो सीन अनुराग कश्यपने लक्षणीय पद्धतीने शूट केला आहे. नायक सिक्युरिटी गार्डशी वाद घालतोय. गार्ड त्याला आत सोडत नाहीये. आतून अमिताभचा जानामाना धीरगंभीर आवाज ऐकू येतो. गार्ड नायकाला आत सोडतो. नायकाच्या चेहऱ्यावर इच्छापूर्तीचा आणि अमिताभ दर्शनाचा आनंद. त्या क्षणी पार्श्वभूमीवर अमिताभचे प्रसिद्ध डायलॉग्ज ऐकू येतात. ते नायकाच्या मनात उमटलेले आहेत. या सीनमधली मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे अमिताभची मुद्रा. शाल वगैरे गुंडाळून अमिताभ उभा आहे. दाढी, चष्मा नीट. आणि चेहऱ्यावर काहीसे त्रासिक भाव. ते भाव मला फार सूचक वाटले. जे चाललंय त्याच्याशी डिसकनेक्टेड असे भाव.

लहानपणापासून जे चित्रपट बघायला मिळाले त्यात प्रामुख्याने अमिताभ असल्याने आणि अमिताभ हा इंटेन्स अभिनेता असल्याने त्याच्या प्रभावातून मी स्वतःदेखील सुटू शकलो नव्हतो. अमिताभचा वावर, थिएट्रिक्स खिळवून ठेवणारं होतं. पण वेगळ्या वळणाचे हिंदी चित्रपट जास्त आवडत होते. आणि ते विशिष्ट अभिनेत्यांचे चित्रपट नव्हते. ते दिग्दर्शकांचे चित्रपट होते. अर्धसत्य म्हणजे गोविंद निहलानी, जुनून म्हणजे श्याम बेनेगल, शतरंज के खिलाडी म्हणजे सत्यजीत रे इथपासून परिंदा म्हणजे विधु विनोद चोप्रा, सत्या म्हणजे रामगोपाल वर्मा, हजारों ख्वाहिशें ऐसी म्हणजे सुधीर मिश्रा इथपर्यंतची साखळी तयार होत होती. पॉप्युलर आणि पॅरलल या दोन ढोबळ प्रवाहांचा विचार करताना मला 'स्टार' आणि 'मुरब्बा' या दोन फिल्म्स प्रातिनिधिक चित्र मांडणाऱ्या वाटतात.

कलात्मक निर्मिती एका बाजूला आहे आणि अनुभूती एका बाजूला आहे. मला 'पार्टी' हा चित्रपट बघताना जी अनुभूती येते ती 'अग्नीपथ' बघताना येणाऱ्या अनुभूतीहून वेगळी असते. 'पार्टी' हा चित्रपट महत्त्वाचं काही बोलतो, पण 'अग्नीपथ' मधलं प्युअर थिएट्रिक्स महत्त्वाचं काही बोलत नसतानाही आकर्षित करू शकतं. मध्यंतरी कुठेतरी वाचलेलं एक आठवतं - A film is - or should be - more like music than like fiction. It should be a progression of moods and feelings. The theme, what's behind the emotion, the meaning, all that comes later. यातील विचार कदाचित डिबेटेबल असू शकेल, पण सिनेमाचा विचार करताना मला स्वतःला हे अगदी पटलेलं आहे.

मला फिल्म म्हणून अजूनही 'स्टार'च आवडते, पण 'अमिताभकेंद्री' फिल्म कशाला हे जे आधी वाटत होतं ते वाटेनासं झालं. एक जाणवलं की सिनेमा ही एक भलीमोठी स्पेस आहे. तिथे काय होईल, काय आकाराला येईल हे ठरवणं अवघड आहे. तिथल्या 'इमोशनल आउटपुट'ला एका साच्यात बांधता येणार नाही. या स्पेसमध्ये जे निर्माण होतं ते माणसांच्या मनातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यांना स्पर्श करतं. यातला एक कोपरा, जो भारतीय संदर्भात तरी डॉमिनंट आहे तो म्हणजे नाट्यमयता आणि मेलोड्रामा. अमिताभ या आघाडीवर निःसंशय ग्रेट होता. बौद्धिक स्टिम्युलेशनइतकंच ड्रॅमॅटिक स्टिम्युलेशन माणसांना प्रभावित करतं हे नाकारता येत नाही. म्हणूनच अमिताभ बच्चन हे प्रकरण लार्जर दॅन लाइफ कसं झालं या प्रश्नात न अडकता अमिताभ हे लार्जर दॅन लाइफ प्रकरण आहे हे स्वीकारुन टाकावं.

प्रतिभावंत लेखक-दिग्दर्शकांचे चित्रपट खोल परिणाम करतात. अगदी मनामध्ये एक नवीन स्तर निर्माण करतात. पण असं असलं तरी 'विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम' हा डायलॉग ऐकून आपल्याला शिट्टी का मारावीशी वाटते हे मला कळत नाही. आपल्याला 'सबस्टन्स' इतकीच 'स्टाईल' का आवडते? हा बहुधा आर्टिस्टिक क्रायसिस किंवा आयडेंटिटी क्रायसिस असावा!

(फेसबुक पोस्ट)

No comments: