अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील 'स्क्रॅन्टन' या शहरात 'डंडर मिफलिन' नावाच्या पेपर कंपनीचं प्रादेशिक कार्यालय आहे. या कार्यालयात काही अद्भुत माणसं काम करतात. ‘व्यक्ती आणि वल्ली’ पातळीवरची अद्भुत. 'द ऑफिस' ही विनोदी मालिका म्हणजे या अद्भुत माणसांनी घातलेला त्याहूनही अद्भुत सावळागोंधळ आहे. रोज सकाळी ऑफिसला येऊन घरी जाणं हे वास्तविक एक कंटाळवाणं नित्यकर्म. पण हे नित्यकर्म, या नित्यकर्माशी जोडलेल्या उप-नित्य गोष्टी - उदा. छायाप्रत (फोटोकॉपी) काढणं, ईमेल पाठवणं, बॉसच्या सह्या घेणं (आणि त्याला नावं ठेवणं), मीटिंग्जला हजेरी लावणं इ. तून ‘द ऑफिस’ नावाचा एक दर्जेदार ड्रामा तयार झाला आहे. जगभरातल्या प्रेक्षकांनी उचलून धरलेली ही मालिका. फँटसी, क्राइम थ्रिलर मालिका मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत असताना ‘ऑफिस’सारखी ‘ह्यूमन स्टोरी’ प्रचंड लोकप्रिय झाली. भारतातही तिचे बरेच चाहते आहेत. या मालिकेचा ‘रिपीट’ प्रेक्षकवर्गही मोठा आहे. अस्मादिक त्यापैकी एक!
'द ऑफिस' नावाची मूळ ब्रिटिश मालिका २००१ ते २००३ अशी दोन वर्षं चालली. ती १४ भागात प्रदर्शित झाली होती. प्रख्यात ब्रिटिश कॉमेडियन-लेखक-अभिनेता रिकी जर्व्हेस आणि स्टीफन मर्चंट यांनी बीबीसीकरता ती निर्माण केली होती. या मालिकेच्या प्रेमात पडून पुढे तिच्या फ्रेंच, इस्त्रायली, कॅनेडियन, ब्राझीलियन, जर्मन, ऑस्ट्रेलियन आवृत्त्या निघाल्या. भारतीय आवृत्तीही २०१९ साली आली होती. पण या सगळ्यात ज्या आवृत्तीने कडी केली, स्वतःचा प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण केला ती आवृत्ती म्हणजे ग्रेग डॅनियल्स या अमेरिकन लेखक-निर्माता-दिग्दर्शकाने अमेरिकन टेलिव्हिजनसाठी निर्माण केलेली 'द ऑफिस'. ही मालिका २००५ ते २०१३ अशी आठ वर्षं ‘एनबीसी’वर चालली. आता ती नेटफ्लिक्स, ॲमॅझॉन प्राइम, जिओ हॉटस्टार या ओटीटी चॅनल्सवर उपलब्ध आहे. समीक्षक मंडळींनी मूळ ब्रिटिश मालिकेला जास्त उचलून धरलेलं असलं तरी अमेरिकन 'ऑफिस'ला प्रेक्षकांची फार मोठी पसंती मिळाली. त्याचं एक मुख्य कारण म्हणजे अमेरिकन 'ऑफिस'मधली पात्ररचना. या पात्रांशी प्रेक्षकांची जी भावनिक जवळीक निर्माण झाली त्याला तोड नव्हती. 'ओरिजिनॅलिटी'च्या निकषावर ब्रिटिश मालिका कदाचित वरचढ ठरू शकेल; पण अमेरिकन मालिकेचा 'कनेक्ट' जबरदस्त होता. शिवाय अमेरिकन ऑफिसची कथा खूपच दीर्घ आहे. एकूण ९ सीझन्स, २०१ भाग. आणि तरी प्रेक्षकांना धरून ठेवण्यात ती यशस्वी झाली.
इंग्लिशमध्ये
ज्याला 'क्रिन्ज
कॉमेडी' म्हणतात
त्या प्रकारची ही मालिका आहे. 'क्रिन्ज' म्हणजे अवघडल्यासारखं, ओशाळल्यासारखं वाटणं, विचित्र वाटणं. आपण प्रत्यक्ष जगताना जे बोलणार नाही,
जसं वागणार नाही तसं फाडकन बोलणं-वागणं. आणि 'ऑफिस'मध्ये हे सतत होत राहतं. शिवाय ही एक 'मॉक्युमेंट्री' आहे. 'मॉक्युमेंट्री' म्हणजे कल्पित कथा 'डॉक्युमेंट्री'च्या स्वरूपात सांगणं. ऑफिसमधले लोक त्यांचं काम करतायत आणि
डॉक्युमेंट्रीची टीम त्याचं शूटिंग करते आहे. त्यामुळे मालिकेतली पात्रं कल्पित
कथेत वावरत असली तरी ती प्रेक्षकांकडे वरचेवर बघतात आणि त्यांच्या डोळ्यातून,
चेहऱ्यातून, इतर हावभावातून स्वतःला व्यक्त करतात. यातून प्रेक्षकांशी
निर्माण होणारा 'कनेक्ट'
प्रेक्षकांना ही पात्रं आपलेच मित्र-मैत्रिणी आहेत असं
वाटायला लावण्यात, त्यांच्यात
भावनिक पातळीवर गुंतण्यात हातभार लावतो.
स्क्रॅन्टनमधलं
ऑफिस, न्यू
यॉर्कला असणारं कंपनीचं हेड ऑफिस, इतर काही रीजनल ऑफिसेस अशा पटावर ही मालिका घडते.
स्क्रॅन्टन ऑफिसचा मॅनेजर आहे मायकेल स्कॉट. आणि सेल्स, अकांउटिंग, क्वालिटी कंट्रोल, कस्टमर सपोर्ट आणि ह्यूमन रीसोर्स अशा विभागांत काम
करणाऱ्या 'ऑफिस टीम'मध्ये आहेत जिम हॅल्पर्ट, पॅम बीझली, ड्वाइट श्रूट, केव्हिन मलोन, अँजेला मार्टिन, ऑस्कर मार्टिनेझ, स्टॅनली हडसन, केली कपूर, रायन हॉवर्ड, क्रीड, टोबी फ्लेन्डरसन, अँड्रयू बर्नार्ड, डेरिल फिलबिन अशा 'व्यक्ती आणि वल्ली'. यांच्याखेरीज इतरही बरीच पात्रं आहेत. पण ही प्रमुख पात्रं.
दोनशे एपिसोड्स आपण त्यांना बघत असतो. त्यात त्यांची स्वभाववैशिष्ट्यं तर आपल्याला
दिसतातच; पण
त्यांची 'कॅरॅक्टर
आर्क' - व्यक्तिरेखेचा
प्रवास - बघणं फार रोचक आहे. खरं तर कुठल्याच पात्राचा प्रवास आमूलाग्र बदलाकडे
जात नाही. कारण ऑफिस ही फँटसी, थ्रिलर या जातकुळीतली नाही. दोनशे भाग सगळी माणसं एकाच
इमारतीत, एकाच
ऑफिसमध्ये रोज येतात. त्यांच्यात काही बदल अर्थातच होतात; पण मुळातून फार काही बदलत नाही. तरी मॉक्युमेंट्री
फॉर्मेटमध्ये ते आपल्याशी थेट बोलत असल्याने त्यांची कथा आणि त्यांचं अंतरंग उलगडत
जाताना बघणं, त्यांना 'ऐकणं' हे फार 'आत्मीय' आणि बहारदार आहे. आणि त्यांनी एत्रितपणे घातलेल्या गोंधळाची
मौज तर वेगळीच!
या
‘क्रिन्ज कॉमेडी’तल्या ‘क्रिन्ज’चा मुख्य भार वाहिला आहे तो ऑफिस मॅनेजर मायकेल
स्कॉटने. ही भूमिका स्टीव्ह कॅरेलने केली आहे. ब्रिटिश मालिकेत ऑफिस मॅनेजरची भूमिका
करणारा रिकी जर्व्हेस हा प्रतिभावान अभिनेता आहे यात शंकाच नाही;
पण स्टीव्ह कॅरेल हा नुसताच प्रतिभावान नाही;
तर तो एका अलौकिक पातळीवरच्या ‘चक्रम प्रतिभे’चा धनी आहे.
स्टीव्ह कॅरेलचा 'मायकेल
स्कॉट' हे
टेलिव्हिजनच्या इतिहासातलं एक अजरामर पात्र होऊन बसलं आहे. त्याचा थक्क करणारा
मुद्राभिनय, त्याची
एकूण 'रेंज',
अत्यंत कन्व्हिक्शनने केलेल्या अशक्य वेड्या करामती,
आचरटपणा बघताना अवाक व्हायला होतं. त्याचं वागणं
त्रासदायकही आहे. तो ऑफिसमधल्या लोकांना अनेकदा मनस्ताप देतो;
पण त्याच्या या त्रास देण्यामागे, विचित्र वागण्यामागे, लोकांना ओशाळवाणं करण्यामागे त्याचा एकटेपणा (विशेषतः
त्याच्या वाढीच्या वयातील एकटेपणा) हा एक घटक आहे. आणि महत्त्वाचं हे की हा मुद्दा
कधीच म्हणजे कधीच ठळकपणे किंवा बटबटीपणे समोर येत नाही.काही प्रसंगांमधून,
संवादांमधून त्याची झलक मिळते इतकंच. मायकेलचं तऱ्हेवाईक
वागणं, त्याचे
उपद्व्याप ऑफिसमधल्या बहुतेक सर्व घडामोडींच्या मुळाशी आहेत. पण त्याची
कंपनीबद्दलची, कागद
उद्योगाबद्दलची निष्ठा मात्र अतूट आहे. आपली कंपनी, आपलं ऑफिस, आपले सहकारी याबद्दल त्याच्या मनात प्रेम आहे. त्याचा
अगोचरपणा कधीकधी अती होत असला तरी ऑफिसमधल्या लोकांनाही अखेरीस त्याच्याबद्दल
ममत्व वाटतंच. आता असा आचरट-प्रेमळ-कमालीचा 'व्हल्नरेबल' बॉस असू शकतो हे भारतीय संदर्भात पचनी पडणं जरा अवघड आहे.
(ऑफिसची हिंदी आवृत्ती बघताना हे जाणवतं). कारण बॉस हा एका बंद खोलीत बसून सर्व
कर्मचाऱ्यांना आपल्या धाकात ठेवणारा एक माणूस असतो आणि त्याच्या धाकात आपण राहायचं
असतं ही कल्पना आपल्याकडे अधिक रूढ आहे.
आणि
इथेच सांस्कृतिक पर्यावरणाशी निगडीत असलेली एक जाणीव होते. एखादा बॉस असा असू शकतो
ही कल्पना स्फुरणं आणि मग ती पुढे नेणं हा झाला एक भाग. पण ऑफिसचं 'दर्शन' हे बरंच जास्त 'विस्तृत' आहे. जिम आणि पॅमची प्रेमात पडावी अशी प्रेमकथा असो किंवा
ड्वाइट श्रूटसारख्या विक्षिप्त, बऱ्याच विषयात गती असलेल्या, महत्त्वाकांक्षी आणि धांदरट व्यक्तिरेखेचं चित्रण असो किंवा
स्त्रीवाद-वर्णद्वेष-पर्यायी लैंगिकता यांच्याशी संबंधित चर्चा असो किंवा एकूणच
परंपरा आणि आधुनिकतेतील संघर्ष असोत, ही मालिका सर्व मुद्द्यांना न बिचकता,
बुद्धी आणि संवेदना जाग्या ठेवून स्पर्श करते. संघर्षाच्या
विविध मुद्द्यांबाबत विविध दृष्टिकोनांची देवाणघेवाण घडवते. सांस्कृतिक आणि
वैचारिक अवकाशात मोकळेपणा असणं, अभिव्यक्तीवर अवाजवी बंधनं नसणं - एकूणच 'सामाजिक बुद्ध्यांक आणि भावनांक' चांगला असणं - हे जिथे असतं तिथे हे होऊ शकतं. 'द ऑफिस' बघताना हे सतत जाणवत राहतं.
ऑफिससारख्या प्रयोगशील आणि 'रीफ्रेशिंग' मालिकेबद्दल बोलताना एकूणच वेब सीरिज या प्रकाराबाबत एक गोष्ट मात्र लक्षात घेण्याजोगी आहे. आज ओटीटी चॅनल्सचा बराच मोठा प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे आणि अनेक उत्तमोत्तम मालिका, चित्रपट आपल्याला घरबसल्या बघायला मिळतायत. इंटरनेट आलं तेव्हा ते नुसतं आलं नाही; तर त्याने येताना काही नवे वारेही आणले. भारतीय प्रेक्षकांची, विशेषतः मिलेनियल्स, जेन झी इ. पिढ्यांची अभिरुची आणि विचारविश्व घडवण्यात ओटीटीचा मोठाच हातभार आहे. कुटुंब-नातेसंबंध-विवाहसंबंध यांच्या बदलत्या रचना, पालक आणि मुलं यांच्यातील संबंधांचे नवे आयाम, पर्यायी लैंगिकतेचा स्वीकार, रोमँटिक प्रेमाचे वेगळे आयाम अशा विविध स्तरांवर काही वेगळं, प्रगल्भ, 'मुक्तिदायक' वाटेल असं दर्शन होऊ लागलं आहे. त्यामुळे वेगळ्या धाटणीच्या, चौकटबाहेरच्या विषयांना हात घालणाऱ्या, 'पुढचं' पाहणाऱ्या, प्रेक्षकांना मूर्ख न समजणाऱ्या, बरेच कष्ट घेऊन तयार केलेल्या अनेक मालिका आपल्याला बघायला मिळतायत. 'ऑफिस' ही याच मालिकेतली एक मालिका आहे. त्यामुळे नव्या 'वैचारिक प्रवाहा'चा फायदा 'ऑफिस'लाही झालेला आहे. पण 'ऑफिस'ची रचनाच फार वैशिष्ट्यपूर्ण आहे, तिचा स्वतःचा असा परिणाम काही वेगळाच आहे हे या मालिकेचं स्वतःचं श्रेय आहेच.
जिम
आणि पॅमची प्रेमकथेचा जो उल्लेख मी केला त्याबाबत थोडं बोलावंसं वाटतं. या कथेशी
आपण एका वेगळ्या पातळीवर जोडले जातो. ही एक 'खरी' प्रेमकथा आहे. त्यात रोमँटिक कथेमध्ये असतो तो सुखावणारा
भाग - फील गुड फॅक्टर - आहेच. मुख्य म्हणजे पॅम (जेना फिशर) आणि जिम (जॉन
क्रासिंस्की) हे दोघे अक्षरशः 'मेड फॉर इच अदर' वाटतात. खऱ्या आयुष्यात ते एकमेकांबरोबर नाहीत;
त्यांचे पार्टनर्स वेगळे आहेत हे कळल्यावर अनेक चाहत्यांना
मोठा धक्का बसला, वाईट
वगैरे वाटलं इतकी त्यांची ऑन-स्क्रीन जोडी परफेक्ट आहे. पण या बाजू असल्या तरी या
कथेचा एकूण प्रवासच फार मनोज्ञ आहे. तो कागद-स्टेपलर-झेरॉक्स मशीन-प्रिंटर-कॉफी
ब्रेक यातून पुढे सरकत जातो. मुख्य म्हणजे लग्न झाल्यानंतर नात्यामध्ये
अपरिहार्यपणे जे संघर्ष उभे राहतात ते इथेही येतात. आणि या दोन्ही कलाकारांच्या
अभिनयाची थोरवी ही की त्यांच्यातलं प्रेम जितकं सहज, सेंद्रिय आहे तितकाच त्यांच्यातला ताणही सहज,
सेंद्रिय आहे. पण या कथेचं वेगळेपण, तिचा ‘ग्रेटनेस’
प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय ‘अनुभवता’ येणार नाही! (आणि हे पूर्ण मालिकेलाही लागू
होतं!)
हे
दोघेच नाही तर ऑफिसमधल्या यच्चयावत कलाकारांचा अभिनय ही या मालिकेला कमाल उंचीवर
नेणारी गोष्ट आहे. स्टीव्ह कॅरेल, जेना फिशर, जॉन क्रासिंस्की, रेन विल्सन (ड्वाइट श्रूट), अँजेला किंझी (अँजेला मार्टिन) या प्रमुख अभिनेत्यांसह इतर
सर्वजण आपापली व्यक्तिरेखा ज्या ताकदीने पेलतात ते अचंभित करणारं आहे. आणि इतर
सहायक अभिनेते किंवा एखाद्या एपिसोडमध्ये काही वेळासाठी येणारे अभिनेतेही आपलं काम
इतकं चोख करतात की त्यांचं अल्प काळासाठीचं असणंही तुमच्या नीट लक्षात राहतं.
दृकश्राव्य माध्यम पश्चिमेकडे बऱ्याच आधी विकसित झाल्याने दृकश्राव्य तंत्रावरची
त्यांची पकड आपल्याला नेहमीच जाणवते. युरोपियन-अमेरिकन चित्रपट,
मालिका तांत्रिकदृष्टया कायमच चार पावलं पुढे राहिलेल्या
आहेत. पण नोंद घ्यावी अशी गोष्ट म्हणजे तांत्रिक 'ॲडव्हान्टेज' असला तरी वैविध्यपूर्ण कथांचा विचार करणं,
कथा विकसित करण्याची हातोटी आणि अभिनय या आघाड्यांवर अजिबात
दुर्लक्ष होत नाही. दृकश्राव्य निर्मितीच्या मुळाशी आधी या गोष्टी असतात.
तांत्रिकता नंतर येते. अमुक भूमिका कुणी करावी हा निर्णयही बऱ्याच विचाराअंती
घेतला जातो. आणि त्याचा परिणाम प्रेक्षकांना अनुभवता येतो. या भूमिकेत दुसरा कुणीच
‘फिट’ बसला नसता असं जवळजवळ प्रत्येक व्यक्तिरेखेबाबत वाटतं! (स्टीव्ह कॅरेलला
मायकेलच्या भूमिकेत घेण्याआधी सुमारे ३५ अभिनेते विचारात घेतले गेले होते). सर्व
अभिनेत्यांची प्रतिभा तुम्हाला सर्व एपिसोड्समध्ये प्रत्ययाला येते. हे सगळेचजण
अतिशय 'नैसर्गिक'
आहेत. कथा सुरु असताना ते त्यात समरस झालेले असतातच;
पण मॉक्युमेंट्री फॉर्मेटचा भाग म्हणून जेव्हा
त्यांच्यापैकी प्रत्येकजण ठराविक काळानंतर प्रेक्षकांशी संवाद साधतो/साधते
तेव्हाचा त्यांचा मुद्राभिनय विशेष कमाल आहे! म्हणजे आपला एखादा मित्र जसा
आपल्यासमोर बसून एखादा किस्सा सांगतो, मधेच उठून टाळी देतो, हसतो, चेहऱ्याच्या आणि हातवाऱ्यांच्या आधारे एखादा मुद्दा पटवून
देतो, आपलं
दुःख सांगतो तसं अगदी सहजपणे हे अभिनेते आपल्याशी बोलतात.
अतिशय जिवंत, रसरशीत, बहुस्तरीय अभिनय हे ऑफिसचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. स्टीव्ह कॅरेल आणि जेना फिशर हे दोघे विशेष उल्लेखनीय. स्टीव्ह कॅरेलबद्दल वर लिहिलंच आहे. पण मला जेना फिशरने स्टीव्ह कॅरेलच्या तोडीस तोड प्रभावित केलं. तिच्या अभिनय क्षमतेचा अक्षरशः हेवा वाटतो. रेन विल्सन हरहुन्नरी ड्वाइट श्रूट म्हणून अफलातून वैविध्य दाखवतो. त्याच्या एकट्याच्या करामतींवर एखादी स्पिन-ऑफ मालिका तयार होऊ शकेल. मिंडी कॅलिंगने साकारलेली बडबडी, सेलिब्रिटी गॉसिपमध्ये रस असणारी 'केली कपूर' अफाट आहे. तिचं कॉमिक टायमिंग आणि काही प्रसंगांमधला प्रतिक्रिया म्हणूनचा तिचा शून्य, निर्विकार चेहरा निव्वळ लाजवाब! बी. जे. नोव्हाकचा गोंधळलेला 'रायन हॉवर्ड' आणि केली कपूर यांच्यातलं ‘ऑन-ऑफ’ होणारं नातं, कृष्णवर्णीय अभिनेता क्रेग रॉबिन्सनने उभा केलेला कामसू 'डेरिल फिलबीन', पॉल लिबरस्टीनचा ऑकवर्ड, अबोल, आतल्या आत धुमसत असलेला 'टोबी फ्लेन्डरसन', एड हेल्म्सचा असमाधानी, चंचल 'अँड्रूयू बर्नार्ड', ऑस्कर न्यूनेझचा बुद्धिमान मेक्सिकन 'ऑस्कर मार्टिनेझ', एली केम्परची बडबडी, धांदरट 'एरिन हॅनन' आणि इतर अनेक छोट्या-मोठ्या व्यक्तिरेखांमधले अभिनेते आपलं काम कौतुकास्पद गांभीर्याने निभावतात.
‘ऑफिस’मध्ये
'ऑकवर्ड' प्रसंगांची यात रेलचेल आहे. आणि हे ऑकवर्ड प्रसंग लिहिणं
मोठं आव्हान आहे. ऑफिसचे दोनशे भाग कितीजणांनी लिहिले आहेत आणि कितीजणांनी
दिग्दर्शित केले आहेत याची यादी द्यायची झाली तर एक पान खर्ची पडेल. अर्थात दीर्घ
मालिकांच्या बाबतीत हे नवीन नाही. 'फ्रेंड्स'सारख्या प्रचंड गाजलेल्या मालिकेच्या एपिसोड्सचे
लेखक-दिग्दर्शकही वेगवेगळे होते. दीर्घ मालिकांच्या निर्मितीची हीच पद्धत आहे.
मालिकेचं ‘टेंप्लेट’ ठरलं की त्याबरहुकूम वेगवेगळे दिग्दर्शक वेगवेगळे भाग
दिग्दर्शित करतात. एका अर्थी मग ते ‘मेकॅनिकल’ होतं. पण तरी इतके लोक गुंतलेले
असतानाही सर्व एपिसोड्सच्या अनुभवाची 'सलगता' कायम राहते याचं विशेष वाटतं. ('टू मेनी कुक्स, स्पॉइल द
ब्रॉथ' ही म्हण इथे खोटी ठरते!) बी. जे. नोव्हाक, मिंडी
कॅलिंग, पॉल लिबरस्टीन यासारख्या लेखकांनी तर ऑफिसमधल्या मुख्य
व्यतिरेखा साकारल्या आहेत. ते या मालिका निर्मात्यांच्या टीममध्येही आहेत. ऑफिस
निर्माण व्हायला ज्यांचे हात लागले आहेत अशांची यादी पाहिली तर 'मल्टिपल टॅलेंट' (निर्मिती, दिग्दर्शन, लेखन, अभिनय)
असणारे अनेक लोक दिसतात. 'रायटर्स रूम' ही संकल्पना कदाचित काही वाचकांच्या परिचयाची असेल. वेब
सीरिजचे मुख्य क्रिएटर्स - 'शो रनर्स' आणि लेखकांची टीम यांची ही रूम. एका विशिष्ट सीझनमध्ये काय
घडेल, कुठल्या व्यक्तिरेखा कुठल्या दिशेने, कशा
जातील हे इथे नक्की होतं आणि मग त्यानुसार एपिसोड्स लिहिले जातात. एपिसोड्सचे लेखक
वेगवेगळे असले तरी एकदा व्यक्तिरेखा आणि संपूर्ण सीझनची कथा आणि टोन ठरला की
त्यानुसारच लेखन होतं. आणि लेखन-दिग्दर्शनाबाबतचे अंतिम निर्णय मुख्य क्रिएटरच्या, शो
रनर्सच्या हातात असतात. थोडक्यात पुस्तकाची प्रकरणं लिहिणारे लोक वेगवेगळे असले
तरी पूर्ण पुस्तक कसं असायला हवं हे क्रिएटर ठरवतो/ठरवते. मोठ्या रेस्टॉरंटमध्ये
वेगवेगळे पदार्थ करणारे शेफ्स वेगळे असले तरी रेस्टॉरंटचं जेवण एकूणात कसं असेल, त्यात काय
कमी-जास्त करायला हवं हे जसं चीफ शेफ ठरवतो/ठरवते तसंच काहीसं! दृकश्राव्य
कलाकृतींच्या निर्मितीप्रक्रियेमध्ये रस असणाऱ्यांसाठी ही एकूण प्रक्रिया समजून घेणं फार रोचक ठरेल. 'द ऑफिस'मध्ये पॅम आणि अँजेला
या दोन भूमिका करणाऱ्या दोन अभिनेत्री - जेना फिशर आणि अँजेला किन्झी - प्रत्यक्ष
आयुष्यातही चांगल्या मैत्रिणी आहेत. 'द ऑफिस'चा प्रत्येक एपिसोड कसा घडला याबाबत दोघींनी 'ऑफिस लेडीज' या
नावाने एक पॉडकास्ट सीरिज केली आहे. याचेही दोनशेच्या वर भाग आहेत. ऑनलाइन उपलब्ध
आहेत. ज्यांना मालिकेच्या मेकिंगमध्ये रस असेल त्यांनी जरूर ऐकावेत. (या विषयवरचं
दोघींचं एक पुस्तकही उपलब्ध आहे - द ऑफिस बीएफएफ्स : टेल ऑफ द ऑफिस फ्रॉम टू बेस्ट
फ्रेंड्स हू वर देअर).
दीर्घ काळ चालणाऱ्या (चांगल्या, परिणामकारक) मालिकांचं एक प्रमुख वैशिष्ट्य असं की त्या एक 'समांतर, खरंखुरं वाटणारं जग' उभं करतात. 'ऑफिस'बाबतही हे होतं. या जगात आपण रमतो. विशेषतः एक भारतीय प्रेक्षक म्हणून मी अशा मालिकांमध्ये जास्तच रमतो. कारण अशा मालिका बघत असताना त्यातले जे सांस्कृतिक-वैचारिक बारकावे (आणि धक्के) जाणवतात त्यातून होणारी 'जाणीव-वृद्धी' मला महत्त्वाची वाटते. प्रत्यक्षातील जगात ज्या कमतरता दिसतात, ज्या गोष्टी खटकतात त्यावर 'समांतर जगा'त निदान बोललं जावं, तिथल्या चित्रणात त्या दूर व्हाव्यात अशी अपेक्षा करणं गैर नाही. आणि ते अट्टाहासाने करण्यात अर्थ नसतो. ते सहजतेने व्हावं लागतं. कथेच्या ओघात व्हावं लागतं. 'सटल' चित्रणाची (सूक्ष्म, ठळक किंवा बटबटीत न करता सूचकपणे केलेलं चित्रण) भारतीय प्रेक्षकांना फारशी सवय नाही. आता आता चित्रं थोडं बदलतंय; पण आपण मूलतः मेलोड्रामावाले. 'ओव्हर द टॉप' चित्रण, भावनांची खिचडी हे आपल्याला आवडतं - कारण तेच आपण बघत आलो आहे. त्याचं एक स्थान आहे हे नाकारण्यातही अर्थ नाही. कारण शेवटी शैलीचा तो एक प्रकार आहेच. पण होतं असं की मेलोड्रामाच्या माऱ्यामुळे संथ, सूक्ष्म आणि प्रभावी चित्रण समजून घेण्याची बैठक तयार होत नाही. आजवर पाहिलंच नाही अशा एखाद्या नावीन्यपूर्ण, 'सांस्कृतिक धक्कादायक' पात्राची कल्पना करणंही अवघड होतं. कुटुंब-समाज-परंपरा-देश यांचं स्थान आपल्या जगण्यात महत्त्वाचं आहे. पण 'व्यक्ती'चा नीट विचार झाला, व्यक्तींमधील संबंधांचा जैविक-मानसिक पातळीवर मूलभूत विचार होऊ शकला तर इतर रचनांना अधिक बळ मिळू शकतं. 'रचना' व्यक्तीपेक्षा वरचढ ठरू लागली की व्यक्तीची घुसमट होऊ लागते. ऑफिससारखी मालिका बघताना जाणवतं की 'व्यक्तिरेखा' निर्माण करताना रचनेचं दडपण बाळगलं जात नाही. परंपरा आणि आधुनिकतेचे संघर्ष तिथेही असतात आणि ते खुद्द मालिकेतही दिसतात; पण नव्याला भरपूर अवकाश निर्माण करून दिला जातो हे लक्षात घेण्यासारखं आहे. मेलोड्रामा तुम्हाला भावनिकदृष्ट्या हलवतो; पण संथ-सूक्ष्म चित्रणात तुम्हाला विचारप्रवृत्त करण्याची, चटकन निष्कर्ष न काढता जगण्यातल्या गुंतागुतीबाबत सजग करण्याची क्षमता असते. त्यात ‘तळ’ दिसतो, फक्त ‘पृष्ठभाग’ नाही. आणि तळ हलणंच आवश्यक असतं!
ऑफिसबद्दल
ऑफिसच्या एपिसोड्सइतकंच बोलता येऊ शकेल. पण कुठल्याही उत्तम कलाकृतीप्रमाणे
‘ऑफिस’देखील अनुभवायचीच गोष्ट आहे. भारतीय प्रेक्षकांचा विचार करता, मालिकेची
जातकुळी (क्रिन्ज कॉमेडी, मॉक्युमेंट्री) थोडी वेगळी असल्याने तिची पकड बसायला, सवय
व्हायला कदाचित थोडा वेळ लागू शकतो. नऊपैकी शेवटचे दोन सीझन्स थोडे ताणले गेले
आहेत. या दोन सीझन्समध्ये मालिका थोडी सैल पडते. पण सर्व पूर्वकल्पनांची नोंद घेऊन
‘द ऑफिस’ जरूर बघावी. 'सृजनात्मक प्रतिभा' (क्रिएटिव्ह जीनियस) अनुभवण्यासाठी बघावी. आपल्या अवतीभवतीचं
जग कसं असायला हवं याचा विचार करताना ‘जग असंही असायला हवं’ असं वाटल्याशिवाय
राहणार नाही!
(पूर्वप्रसिद्धी : अनुभव, जानेवारी २०२६)




No comments:
Post a Comment