Saturday, March 7, 2026

एक ‘ऑफिस’ द्या मज बांधुनी..

अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील 'स्क्रॅन्टन' या शहरात 'डंडर मिफलिन' नावाच्या पेपर कंपनीचं प्रादेशिक कार्यालय आहे. या कार्यालयात काही अद्भुत माणसं काम करतात. ‘व्यक्ती आणि वल्ली’ पातळीवरची अद्भुत. 'द ऑफिस' ही विनोदी मालिका म्हणजे या अद्भुत माणसांनी घातलेला त्याहूनही अद्भुत सावळागोंधळ आहे. रोज सकाळी ऑफिसला येऊन घरी जाणं हे वास्तविक एक कंटाळवाणं नित्यकर्म. पण हे नित्यकर्म, या नित्यकर्माशी जोडलेल्या उप-नित्य गोष्टी - उदा. छायाप्रत (फोटोकॉपी) काढणं, ईमेल पाठवणं, बॉसच्या सह्या घेणं (आणि त्याला नावं ठेवणं), मीटिंग्जला हजेरी लावणं इ. तून ‘द ऑफिस’ नावाचा एक दर्जेदार ड्रामा तयार झाला आहे. जगभरातल्या प्रेक्षकांनी उचलून धरलेली ही मालिका. फँटसी, क्राइम थ्रिलर मालिका मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत असताना ‘ऑफिस’सारखी ‘ह्यूमन स्टोरी’ प्रचंड लोकप्रिय झाली. भारतातही तिचे बरेच चाहते आहेत. या मालिकेचा ‘रिपीट’ प्रेक्षकवर्गही मोठा आहे. अस्मादिक त्यापैकी एक!

'द ऑफिस' नावाची मूळ ब्रिटिश मालिका २००१ ते २००३ अशी दोन वर्षं चालली. ती १४ भागात प्रदर्शित झाली होती. प्रख्यात ब्रिटिश कॉमेडियन-लेखक-अभिनेता रिकी जर्व्हेस आणि स्टीफन मर्चंट यांनी बीबीसीकरता ती निर्माण केली होती. या मालिकेच्या प्रेमात पडून पुढे तिच्या फ्रेंच, इस्त्रायली, कॅनेडियन, ब्राझीलियन, जर्मन, ऑस्ट्रेलियन आवृत्त्या निघाल्या. भारतीय आवृत्तीही २०१९ साली आली होती. पण या सगळ्यात ज्या आवृत्तीने कडी केली, स्वतःचा प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण केला ती आवृत्ती म्हणजे ग्रेग डॅनियल्स या अमेरिकन लेखक-निर्माता-दिग्दर्शकाने अमेरिकन टेलिव्हिजनसाठी निर्माण केलेली 'द ऑफिस'. ही मालिका २००५ ते २०१३ अशी आठ वर्षं ‘एनबीसी’वर चालली. आता ती नेटफ्लिक्स, ॲमॅझॉन प्राइम, जिओ हॉटस्टार या ओटीटी चॅनल्सवर उपलब्ध आहे. समीक्षक मंडळींनी मूळ ब्रिटिश मालिकेला जास्त उचलून धरलेलं असलं तरी अमेरिकन 'ऑफिस'ला प्रेक्षकांची फार मोठी पसंती मिळाली. त्याचं एक मुख्य कारण म्हणजे अमेरिकन 'ऑफिस'मधली पात्ररचना. या पात्रांशी प्रेक्षकांची जी भावनिक जवळीक निर्माण झाली त्याला तोड नव्हती. 'ओरिजिनॅलिटी'च्या निकषावर ब्रिटिश मालिका कदाचित वरचढ ठरू शकेल; पण अमेरिकन मालिकेचा 'कनेक्ट' जबरदस्त होता. शिवाय अमेरिकन ऑफिसची कथा खूपच दीर्घ आहे. एकूण ९ सीझन्स, २०१ भाग. आणि तरी प्रेक्षकांना धरून ठेवण्यात ती यशस्वी झाली. 

इंग्लिशमध्ये ज्याला 'क्रिन्ज कॉमेडी' म्हणतात त्या प्रकारची ही मालिका आहे. 'क्रिन्ज' म्हणजे अवघडल्यासारखं, ओशाळल्यासारखं वाटणं, विचित्र वाटणं. आपण प्रत्यक्ष जगताना जे बोलणार नाही, जसं वागणार नाही तसं फाडकन बोलणं-वागणं. आणि 'ऑफिस'मध्ये हे सतत होत राहतं. शिवाय ही एक 'मॉक्युमेंट्री' आहे. 'मॉक्युमेंट्री' म्हणजे कल्पित कथा 'डॉक्युमेंट्री'च्या स्वरूपात सांगणं. ऑफिसमधले लोक त्यांचं काम करतायत आणि डॉक्युमेंट्रीची टीम त्याचं शूटिंग करते आहे. त्यामुळे मालिकेतली पात्रं कल्पित कथेत वावरत असली तरी ती प्रेक्षकांकडे वरचेवर बघतात आणि त्यांच्या डोळ्यातून, चेहऱ्यातून, इतर हावभावातून स्वतःला व्यक्त करतात. यातून प्रेक्षकांशी निर्माण होणारा 'कनेक्ट' प्रेक्षकांना ही पात्रं आपलेच मित्र-मैत्रिणी आहेत असं वाटायला लावण्यात, त्यांच्यात भावनिक पातळीवर गुंतण्यात हातभार लावतो.   

स्क्रॅन्टनमधलं ऑफिस, न्यू यॉर्कला असणारं कंपनीचं हेड ऑफिस, इतर काही रीजनल ऑफिसेस अशा पटावर ही मालिका घडते. स्क्रॅन्टन ऑफिसचा मॅनेजर आहे मायकेल स्कॉट. आणि सेल्स, अकांउटिंग, क्वालिटी कंट्रोल, कस्टमर सपोर्ट आणि ह्यूमन रीसोर्स अशा विभागांत काम करणाऱ्या 'ऑफिस टीम'मध्ये आहेत जिम हॅल्पर्ट, पॅम बीझली, ड्वाइट श्रूट, केव्हिन मलोन, अँजेला मार्टिन, ऑस्कर मार्टिनेझ, स्टॅनली हडसन, केली कपूर, रायन हॉवर्ड, क्रीड, टोबी फ्लेन्डरसन, अँड्रयू बर्नार्ड, डेरिल फिलबिन अशा 'व्यक्ती आणि वल्ली'. यांच्याखेरीज इतरही बरीच पात्रं आहेत. पण ही प्रमुख पात्रं. दोनशे एपिसोड्स आपण त्यांना बघत असतो. त्यात त्यांची स्वभाववैशिष्ट्यं तर आपल्याला दिसतातच; पण त्यांची 'कॅरॅक्टर आर्क' - व्यक्तिरेखेचा प्रवास - बघणं फार रोचक आहे. खरं तर कुठल्याच पात्राचा प्रवास आमूलाग्र बदलाकडे जात नाही. कारण ऑफिस ही फँटसी, थ्रिलर या जातकुळीतली नाही. दोनशे भाग सगळी माणसं एकाच इमारतीत, एकाच ऑफिसमध्ये रोज येतात. त्यांच्यात काही बदल अर्थातच होतात; पण मुळातून फार काही बदलत नाही. तरी मॉक्युमेंट्री फॉर्मेटमध्ये ते आपल्याशी थेट बोलत असल्याने त्यांची कथा आणि त्यांचं अंतरंग उलगडत जाताना बघणं, त्यांना 'ऐकणं' हे फार 'आत्मीय' आणि बहारदार आहे. आणि त्यांनी एत्रितपणे घातलेल्या गोंधळाची मौज तर वेगळीच!

या ‘क्रिन्ज कॉमेडी’तल्या ‘क्रिन्ज’चा मुख्य भार वाहिला आहे तो ऑफिस मॅनेजर मायकेल स्कॉटने. ही भूमिका स्टीव्ह कॅरेलने केली आहे. ब्रिटिश मालिकेत ऑफिस मॅनेजरची भूमिका करणारा रिकी जर्व्हेस हा प्रतिभावान अभिनेता आहे यात शंकाच नाही; पण स्टीव्ह कॅरेल हा नुसताच प्रतिभावान नाही; तर तो एका अलौकिक पातळीवरच्या ‘चक्रम प्रतिभे’चा धनी आहे. स्टीव्ह कॅरेलचा 'मायकेल स्कॉट' हे टेलिव्हिजनच्या इतिहासातलं एक अजरामर पात्र होऊन बसलं आहे. त्याचा थक्क करणारा मुद्राभिनय, त्याची एकूण 'रेंज', अत्यंत कन्व्हिक्शनने केलेल्या अशक्य वेड्या करामती, आचरटपणा बघताना अवाक व्हायला होतं. त्याचं वागणं त्रासदायकही आहे. तो ऑफिसमधल्या लोकांना अनेकदा मनस्ताप देतो; पण त्याच्या या त्रास देण्यामागे, विचित्र वागण्यामागे, लोकांना ओशाळवाणं करण्यामागे त्याचा एकटेपणा (विशेषतः त्याच्या वाढीच्या वयातील एकटेपणा) हा एक घटक आहे. आणि महत्त्वाचं हे की हा मुद्दा कधीच म्हणजे कधीच ठळकपणे किंवा बटबटीपणे समोर येत नाही.काही प्रसंगांमधून, संवादांमधून त्याची झलक मिळते इतकंच. मायकेलचं तऱ्हेवाईक वागणं, त्याचे उपद्व्याप ऑफिसमधल्या बहुतेक सर्व घडामोडींच्या मुळाशी आहेत. पण त्याची कंपनीबद्दलची, कागद उद्योगाबद्दलची निष्ठा मात्र अतूट आहे. आपली कंपनी, आपलं ऑफिस, आपले सहकारी याबद्दल त्याच्या मनात प्रेम आहे. त्याचा अगोचरपणा कधीकधी अती होत असला तरी ऑफिसमधल्या लोकांनाही अखेरीस त्याच्याबद्दल ममत्व वाटतंच. आता असा आचरट-प्रेमळ-कमालीचा 'व्हल्नरेबल' बॉस असू शकतो हे भारतीय संदर्भात पचनी पडणं जरा अवघड आहे. (ऑफिसची हिंदी आवृत्ती बघताना हे जाणवतं). कारण बॉस हा एका बंद खोलीत बसून सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या धाकात ठेवणारा एक माणूस असतो आणि त्याच्या धाकात आपण राहायचं असतं ही कल्पना आपल्याकडे अधिक रूढ आहे.

आणि इथेच सांस्कृतिक पर्यावरणाशी निगडीत असलेली एक जाणीव होते. एखादा बॉस असा असू शकतो ही कल्पना स्फुरणं आणि मग ती पुढे नेणं हा झाला एक भाग. पण ऑफिसचं 'दर्शन' हे बरंच जास्त 'विस्तृत' आहे. जिम आणि पॅमची प्रेमात पडावी अशी प्रेमकथा असो किंवा ड्वाइट श्रूटसारख्या विक्षिप्त, बऱ्याच विषयात गती असलेल्या, महत्त्वाकांक्षी आणि धांदरट व्यक्तिरेखेचं चित्रण असो किंवा स्त्रीवाद-वर्णद्वेष-पर्यायी लैंगिकता यांच्याशी संबंधित चर्चा असो किंवा एकूणच परंपरा आणि आधुनिकतेतील संघर्ष असोत, ही मालिका सर्व मुद्द्यांना न बिचकता, बुद्धी आणि संवेदना जाग्या ठेवून स्पर्श करते. संघर्षाच्या विविध मुद्द्यांबाबत विविध दृष्टिकोनांची देवाणघेवाण घडवते. सांस्कृतिक आणि वैचारिक अवकाशात मोकळेपणा असणं, अभिव्यक्तीवर अवाजवी बंधनं नसणं - एकूणच 'सामाजिक बुद्ध्यांक आणि भावनांक' चांगला असणं - हे जिथे असतं तिथे हे होऊ शकतं. 'द ऑफिस' बघताना हे सतत जाणवत राहतं.

ऑफिससारख्या प्रयोगशील आणि 'रीफ्रेशिंग' मालिकेबद्दल बोलताना एकूणच वेब सीरिज या प्रकाराबाबत एक गोष्ट मात्र लक्षात घेण्याजोगी आहे. आज ओटीटी चॅनल्सचा बराच मोठा प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे आणि अनेक उत्तमोत्तम मालिका, चित्रपट आपल्याला घरबसल्या बघायला मिळतायत. इंटरनेट आलं तेव्हा ते नुसतं आलं नाही; तर त्याने येताना काही नवे वारेही आणले. भारतीय प्रेक्षकांची, विशेषतः मिलेनियल्स, जेन झी इ. पिढ्यांची अभिरुची आणि विचारविश्व घडवण्यात ओटीटीचा मोठाच हातभार आहे. कुटुंब-नातेसंबंध-विवाहसंबंध यांच्या बदलत्या रचना, पालक आणि मुलं यांच्यातील संबंधांचे नवे आयाम, पर्यायी लैंगिकतेचा स्वीकार, रोमँटिक प्रेमाचे वेगळे आयाम अशा विविध स्तरांवर काही वेगळं, प्रगल्भ, 'मुक्तिदायक' वाटेल असं दर्शन होऊ लागलं आहे. त्यामुळे वेगळ्या धाटणीच्या, चौकटबाहेरच्या विषयांना हात घालणाऱ्या, 'पुढचं' पाहणाऱ्या, प्रेक्षकांना मूर्ख न समजणाऱ्या, बरेच कष्ट घेऊन तयार केलेल्या अनेक मालिका आपल्याला बघायला मिळतायत. 'ऑफिस' ही याच मालिकेतली एक मालिका आहे. त्यामुळे नव्या 'वैचारिक प्रवाहा'चा फायदा 'ऑफिस'लाही झालेला आहे. पण 'ऑफिस'ची रचनाच फार वैशिष्ट्यपूर्ण आहे, तिचा स्वतःचा असा परिणाम काही वेगळाच आहे हे या मालिकेचं स्वतःचं श्रेय आहेच.  

जिम आणि पॅमची प्रेमकथेचा जो उल्लेख मी केला त्याबाबत थोडं बोलावंसं वाटतं. या कथेशी आपण एका वेगळ्या पातळीवर जोडले जातो. ही एक 'खरी' प्रेमकथा आहे. त्यात रोमँटिक कथेमध्ये असतो तो सुखावणारा भाग - फील गुड फॅक्टर - आहेच. मुख्य म्हणजे पॅम (जेना फिशर) आणि जिम (जॉन क्रासिंस्की) हे दोघे अक्षरशः 'मेड फॉर इच अदर' वाटतात. खऱ्या आयुष्यात ते एकमेकांबरोबर नाहीत; त्यांचे पार्टनर्स वेगळे आहेत हे कळल्यावर अनेक चाहत्यांना मोठा धक्का बसला, वाईट वगैरे वाटलं इतकी त्यांची ऑन-स्क्रीन जोडी परफेक्ट आहे. पण या बाजू असल्या तरी या कथेचा एकूण प्रवासच फार मनोज्ञ आहे. तो कागद-स्टेपलर-झेरॉक्स मशीन-प्रिंटर-कॉफी ब्रेक यातून पुढे सरकत जातो. मुख्य म्हणजे लग्न झाल्यानंतर नात्यामध्ये अपरिहार्यपणे जे संघर्ष उभे राहतात ते इथेही येतात. आणि या दोन्ही कलाकारांच्या अभिनयाची थोरवी ही की त्यांच्यातलं प्रेम जितकं सहज, सेंद्रिय आहे तितकाच त्यांच्यातला ताणही सहज, सेंद्रिय आहे. पण या कथेचं वेगळेपण, तिचा ‘ग्रेटनेस’ प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय ‘अनुभवता’ येणार नाही! (आणि हे पूर्ण मालिकेलाही लागू होतं!) 

हे दोघेच नाही तर ऑफिसमधल्या यच्चयावत कलाकारांचा अभिनय ही या मालिकेला कमाल उंचीवर नेणारी गोष्ट आहे. स्टीव्ह कॅरेल, जेना फिशर, जॉन क्रासिंस्की, रेन विल्सन (ड्वाइट श्रूट), अँजेला किंझी (अँजेला मार्टिन) या प्रमुख अभिनेत्यांसह इतर सर्वजण आपापली व्यक्तिरेखा ज्या ताकदीने पेलतात ते अचंभित करणारं आहे. आणि इतर सहायक अभिनेते किंवा एखाद्या एपिसोडमध्ये काही वेळासाठी येणारे अभिनेतेही आपलं काम इतकं चोख करतात की त्यांचं अल्प काळासाठीचं असणंही तुमच्या नीट लक्षात राहतं. दृकश्राव्य माध्यम पश्चिमेकडे बऱ्याच आधी विकसित झाल्याने दृकश्राव्य तंत्रावरची त्यांची पकड आपल्याला नेहमीच जाणवते. युरोपियन-अमेरिकन चित्रपट, मालिका तांत्रिकदृष्टया कायमच चार पावलं पुढे राहिलेल्या आहेत. पण नोंद घ्यावी अशी गोष्ट म्हणजे तांत्रिक 'ॲडव्हान्टेज' असला तरी वैविध्यपूर्ण कथांचा विचार करणं, कथा विकसित करण्याची हातोटी आणि अभिनय या आघाड्यांवर अजिबात दुर्लक्ष होत नाही. दृकश्राव्य निर्मितीच्या मुळाशी आधी या गोष्टी असतात. तांत्रिकता नंतर येते. अमुक भूमिका कुणी करावी हा निर्णयही बऱ्याच विचाराअंती घेतला जातो. आणि त्याचा परिणाम प्रेक्षकांना अनुभवता येतो. या भूमिकेत दुसरा कुणीच ‘फिट’ बसला नसता असं जवळजवळ प्रत्येक व्यक्तिरेखेबाबत वाटतं! (स्टीव्ह कॅरेलला मायकेलच्या भूमिकेत घेण्याआधी सुमारे ३५ अभिनेते विचारात घेतले गेले होते). सर्व अभिनेत्यांची प्रतिभा तुम्हाला सर्व एपिसोड्समध्ये प्रत्ययाला येते. हे सगळेचजण अतिशय 'नैसर्गिक' आहेत. कथा सुरु असताना ते त्यात समरस झालेले असतातच; पण मॉक्युमेंट्री फॉर्मेटचा भाग म्हणून जेव्हा त्यांच्यापैकी प्रत्येकजण ठराविक काळानंतर प्रेक्षकांशी संवाद साधतो/साधते तेव्हाचा त्यांचा मुद्राभिनय विशेष कमाल आहे! म्हणजे आपला एखादा मित्र जसा आपल्यासमोर बसून एखादा किस्सा सांगतो, मधेच उठून टाळी देतो, हसतो, चेहऱ्याच्या आणि हातवाऱ्यांच्या आधारे एखादा मुद्दा पटवून देतो, आपलं दुःख सांगतो तसं अगदी सहजपणे हे अभिनेते आपल्याशी बोलतात.

अतिशय जिवंत, रसरशीत, बहुस्तरीय अभिनय हे ऑफिसचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. स्टीव्ह कॅरेल आणि जेना फिशर हे दोघे विशेष उल्लेखनीय. स्टीव्ह कॅरेलबद्दल वर लिहिलंच आहे. पण मला जेना फिशरने स्टीव्ह कॅरेलच्या तोडीस तोड प्रभावित केलं. तिच्या अभिनय क्षमतेचा अक्षरशः हेवा वाटतो. रेन विल्सन हरहुन्नरी ड्वाइट श्रूट म्हणून अफलातून वैविध्य दाखवतो. त्याच्या एकट्याच्या करामतींवर एखादी स्पिन-ऑफ मालिका तयार होऊ शकेल. मिंडी कॅलिंगने साकारलेली बडबडी, सेलिब्रिटी गॉसिपमध्ये रस असणारी 'केली कपूर' अफाट आहे. तिचं कॉमिक टायमिंग आणि काही प्रसंगांमधला प्रतिक्रिया म्हणूनचा तिचा शून्य, निर्विकार चेहरा निव्वळ लाजवाब! बी. जे. नोव्हाकचा गोंधळलेला 'रायन हॉवर्ड' आणि केली कपूर यांच्यातलं ‘ऑन-ऑफ’ होणारं नातं, कृष्णवर्णीय अभिनेता क्रेग रॉबिन्सनने उभा केलेला कामसू 'डेरिल फिलबीन', पॉल लिबरस्टीनचा ऑकवर्ड, अबोल, आतल्या आत धुमसत असलेला 'टोबी फ्लेन्डरसन', एड हेल्म्सचा असमाधानी, चंचल 'अँड्रूयू बर्नार्ड', ऑस्कर न्यूनेझचा बुद्धिमान मेक्सिकन 'ऑस्कर मार्टिनेझ', एली केम्परची बडबडी, धांदरट 'एरिन हॅनन' आणि इतर अनेक छोट्या-मोठ्या व्यक्तिरेखांमधले अभिनेते आपलं काम कौतुकास्पद गांभीर्याने निभावतात.

‘ऑफिस’मध्ये 'ऑकवर्ड' प्रसंगांची यात रेलचेल आहे. आणि हे ऑकवर्ड प्रसंग लिहिणं मोठं आव्हान आहे. ऑफिसचे दोनशे भाग कितीजणांनी लिहिले आहेत आणि कितीजणांनी दिग्दर्शित केले आहेत याची यादी द्यायची झाली तर एक पान खर्ची पडेल. अर्थात दीर्घ मालिकांच्या बाबतीत हे नवीन नाही. 'फ्रेंड्स'सारख्या प्रचंड गाजलेल्या मालिकेच्या एपिसोड्सचे लेखक-दिग्दर्शकही वेगवेगळे होते. दीर्घ मालिकांच्या निर्मितीची हीच पद्धत आहे. मालिकेचं ‘टेंप्लेट’ ठरलं की त्याबरहुकूम वेगवेगळे दिग्दर्शक वेगवेगळे भाग दिग्दर्शित करतात. एका अर्थी मग ते ‘मेकॅनिकल’ होतं. पण तरी इतके लोक गुंतलेले असतानाही सर्व एपिसोड्सच्या अनुभवाची 'सलगता' कायम राहते याचं विशेष वाटतं. ('टू मेनी कुक्स, स्पॉइल द ब्रॉथ' ही म्हण इथे खोटी ठरते!) बी. जे. नोव्हाक, मिंडी कॅलिंग, पॉल लिबरस्टीन यासारख्या लेखकांनी तर ऑफिसमधल्या मुख्य व्यतिरेखा साकारल्या आहेत. ते या मालिका निर्मात्यांच्या टीममध्येही आहेत. ऑफिस निर्माण व्हायला ज्यांचे हात लागले आहेत अशांची यादी पाहिली तर 'मल्टिपल टॅलेंट' (निर्मिती, दिग्दर्शन, लेखन, अभिनय) असणारे अनेक लोक दिसतात. 'रायटर्स रूम' ही संकल्पना कदाचित काही वाचकांच्या परिचयाची असेल. वेब सीरिजचे मुख्य क्रिएटर्स - 'शो रनर्स' आणि लेखकांची टीम यांची ही रूम. एका विशिष्ट सीझनमध्ये काय घडेल, कुठल्या व्यक्तिरेखा कुठल्या दिशेने, कशा जातील हे इथे नक्की होतं आणि मग त्यानुसार एपिसोड्स लिहिले जातात. एपिसोड्सचे लेखक वेगवेगळे असले तरी एकदा व्यक्तिरेखा आणि संपूर्ण सीझनची कथा आणि टोन ठरला की त्यानुसारच लेखन होतं. आणि लेखन-दिग्दर्शनाबाबतचे अंतिम निर्णय मुख्य क्रिएटरच्या, शो रनर्सच्या हातात असतात. थोडक्यात पुस्तकाची प्रकरणं लिहिणारे लोक वेगवेगळे असले तरी पूर्ण पुस्तक कसं असायला हवं हे क्रिएटर ठरवतो/ठरवते. मोठ्या रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळे पदार्थ करणारे शेफ्स वेगळे असले तरी रेस्टॉरंटचं जेवण एकूणात कसं असेल, त्यात काय कमी-जास्त करायला हवं हे जसं चीफ शेफ ठरवतो/ठरवते तसंच काहीसं! दृकश्राव्य कलाकृतींच्या निर्मितीप्रक्रियेमध्ये रस असणाऱ्यांसाठी  ही एकूण प्रक्रिया समजून घेणं फार रोचक ठरेल. 'द ऑफिस'मध्ये पॅम आणि अँजेला या दोन भूमिका करणाऱ्या दोन अभिनेत्री - जेना फिशर आणि अँजेला किन्झी - प्रत्यक्ष आयुष्यातही चांगल्या मैत्रिणी आहेत. 'द ऑफिस'चा प्रत्येक एपिसोड कसा घडला याबाबत दोघींनी 'ऑफिस लेडीज' या नावाने एक पॉडकास्ट सीरिज केली आहे. याचेही दोनशेच्या वर भाग आहेत. ऑनलाइन उपलब्ध आहेत. ज्यांना मालिकेच्या मेकिंगमध्ये रस असेल त्यांनी जरूर ऐकावेत. (या विषयवरचं दोघींचं एक पुस्तकही उपलब्ध आहे - द ऑफिस बीएफएफ्स : टेल ऑफ द ऑफिस फ्रॉम टू बेस्ट फ्रेंड्स हू वर देअर).  

दीर्घ काळ चालणाऱ्या (चांगल्या, परिणामकारक) मालिकांचं एक प्रमुख वैशिष्ट्य असं की त्या एक 'समांतर, खरंखुरं वाटणारं जग' उभं करतात. 'ऑफिस'बाबतही हे होतं. या जगात आपण रमतो. विशेषतः एक भारतीय प्रेक्षक म्हणून मी अशा मालिकांमध्ये जास्तच रमतो. कारण अशा मालिका बघत असताना त्यातले जे सांस्कृतिक-वैचारिक बारकावे (आणि धक्के) जाणवतात त्यातून होणारी 'जाणीव-वृद्धी' मला महत्त्वाची वाटते. प्रत्यक्षातील जगात ज्या कमतरता दिसतात, ज्या गोष्टी खटकतात त्यावर 'समांतर जगा'त निदान बोललं जावं, तिथल्या चित्रणात त्या दूर व्हाव्यात अशी अपेक्षा करणं गैर नाही. आणि ते अट्टाहासाने करण्यात अर्थ नसतो. ते सहजतेने व्हावं लागतं. कथेच्या ओघात व्हावं लागतं. 'सटल' चित्रणाची (सूक्ष्म, ठळक किंवा बटबटीत न करता सूचकपणे केलेलं चित्रण) भारतीय प्रेक्षकांना फारशी सवय नाही. आता आता चित्रं थोडं बदलतंय; पण आपण मूलतः मेलोड्रामावाले. 'ओव्हर द टॉप' चित्रण, भावनांची खिचडी हे आपल्याला आवडतं - कारण तेच आपण बघत आलो आहे. त्याचं एक स्थान आहे हे नाकारण्यातही अर्थ नाही. कारण शेवटी शैलीचा तो एक प्रकार आहेच. पण होतं असं की मेलोड्रामाच्या माऱ्यामुळे संथ, सूक्ष्म आणि प्रभावी चित्रण समजून घेण्याची बैठक तयार होत नाही. आजवर पाहिलंच नाही अशा एखाद्या नावीन्यपूर्ण, 'सांस्कृतिक धक्कादायक' पात्राची कल्पना करणंही अवघड होतं. कुटुंब-समाज-परंपरा-देश यांचं स्थान आपल्या जगण्यात महत्त्वाचं आहे. पण 'व्यक्ती'चा नीट विचार झाला, व्यक्तींमधील संबंधांचा जैविक-मानसिक पातळीवर मूलभूत विचार होऊ शकला तर इतर रचनांना अधिक बळ मिळू शकतं. 'रचना' व्यक्तीपेक्षा वरचढ ठरू लागली की व्यक्तीची घुसमट होऊ लागते. ऑफिससारखी मालिका बघताना जाणवतं की 'व्यक्तिरेखा' निर्माण करताना रचनेचं दडपण बाळगलं जात नाही. परंपरा आणि आधुनिकतेचे संघर्ष तिथेही असतात आणि ते खुद्द मालिकेतही दिसतात; पण नव्याला भरपूर अवकाश निर्माण करून दिला जातो हे लक्षात घेण्यासारखं आहे. मेलोड्रामा तुम्हाला भावनिकदृष्ट्या हलवतो; पण संथ-सूक्ष्म चित्रणात तुम्हाला विचारप्रवृत्त करण्याची, चटकन निष्कर्ष न काढता जगण्यातल्या गुंतागुतीबाबत सजग करण्याची क्षमता असते. त्यात ‘तळ’ दिसतो, फक्त ‘पृष्ठभाग’ नाही. आणि तळ हलणंच आवश्यक असतं!  

ऑफिसबद्दल ऑफिसच्या एपिसोड्सइतकंच बोलता येऊ शकेल. पण कुठल्याही उत्तम कलाकृतीप्रमाणे ‘ऑफिस’देखील अनुभवायचीच गोष्ट आहे. भारतीय प्रेक्षकांचा विचार करता, मालिकेची जातकुळी (क्रिन्ज कॉमेडी, मॉक्युमेंट्री) थोडी वेगळी असल्याने तिची पकड बसायला, सवय व्हायला कदाचित थोडा वेळ लागू शकतो. नऊपैकी शेवटचे दोन सीझन्स थोडे ताणले गेले आहेत. या दोन सीझन्समध्ये मालिका थोडी सैल पडते. पण सर्व पूर्वकल्पनांची नोंद घेऊन ‘द ऑफिस’ जरूर  बघावी. 'सृजनात्मक प्रतिभा' (क्रिएटिव्ह जीनियस) अनुभवण्यासाठी बघावी. आपल्या अवतीभवतीचं जग कसं असायला हवं याचा विचार करताना ‘जग असंही असायला हवं’ असं वाटल्याशिवाय राहणार नाही!

(पूर्वप्रसिद्धी : अनुभव, जानेवारी २०२६)

Monday, March 17, 2025

गिन्ट्स झिलबालोडिसचं जग

विसरता येणार नाही असा अनुभव देणारे अनेक चित्रपट आपण बघतो. पण काही चित्रपटांमधून उमटणाऱ्या जाणिवा आपल्या अंतराला विशेष ताकदीने स्पर्श करतात. असे चित्रपट पाहताना त्या चित्रपटाच्या निर्मात्यांबद्दल मला फार आपुलकी वाटू लागते. (निर्माता म्हणजे 'प्रोड्यूसर' या अर्थी नव्हे तर 'क्रिएटर' या अर्थी. प्रोड्यूसर हा अर्थातच महत्त्वाचा. कारण चित्रपट या कलेचा संबंध जितका 'आर्ट'शी आहे तितकाच; किंबहुना थोडा जास्तच 'कॉमर्स'शी आहे. 'सिनेमा इज ॲन अनहॅपी आर्ट, ॲज इट डिपेंड्स ऑन मनी' असं म्हणतात. असो.) २०२०-२१ दरम्यान केव्हातरी अचानक 'अवे' हा ॲनिमेशनपट पाहिला तेव्हा 'गिन्ट्स झिलबालोडिस' या लक्षात ठेवायला अवघड नावाच्या लाटव्हियन लेखक-दिग्दर्शकाविषयी अशी आपुलकी वाटायला लागली. आणि काहीच दिवसांपूर्वी २०२५ चा बेस्ट ॲनिमेशनपट म्हणून गिन्ट्स झिलबालोडिसच्याच 'फ्लो' या चित्रपटाला ऑस्कर मिळाल्यावर लगेचच तो थिएटरमध्ये जाऊन पाहिला. 

‘अवे’ पाहिल्यानंतरची एक गोष्ट नोंदवायला हवी. कुठलाही चित्रपट संपल्यावर शेवटी एक भलीमोठी श्रेयनामावली असते. ॲनिमेशनपट संपल्यावर दिसणारी श्रेयनामावली तर प्रचंड मोठी असते. अक्षरशः शेकडो नावं असतात. चित्रपट बघताना येणारं विस्फारलेपण ही श्रेयनामावली बघताना आणखी विस्फारतं कारण एक  ॲनिमेशनपट तयार करण्यासाठी किती डोकी आणि हात लागतात याची साक्ष म्हणजे ती श्रेयनामावली असते. 'अवे' चित्रपट संपल्यानंतर एका स्लाइडची श्रेयनामावली दिसली होती आणि त्यात फक्त एकच नाव होतं - गिन्ट्स झिलबालोडिस. लेखन, दिग्दर्शन, संगीत, संपादन, निर्मिती सगळं त्याचंच होतं. ते बघून चक्रावून गेलो होतो. एकटा मनुष्य एक संपूर्ण ॲनिमेशनपट करू शकतो ही माझ्यासाठी तरी मोठीच बातमी होती. 'अवे'मध्ये संवाद नसल्याने व्हॉइस ओव्हरचा प्रश्न मिटला होता. पण इतर सर्व आघाड्या एकट्यानेच सांभाळल्या होत्या. 

हे कळल्यावर 'अवे' आणखीनच आवडू लागला. आजवर पाहिलेल्या ॲनिमेशनपटांपेक्षा सर्वस्वी वेगळ्या जातकुळीचं ॲनिमेशन हे 'अवे'चं प्रमुख वैशिष्ट्य होतं. १९९४ च्या 'लायन किंग'पासून २०२५ च्या 'लायन किंग'चा प्रीक्वेल असलेल्या 'मुफासा'पर्यंत असा माझा व्यक्तिगत ॲनिमेशन प्रवास आहे. यात डिस्ने, पिक्सार, ड्रीमवर्क्स या स्टुडिओजच्या एकाहून एक अप्रतिम कलाकृती आहेत. यादी बरीच मोठी आहे त्यामुळे नावं घेत नाही. मात्र या कलाकृतींनी ज्या प्रकारच्या ॲनिमेशनची 'सवय' लावली त्याला गिन्ट्स झिलबालोडिसने त्याच्या पहिल्याच चित्रपटातून धक्का दिला होता. (अर्थात इथे एक मान्य केलं पाहिजे की ॲनिमेशनचे डिस्ने-पिक्सार-ड्रीमवर्क्सपेक्षा वेगळे प्रवाह माझ्याही फारसे परिचयाचे नाहीत. २०११ साली बेस्ट ॲनिमेशनपटाचं ऑस्कर मिळवणारा 'रँगो' हा त्यातल्या त्यात एक अपवाद.नेटफ्लिक्सवरची 'बोजॅक हॉर्समन' ही मालिका हा आणखी एक सणसणीत अपवाद. जपानी ॲनिमेशन चित्रपट दिग्दर्शक हायाओ मियाझाकी हे नावही थोडं परिचयाचं; पण त्याचा चित्रपट पाहिलेला नाही). आणि 'अवे'ने जे केलं तेच पुन्हा 'फ्लो'नेही केलं!

'अवे' एका लहान मुलाभोवती फिरतो तर 'फ्लो' एका मांजराभोवती. दोन्ही चित्रपटांमध्ये जगण्याची धडपड - 'सर्व्हायव्हल' - हे सूत्र आहे. दोन्ही चित्रपटांचा 'लँडस्केप' आणि संगीत अविस्मरणीय आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये संवाद नाहीत. आणि दोन्ही चित्रपटांनी ॲनिमेशनपटांच्या 'फील गुड' साच्याला मोडीत काढलं आहे. रंगांची देखणी उधळण, डोळे पुन्हा पुन्हा सुखावतील असा विस्मयकारक, विलोभनीय निसर्ग, खिळवून ठेवणारी साहसदृश्यं आणि एकूणात सगळं 'छान, छान' या वाटेवरून बहुसंख्य ॲनिमेशनपट जाऊ लागल्यानंतर त्यात काहीसा एकसुरीपणा जाणवू लागला होता. कथेचं नावीन्य, प्रभावी लेखन-सादरीकरण, तंत्राची अफलातून करामत याबाबत बोट ठेवायलाही कुठे जागा नाही; पण अनुभवाच्या पातळीवर मात्र उणेपणा जाणवतोय असं होत होतं. ('फील गुड' अनुभवात एका मर्यादेपुढे तोचतोपणा जाणवू लागतो. तसं होत होतं.) ही उणीव 'अवे' आणि 'फ्लो'ने भरून काढली. 'अवे'मधला जंगलात हरवलेला मुलगा, त्याला सोबत करणारा पक्षी आणि 'फ्लो'मधली जलप्रलयात स्वतःला वाचवू पाहणारी मांजर आणि तिचे काही प्राणी सोबती यांच्याशी आपण ज्या प्रकारे जोडले जातो ते जोडलेपण वेगळ्या जातकुळीचं आहे. या दोन्ही चित्रपटांच्या कथा हे याचं एक कारण आहेच; पण हे ॲनिमेशनदेखील वेगळ्या जातकुळीचं आहे. एखाद्या चित्रकाराने काढलेलं सुंदर चित्र अचानक हलू लागावं तसं ते आपल्यासमोर येत जातं. आणि तसंच वावरतं. त्यातला जिवंतपणा आणि प्रवाहीपणा अद्भुत आहे. सहसा ॲनिमेशनपटांमध्ये रेखीवपणा, प्रमाणबद्धता, व्यक्तिरेखांचं वैविध्य, त्यांची अतिशय कल्पक रूपरेषा हे सगळे घटक असतातच. गिन्ट्स झिलबालोडिसच्या ॲनिमेशनची मुख्य वैशिष्ट्यं म्हणजे कथेचा वेगळेपणा, आपण आखीव-रेखीव काही बघतोय यापेक्षा 'रेषांचा, चित्रांचा मनोहर, गुंतवून ठेवणारा खेळ बघतोय असं वाटणं आणि ॲनिमेशनपटांमध्येदेखील दुर्मीळ झालेला शांतपणा, ‘ठहराव’. हा ठहराव असूनही त्याचे चित्रपट अजिबात कंटाळवाणे झालेले नाहीत. समोर जे सुरु असतं तिथून तुम्ही नजर हलवू शकत नाही. 

गिन्ट्स झिलबालोडिसने त्याच्या दोन्ही चित्रपटांमध्ये उभं केलेलं जग आणि त्या जगात घडणाऱ्या कथा यात 'मृत्यू' हा एक कळीचा घटक आहे. 'अवे'मध्ये तर प्रत्यक्ष मृत्यूच पाठलाग करतो आहे तर 'फ्लो'मध्ये मृत्यूचं भय पाठलाग करतं आहे. शिवाय चित्रपटात मृत्यूचे आणखी काही उत्कट संदर्भही आहेत. मृत्यू हा विषय चित्रपटांमध्ये कायम घोटाळत असल्यामुळेच फक्त नाही तर कथेच्या एकूण सलग 'दृश्य प्रकृती'मुळे, मांडणीमुळे या दोन्ही चित्रपटांना 'चिंतना'ची डूब मिळाली आहे. या चित्रपटांची ही 'चिंतनात्मक बाजू' हे गिन्ट्स झिलबालोडिसचं क्रिएटर म्हणून फार मोठं यश आहे.  

'अवे' आणि 'फ्लो' दोन्हीमध्ये जंगल, पाणी, डोंगर यांचे अचंबित करणारे आविष्कार दिसतात. प्राणी-पक्ष्यांचे देखणे नमुने दिसतात. 'फ्लो'मधलं पाण्याचं दर्शन तर अतिशय मनोवेधक आहे. 'अवे'मधला मुलगा आणि 'फ्लो'मधली मांजर या दोघांच्या दृष्टीने तुम्ही ते जग पाहू लागता आणि त्या दोघांचा 'एकटेपणा'ही तुम्हाला जाणवत राहतो. चित्रपटांमध्ये 'फील गुड फॅक्टर' नसल्याने हा एकटेपणा तुमच्या आत नीटपणे प्रवेश करतो. या दोघांच्या आसपासचं जगही कोलाहलाचं नाही. तिथे प्राणी-पक्ष्यांचे समूह आहेत; पण त्यांच्यातही एक एकटेपण आहे. अनेकविध व्यक्तिरेखांनी एकत्र येऊन घातलेला गोंधळ, गडबड, त्यांची साहसं, त्यांना येणारं अपयश आणि अंतिमतः येणारं यश या 'नेहमीच्या यशस्वी' लक्षणांचा इथे अभाव आहे. इथे काही मोजक्या प्राण्यांनी ('व्यक्तिरेखा' म्हणतो तसं ॲनिमेशनपटांच्या संदर्भात 'प्राणीरेखा' म्हणता येईल का?) त्यांच्या जगण्यातला एक भाग उघड केला आहे. ते त्यांच्या गतीने, त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या क्षमतेनुसार संकटांना तोंड देत चालले आहेत आणि तुम्ही ते जवळून पाहताय इतकंच इथे घडतंय.  

तांत्रिक अंगाने अतिशय सफाईदार, उत्तम ‘फिनिशिंग’ असलेला, भव्य सेट्स आणि थरारक साहसदृश्ये असलेला एखादा ॲक्शनपट किंवा ॲनिमेशनपट बघणं हे आता नवीन राहिलेलं नाही. पण डिजिटल चकचकीतपणाच्या, दृश्य-रंग-प्रसंग यांची रेलचेल असणाऱ्या काळात अचानक लहानपणी पाहिलेलं 'बालभारती'चं मुखपृष्ठ समोर आलं किंवा आकाशवाणीवरच्या निवेदकाचा शांत, संवादी आवाज ऐकू आला की जे होतं तेच 'अवे' आणि 'फ्लो' बघून होतं. 

पण या शांतावणाऱ्या जाणिवेबरोबरच दुसरीही एक जाणीव होते. ती म्हणजे - आज तंत्रज्ञानामुळे कल्पक डोक्याच्या ॲनिमेटरला एकट्याने अशक्यप्राय वाटतील अशा गोष्टी करणं शक्य आहे.  'अवे' हा चित्रपट गिन्ट्स झिलबालोडिसने 'माया' हे कंप्यूटर ग्राफिक्स ॲप्लिकेशन वापरून केला होता तर 'फ्लो' हा चित्रपट 'ब्लेंडर' हे मोफत, ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरून केला आहे. तंत्रज्ञान मुक्त होऊ लागल्याने एकीकडे समाजमाध्यमांवरून सवंग 'कंटेंट'ला उधाण आलेलं असताना दुसरीकडे गिन्ट्स झिलबालोडिससारखा सर्जक, चिंतनशील वृत्तीचा तीस वर्षांचा तरूण जागतिक सिनेमाला वळण देऊ शकतील या दर्जाच्या कलाकृती निर्माण करतो आहे. अशा वेळी ‘तंत्रज्ञान कुणाच्या हातात आहे यावर त्या तंत्रज्ञानाचा सामाजिक परिणाम ठरतो’ याची प्रचिती येते. 

'अवे' आणि 'फ्लो' हे दोन्ही चित्रपट जरूर पहा. 'फ्लो' सध्या थिएटर्समध्ये आहे. आणि तो थिएटरमध्येच जाऊन बघावा. हे दोन्ही चित्रपट प्राइम व्हिडीओवर रेंटवर उपलब्ध आहेत. गिन्ट्स झिलबालोडिसचं हे जग अद्भुत आहे, आश्वासक आहे आणि आजच्या विखंडित काळाला थोडं तरी सांधू शकेल असं आहे. सिनेमा बघून बाहेर पडताना डोक्यात इतर कुठली अनाठायी, एकांगी खळबळ माजण्यापेक्षा चिंतनाच्या शांत लाटा असतील, आपण आणि सृष्टी याबद्दलची एक उन्नत समज असेल तर ते या काळासाठी नक्कीच उपकारक ठरेल!

(अक्षरनामा, १६ मार्च २०२५) 

Tuesday, October 1, 2024

वेड्या दोस्तीतली शहाणीव

अलीकडे एकदा रेल्वे प्रवासात शेजारच्या सीटवर बसलेल्या मुलीच्या हातातील मोबाइल स्क्रीनवर लक्ष गेलं तेव्हा ती 'फ्रेंड्स' बघते आहे असं लक्षात आलं. (ती हेडफोन लावून बघत होती हे एक उल्लेखनीय. कारण सार्वजनिक ठिकाणचा किंवा खरं तर कुठल्याही ठिकाणचा मोबाइल वापर यावर वेगळ्या शाळा सुरु करण्याची गरज निर्माण झाली आहे. असो.) मुलगी विशीतली होती. दोन हजार नंतर जन्मलेलं कुणीतरी 'फ्रेंड्स' बघतं आहे हे मला लक्षणीय वाटलं. तिच्याशी काही बोलणं झालं नाही; पण तिच्या वयाच्या मुला-मुलींना 'फ्रेंड्स' कशी वाटते हे समजून घेणं रोचक ठरेल! 'फ्रेंड्स'चा माझा आजवरचा अनुभव लक्षात घेतला तर 'फ्रेंड्स' प्रचंड आवडलेली माझी अनेक मित्रमंडळी आहेतच. याशिवाय 'अरे मी आत्ता पाहिली फ्रेंड्स आणि मला जाम आवडली!' असं म्हणणारी काही वयाने ज्येष्ठ मंडळीही आठवतात आणि लोकप्रिय कलाकृतींवर सहसा नाखूष असणाऱ्या (दॅट इज टू मेनस्ट्रीम!) काही मंडळींनी 'हं...फ्रेंड्स!!' असं म्हणून फ्रेंड्सला निकालात काढलेलंही आठवतं.

न्यू यॉर्कच्या मॅनहटन परिसरात राहणारे सहा मित्र-मैत्रिणी, त्यांचं एक नेहमीचं कॉफी हाऊस, तिथल्या त्यांच्या अचाट-अद्भुत गप्पा, त्यांची आपसातली आणि इतरांबरोबरची प्रेमं आणि प्रेमभंग, कौटुंबिक आणि इतर नात्यांमधलली मौज, प्रत्येकाचं करिअर आणि त्या आघाडीवरचे गोंधळ आणि गमती, या सहाजणांचा वेडेपणा आणि शहाणपणा आणि या दोन टोकांच्या मधल्याही जागा अशा एका रसरशीत वाहत्या रसायनाने दहा वर्ष या मालिकेने प्रेक्षकांना गुंगवून ठेवलं. २२ सप्टेंबर १९९४ रोजी फ्रेंड्सचा पहिला आणि ६ मे २००४ रोजी शेवटचा एपिसोड प्रदर्शित झाला. पहिला एपिसोड अंदाजे दोन कोटी प्रेक्षकांनी पाहिला होता तर शेवटचा एपिसोड अंदाजे साडेपाच कोटी लोकांनी पाहिला. (सगळी कुंडली इंटरनेटवर सहज मिळेलच). फ्रेंड्सच्या अगोदर, त्याच धर्तीची 'साइनफेल्ड' ही मालिका १९८९ साली सुरु झाली होती. ती १९९८ साली संपली. १९९४ ते १९९८ अशी चार वर्षं दोन्ही मालिका एकाच वेळी सुरु होत्या. पण फ्रेंड्सने जनमानसावर जे गारुड केलं ते अजोड ठरलं. मोनिका-चँडलर-रॉस-रॅचेल-फीबी-जोई हे सहाजण जगभरातील प्रेक्षकांच्या भावविश्वात जे उतरले ते उतरलेच! अगदी आता आतापर्यंत नेटफ्लिक्सच्या भारतातील 'टॉप टेन' मध्ये फ्रेंड्सचा समावेश होता. ('साइनफेल्ड'बद्दल खरं तर वेगळं लिहिता येईल कारण दोन्ही मालिका एकाच धर्तीच्या असल्या, 'सिटकॉम' (सिच्युएशनल कॉमेडी) असल्या तरी 'साइनफेल्ड'मधला संथपणे तीक्ष्ण असणारा बौद्धिक विनोद आणि मालिकेचं स्ट्रक्चर वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळं होतं).  

'फ्रेंड्स' मी दोन हजारच्या दशकात केव्हातरी पाहिली. मी पाहिलेली ही पहिलीच पाश्चात्त्य मालिका. त्यानंतर आज वेब सीरिज काळापर्यंत अनेक उत्तमोत्तम मालिका पाहिल्या गेल्या. 'मॉडर्न फॅमिली' हा देखणा फॅमिली ड्रामा, 'बिग बँग थिअरी' ही फ्रेंड्सची वारस म्हणता येईल अशी विलक्षण ताकदीची कॉमेडी, 'हाउस ऑफ कार्ड्स' हा जडजहाल राजकीय ड्रामा, 'गेम ऑफ थ्रोन्स'सारखा प्रत्येक एपिसोडगणिक तोंडात बोटं घालायला लावणारा प्रकार, 'ब्रेकिंग बॅड' आणि 'बेटर कॉल सॉल'सारख्या मालिकांचा कथनात्मक आणि दृश्यात्मक पातळीवरचा अविस्मरणीय प्रभाव, 'द ऑफिस'सारखी लाजवाब क्रिन्ज कॉमेडी, 'ब्लॅक मिरर'चा सुन्न करणारा 'डिस्टोपिया' आणि इतरही अनेक. हे कलाविष्कार अनुभवताना निर्मात्यांच्या कल्पनाशक्ती-लेखन-दिग्दर्शन-अभिनय-सादरीकरण या सर्वच आघाड्यांवरील मजबूत पकडीचा हेवा वाटला. लेखनाचा तर फारच वाटला. पण या सफरीची सुरुवात केली ती 'फ्रेंड्स'ने. म्हणूनही माझ्यासाठी 'फ्रेंड्स'चं एक विशेष स्थान आहे.  

'फ्रेंड्स'ने जो मनाचा ताबा घेतला होता त्यातही लेखन हा कळीचा मुद्दा होताच. मुळात फ्रेंड्स ही इतर सिटकॉम्ससारखीच बहुतांशी इनडोअर शूटिंग झालेली मालिका. अशा मालिकेत तांत्रिक करामतींना एका मर्यादेपर्यंतच वाव असतो. मुख्य मदार लेखन, अभिनय यावरच. (अर्थात लेखन ही गोष्ट अगदी तांत्रिकदृष्ट्या बलाढ्य अशा ‘गेम ऑफ थ्रोन्स’सारख्या मालिकेतही प्रथम स्थानी असते हेही नोंदवण्यासारखं आहे.). 'इन द बिगिनिंग देअर वॉज द वर्ड' असं बायबलमधलं एक विधान आहे. (अँड द वर्ड वॉज विथ गॉड अँड द वर्ड वॉज गॉड हा त्या विधानाचा पुढचा भाग). एखादी चांगली कलाकृती पाहून झाली की मला हे विधान हटकून आठवतं. मार्टा काउफमन आणि डेव्हिड क्रेन हे दोघे फ्रेंड्सचे जनक, कर्तेधर्ते. पण त्यांच्या लेखकीय टीममध्ये इतर पुष्कळजण होते. फ्रेंड्सची कथा पुढे नेताना घडणाऱ्या अनेक प्रासंगिक विनोदांपैकी कुठला प्रसंग कुणी लिहिला हे सांगणं अवघड आहे; पण फ्रेंड्स बघताना या लेखकांना उठून दाद देण्याचे प्रसंग वारंवार येतात. (तरी 'रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका'च्या '१०१ बेस्ट रिटन टीव्ही सीरिज'च्या यादीत फ्रेंड्स चोविसाव्या स्थानावर आहे हे जाता जाता नोंदवतो).     
भारतीय-मराठी-मध्यमवर्गीय मुशीत वाढलेल्या माझ्यासारख्याला फ्रेंड्सची जी मोहिनी पडली त्यात पटकथा आणि सादरीकरणाच्या पलीकडे जाणारं बरंच काही होतं. संस्कृती, परंपरा आणि मंडळींच्या कडेकोट बंदोबस्तात असलेल्या पौगंडावस्थेपासून पुढे येताना काहीजणांना त्याबद्दल प्रश्न पडतात तर काहीजणांना बहुधा 'तो बंदोबस्तच योग्य आहे' असं वाटू लागतं. (सांस्कृतिक स्टॉकहोम सिंड्रोम!) अशा बंदोबस्तात वाढलेले आम्ही कॉलेजच्या पहिल्या-दुसऱ्या वर्षापर्यंतदेखील 'मैत्रीण' शब्दाच्या नुसत्या उल्लेखानेही जिथे महिरत होतो तिथे फ्रेंड्समधल्या मित्र-मैत्रिणींची भाषा, त्यांचे एकमेकांना होणारे सहज स्पर्श, प्रेमापासून शरीरसंबंधांपर्यंत होणाऱ्या सहज चर्चा, सर्वच मानवी उर्मींना समजून घेत त्यांच्याशी 'डील' करायची वृत्ती हे सगळं बौद्धिक पातळीवर फारच आनंददायक वाटत होतं. तोवर असं 'रॅशनल' दर्शन आपल्याकडच्या चित्रपट-मालिकांमधून कधी घडलं नव्हतं. कुटुंबव्यवस्थेचं, संस्कारांचं उदात्तीकरण बघत होतो; पण पौगंडावस्थेत शरीर आणि मन एकेकट्याने किंवा एकत्रितपणे काही अवघड प्रश्न विचारतात त्यांची उत्तरं मिळत नव्हती. रोमँटिक प्रेमाला 'लफडं' हा शब्द माहीत होत होता आणि शारीरिक आकर्षणाला तर नीट शब्दच नव्हता. एकूणच पौगंडावस्थेत आणि त्यानंतरही जे काही होतं ते सांगण्यासाठीची भाषाच मुळात उपलब्ध नव्हती. फ्रेंड्स बघताना ती भाषा सापडली हे माझ्या दृष्टीने फ्रेंड्सचं मोठं देणं आहे. 
'फ्रेंड्स'चे जनक - केव्हिन ब्राइट, मार्टा काउफमान आणि डेव्हिड क्रेन   


तुम्ही कुणालातरी भेटता, मग डेटिंग सुरू होतं, मग तुम्हाला पुढे जावंसं वाटलं तर तुम्ही एकत्र राहू लागता, त्यानंतर वाटलं तर लग्न करता असा एक 'तार्किक प्रवास' फ्रेंड्समुळे बघायला मिळाला. आणि यातल्या कुठल्याही पायरीवरून मागे फिरता येतं आणि दुसऱ्याबरोबर हाच प्रवास करता येतो हे तर आणखी थोर. एकदम लग्नच करून न टाकण्याचा पर्याय उपलब्ध असू शकतो हे मोठंच ज्ञान मिळालं. शिवाय या सगळ्या प्रवासात काही ठेचा खाव्या लागल्या तरी 'बाटलीशरण देवदास' होण्याची गरज नाही; तुम्ही माफक प्रमाणात दुःखी होऊन पुन्हा आपल्या कामावर लक्ष द्यावं, आपलं आयुष्य नीट जगावं हेही इथे शिकायला मिळालं! आपल्याकडे त्यावेळी 'तू नहीं तो कोई नहीं', 'लुट गये तेरी मोहोब्बत में', 'जिंदगी में हम प्यार सिर्फ एक बार करते है' असा 'सिंग्युलर’ पातळीवरचा प्रेमविव्हल धडाका सुरु होता. 

प्रेमाबरोबरच दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे शारीरिक आकर्षण. प्रेमाबद्दलच जिथे संकल्पना आणि व्यवहार दोन्ही पातळ्यांवर आनंदीआनंद होता तिथे लैंगिक गरजेबाबतची चर्चा म्हणजे दूरची गोष्ट. हा विषय कडेकोट बंदोबस्ताच्याही कडेकोट बंदोबस्तात होता. आणि इथे हे सहाजण तर कॉफी पिता पिता आपल्या लैंगिक अनुभवांबाबत बोलत होते. त्याबाबतची वैचारिक देवाणघेवाणही करत होते. आपण मित्रांशी जसं इतर अनंत विषयांवर बोलतो तसंच हाही एक विषय आहे, त्याचं ओझं होऊ देण्याची गरज नाही, कॉफी संपली की हा विषयही संपवून आपल्या कामाला जावं यातली सहजता फारच सुंदर होती. 

अर्थात फ्रेंड्सच्या केंद्रस्थानी आहे ती मैत्री. ती या मालिकेची मुख्य 'थीम'. सहापैकी चौघे (मोनिका-चँडलर आणि रॉस-रॅचेल) एकत्र येतात. त्याआधी त्यांची अन्य रोमँटिक नाती आहेतच. पण लग्नापर्यंत गेलेलं रोमँटिक नातं हे त्यांच्या मुळातल्या मैत्रीची परिणती म्हणून येतं. तारुण्यातील परस्परसंबंध, त्यांचं 'व्यवस्थापन' यात रोमँटिक नात्याच्या बरोबरीचा वजनदार घटक म्हणजे मैत्री आणि त्यातले ताणतणाव, गैरसमज इ. फ्रेंड्समध्ये मैत्रीतले हे ताणतणाव ज्या प्रगल्भपणे हाताळले जातात ते पाहणं तरुणांना आणि प्रौढांनाही काही शिकवणारं ठरलं. अर्थात अशी प्रगल्भ हाताळणी होऊन शेवट गोड होणं हे तसं 'मेनस्ट्रीम' आहे हे खरंच. पण फ्रेंड्सची धाटणीच ती आहे. 'ब्लॅक मिरर'सारख्या मालिकेत जसं तुम्ही गोड शेवटाची अपेक्षा करू शकत नाही तसंच 'फ्रेंड्स'सारख्या मालिकेत तुम्ही कठोर शेवटाची अपेक्षा करू शकत नाही. (कठोर म्हणजे वास्तववादी का? असा प्रश्न येऊ शकेल; पण कलेतील वास्तव हे 'वास्तवातलं वास्तव' नसून 'कल्पनेतलं वास्तव' असतं हे लक्षात घेऊ. इथे थोडा संघर्ष आहे हे खरं. पण तो स्वतंत्र विषय आहे). 

फ्रेंड्सच्या अफाट लोकप्रियतेमागचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे विनोद. प्रसंगनिष्ठ, व्यक्तीनिष्ठ, शब्दनिष्ठ अशा सर्व आघाड्यांवर फ्रेंड्समधला विनोद बाजी मारतो. मला यासंदर्भात सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे एखाद्या गंभीर प्रसंगातही अचानकपणे अवतीर्ण होणारा विनोद! अमेरिकन समाजाचं प्रत्यक्ष 'स्वभावचित्र' असं असेल-नसेल; पण कल्पिताच्या पातळीवर तरी अशी तरतरीत विनोदबुद्धी असणारी माणसं दिसणं हे मोठंच समाधान आहे. एखाद्या गंभीर प्रसंगातही उत्तम विनोद 'प्लेस' करता येणं हे बौद्धिक क्षमतेचं काम आहे. मला तर विनोद हा सृजनशील आविष्कारापेक्षाही 'ॲटिट्यूड'चा (प्रवृत्ती) भाग जास्त वाटतो. शिवाय फ्रेंड्समध्ये लैंगिक संदर्भातील विषयांना, उल्लेखांना वरचेवर विनोदाच्या मुशीतून काढून अतिशय देखण्या पद्धतीने हाताळलं गेलं आहे. 'कामतृप्तीच्या सात झोन्स' याबाबतच्या चर्चेचा मोनिकाचा चँडलर आणि रॅचेलबरोबरचा अतिशय गाजलेला प्रसंग हे चटकन आठवलेलं उदाहरण. अशी बरीच देता येतील. याखेरीज इतर अनंत विनोदी प्रसंग आणि शाब्दिक विनोद आहेतच. यात चँडलर (ही भूमिका करणाऱ्या मॅथ्यू पेरीचं अलीकडेच निधन झाल्याचं काहीजणांना आठवत असेल) विशेष उल्लेखनीय. चँडलरच्या 'वन लायनर्स' हा एक मोठाच विषय आहे! 

सहा मुख्य पात्रांच्या अभिनयाबद्दल काय बोलावं? एकालाही दुसऱ्यापेक्षा कमी-जास्त तोलता येणार नाही इतके हे सहाजण एकमेकांना पुरून उरले आहेत. कोर्टनी कॉक्स, लीसा कूड्रो, जेनिफर ॲनिस्टन, मॅथ्यू पेरी, डेव्हिड श्विमर, मॅट ल ब्लांक या सहा अभिनेत्यांना इतर कुठल्याही भूमिकेपेक्षा, त्यांच्या स्वतःहीपेक्षा, फ्रेंड्समधलं एक पात्र म्हणून कायमची ओळख मिळाली यातच सगळं आलं.

सामाजिकदृष्ट्या किंवा कलात्मकदृष्ट्या 'आयडियॉलॉजिकल' अंगाने विचार केला तर कुठल्याही कलाकृतीमध्ये कुणाला काही तर कुणाला काही न्यून सापडतंच. पण शेवटी कुठलीही कलाकृती तिच्या काळाचे ठसे घेऊनच येत असते. दोन हजारोत्तर जगात एकीकडे अस्मितेच्या राजकारणाला उधाण आलेलं असलं तरी अलीकडील अमेरिकन-युरोपियन वेब सीरिज, चित्रपट पाहिले तर कृष्णवर्णीय, हिस्पॅनिक, इस्लामिक, चिनी, कोरियन, भारतीय मुळांची अनेक पात्रं दिसतात. गे, लेस्बियन आणि अन्य सेक्शुअल ओरिएंटेशनच्या पात्रांचीही रेलचेल असते. ओटीटी, टेलिव्हिजन आणि सिनेमाचं जग तरी अधिक समावेशक झालेलं आहे. नव्वदीच्या दशकात आलेल्या फ्रेंड्समध्ये मुख्य पात्रं आणि सहायक पात्रांमध्ये काही तुरळक अपवाद सोडता गोऱ्या अमेरिकन्सचाच बोलबाला होता. एका लेस्बियन जोडप्याचं छोटं उपकथानक आहे. (काही वर्षांनी आलेल्या 'मॉडर्न फॅमिली'मध्ये एक गे जोडपं मध्यवर्ती भूमिकेत आहे आणि संबंधित चर्चाही बरीच आहे). पण हा काही मालिकेचं मूल्यमापन करण्याचा प्रबळ मुद्दा असू शकत नाही. 'फ्रेंड्स'सारख्या राक्षसी लोकप्रियता लाभलेल्या मालिकेबद्दल आजवर पुष्कळच लिहिलं गेलं आहे. मागे केव्हातरी एका वेबसाइटवरील लेखात ‘फ्रेंड्स’मध्ये समावेशकता नाही’ अशा आशयाची टिप्पणी वाचली तेव्हा गंमत वाटली होती. कारण मुद्दे काढायलाच बसलं तर बरेच मुद्दे जन्माला घालता येऊ शकतात. 'फ्रेंड्स'मधली सगळी मुख्य पात्रं ‘स्ट्रेट’ आहेत हाही मग कदाचित टीकेचा मुद्दा होऊ शकेल! (जे दाखवलं जातं असतं ती ‘कथा’ असते; ते ‘सामाजिक कर्तव्य’ म्हणून केलं जावं हा आग्रह अस्थानी आहे).

दहा वर्ष चाललेल्या, २३६ भागांच्या ‘फ्रेंड्स’मध्ये कलात्मक, मूल्यात्मक अंगाने टिप्पणी करावी अशा काही जागा सापडू शकतीलच. पण ‘फ्रेंड्स’ त्याहून खूप जास्त काही आहे हे खरं. वर उल्लेख केला त्याप्रमाणे काही प्रौढ मित्रमंडळी 'फ्रेंड्स' अतिशय आवडल्याचं सांगत तेव्हा मला कळायचं की यांनादेखील हे 'दर्शन' बहुधा नवीन असणार. त्यांना असं 'लिबरेटिंग', मुक्तपणाचा अनुभव देणारं जगणं माहीत नसणार. 'फ्रेंड्स'ने निर्माण केलेला अवकाश हा अशा मुक्ततेचा अवकाश आहे. माझ्यासाठी आणि इतरही अनेकांसाठी तो नवीन होता. काही वेगळ्या, मजबूत पाया असलेल्या शक्यतांच्या जगात नेणारा होता. मला इतर कशाहीपेक्षा हे जास्त मोलाचं वाटलं. बाकी मग कला, कलेचं प्रयोजन, कलासमीक्षा यावर हजारो पानं आणि परिसंवाद खर्ची पडतच असतात. त्यामुळे ती चर्चा थोडी बाजूला ठेवून, तीस वर्षांपूर्वी जन्मलेल्या आणि नंतर सातत्याने 'क्रिएटिव्ह किक' देणाऱ्या या मालिकेचा कुठलाही एपिसोड कुठूनही पाहायला सुरुवात करत, हातातला प्याला उंचावून फक्त 'टू द फ्रेंड्स!' इतकंच म्हणावंसं वाटतं.  

(लोकसत्ता, 'लोकरंग' २९ सप्टेंबर २०२४)