'कितने आदमी थे' हा एक गहन प्रश्न आहे. कुठल्याही चित्रपटाच्या निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दिवशी सर्वाधिक भेडसावणारा प्रश्न हाच असेल! अर्थात इतर प्रेक्षकांसारखाच मला हा प्रश्न माहीत आहे तो 'शोले'मुळे. आता 'शोले' हा चित्रपट तुम्हाला आवडतो की आवडत नाही याला महत्त्व नसतं. 'शोले' तुम्हाला टाळता येत नाही एवढंच खरं असतं. सिनेमा या प्रकरणाबाबत माझं काहीसं असंच होत असावं.
शाळा आणि कॉलेजच्या दिवसात आशय आणि मांडणीचा फारसा विचार न करता इमोशन आणि अॅक्शनच्या प्रेमात पडून पाहिलेल्या चित्रपटांपासून चिंतनशील चित्रपटदेखील असू शकतो याची खात्री पटवणाऱ्या चित्रपटांपर्यंतचा प्रवास रंजक आहे. आणि यात भलतंच 'मिक्सिंग' आहे. अनेकजणांनी मिळून हे मिक्सिंग केलं आहे. म्हणजे 'अग्निपथ'च्या विजय दीनानाथ चौहान पासून 'कथा'मधल्या राजाराम पांडुरंग जोशीपर्यंत, विष्णुपंत पागनीसांच्या 'तुकारामा'पासून 'कमीन्या' चार्लीपर्यंत, 'अर्धसत्य'च्या अनंत वेलणकरपासून 'सत्या'च्या भिकू म्हात्रेपर्यंत, 'डेड पोएट्स सोसायटी'च्या जॉन कीटिंगपासून 'देअर विल बी ब्लड'च्या डॅनियल प्लेनव्ह्यूपर्यंत, 'स्कारफेस'च्या टोनी मोंटानापासून 'माय फ़ेअर लेडी'च्या हेन्री हिगिन्सपर्यंत, 'उंबरठा'च्या सुलभा महाजनपासून 'मिस लव्हली'च्या पिंकीपर्यंत, गुरुदत्तच्या 'प्यासा'पासून इम्तियाज अलीच्या 'रॉकस्टार'पर्यंत आणि सानेगुरुजींच्या श्यामपासून 'फँड्री'च्या जब्यापर्यंत! प्रत्येकाची एक गोष्ट आहे, प्रत्येकाचं सुख-दुःख आहे आणि समाजवास्तवाच्या भयचकित करणाऱ्या प्रवाहाच्या पार्श्वभूमीवर आपलं, म्हणजे प्रेक्षकांचं त्यांचं त्यांनाच दृश्यमान होणारं जगणं आहे.
सिनेमाविषयी पुष्कळ बोललं जातं, बोलता येईल. पण मला विचार करताना नेहमी वाटतं की एक धागा या कलेशी कायम जोडलेला आहे आणि तो म्हणजे 'क्रिएटिव्ह टॅलंट'चा धागा. चांगला सिनेमा कुठल्याही विषयावरचा असला, त्या पात्रांची पार्श्वभूमी कोणतीही असली तरी तो 'चांगला' होतो या कलात्मक बुद्धिमत्तेमुळे. चित्रपट पाहणारा तो चित्रपट स्वतःबरोबर घरी नेतो तो याच कलात्मक बुद्धिमत्तेमुळे. आणि ही चित्रपटात जागोजागी दिसते. ती 'देव डी'च्या स्टायलाइज्ड निर्मितीत दिसते, 'ओंकारा' किंवा 'अब तक छप्पन' च्या भेदक संवादात दिसते, मराठीत अभावानेच दिसणाऱ्या 'फँड्री'च्या अचूक कास्टिंगमध्ये दिसते, 'एलएसडी', 'अग्ली'च्या खिळवून ठेवणाऱ्या बांधणीत दिसते, 'आंखो देखी' किंवा 'शिप ऑफ थिसियस'च्या समृद्ध जाणिवांमध्ये, सखोल चिंतनामध्ये दिसते - अगदी 'कजरारे'सारख्या गाण्याच्या योग्य प्लेसमेंटमध्येसुद्धा दिसते. मला प्रामाणिकपणे असंही वाटतं की कलात्मक बुद्धिमत्ता हा दुष्प्राप्यच प्रकार आहे. ती सहजी प्रसन्न होणारी गोष्ट नाही. त्यामुळे कुठल्याही कलेसारखीच इथेही गरजेची असते ती प्रतिभा आणि जोडीला अफाट प्रयत्नांची साधना!
हिंदी, मराठी आणि इंग्लिशमधल्या अनेक प्रतिभावंत लेखक-दिग्दर्शकांनी हा आनंद दिला आहे. हिंदी आणि मराठीबाबत बोलायचं झालं तर आज चांगले चित्रपट चालण्याची जरी नाही तरी निर्माण होण्याची शक्यता खूप वाढली आहे हे आशादायक आहे. मुख्य म्हणजे लेखन, अभिनय आणि सादरीकरण या महत्त्वाच्या अंगांना न्याय देणाऱ्या चित्रपटांचं स्वागत होत आहे ही समाधानाची बाब आहे. मात्र सिनेमा हे आधी होतं तितकं सोपं प्रकरण राहिलेलं नाही याची नोंद घेणं गरजेचं झालं आहे. आजचा सिनेमा हा निःशंक मनाने आस्वाद घ्यावा असा कलाप्रकार म्हणून मर्यादित राहिलेला नाही. सिनेमाचं कलात्मक निर्मिती म्हणून असलेलं एक रूप, त्याचं व्यवसाय म्हणून असलेलं आणखी एक वेगळं रूप, सिनेमाच्या अर्थकारणामागची काळी बाजू, सलमान खानसारख्या प्रकरणांमुळे संवेदनेवर बसणारे घाव, सिनेमाला आणि अभिनेत्यांना मिळत असलेलं अवास्तव महत्त्व, सिनेमा ही कला आहे - प्रत्यक्ष जगणं वेगळं आहे आणि आपल्याकडून कृतीची अपेक्षा करणारं आहे याचा पडणारा विसर अशा अनेक गोष्टी सिनेमाकडे फक्त कला म्हणून न बघता समाजावर आघात करणारी गोष्ट म्हणून बघायला भाग पाडतायत. अशा वेळी वाटतं ते एकच - कला असो, व्यवसाय असो की आणखी काही असो, समाजाची सर्व अंगे मूल्यभान असलेल्यांच्या हातातच सुरक्षित राहू शकतात. त्यामुळे सिनेमादेखील मूल्यभान असणाऱ्यांच्या हातातच राहावा ही सदिच्छा!
No comments:
Post a Comment