Saturday, May 16, 2015

सिनेमा : आवड आणि अवधान

'कितने आदमी थे' हा एक गहन प्रश्न आहे. कुठल्याही चित्रपटाच्या निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दिवशी सर्वाधिक भेडसावणारा प्रश्न हाच असेल! अर्थात इतर प्रेक्षकांसारखाच मला हा प्रश्न माहीत आहे तो 'शोले'मुळे. आता 'शोले' हा चित्रपट तुम्हाला आवडतो की आवडत नाही याला महत्त्व नसतं. 'शोले' तुम्हाला टाळता येत नाही एवढंच खरं असतं. सिनेमा या प्रकरणाबाबत माझं काहीसं असंच होत असावं. 

लेखन, अभिनय, संगीत, दृश्य मांडणी या सगळ्याच्या अफलातून एकत्रीकरणातून निर्माण होणारं रसायन म्हणजे सिनेमा. अफलातून अशासाठी की इथे संगीत नुसतं संगीत म्हणून न येता प्रसंगाला पूरक म्हणून यावं लागतं. लेखक शब्दांचं बांधकाम तर करतोच, पण लेखकाच्या डोळ्यासमोर शब्दांच्या आधी पात्रं आणि प्रसंग यावे लागतात. कथा महत्त्वाची असतेच, पण पटकथा तिच्याहूनही वरचढ ठरू शकते. अर्थात हे सगळं चांगल्या सिनेमांना लागू होतं. एरवी कशाचा कशाशी काहीही संबंध नसलेले चित्रपट तयार होतच असतात! सिनेमाशी माझं नातं तयार होण्याच्या आणि टिकण्याच्या मुळाशी चांगले चित्रपट आहेत, पण 'गोष्ट अनुभवण्या'ची ऊर्मी हे अर्थातच खरं कारण आहे. 'ड्रामा' हा मनुष्याच्या स्थायीभावाला आकर्षित करणारा प्रकार आहे खरा!  

शाळा आणि कॉलेजच्या दिवसात आशय आणि मांडणीचा फारसा विचार न करता इमोशन आणि अ‍ॅक्शनच्या प्रेमात पडून पाहिलेल्या चित्रपटांपासून चिंतनशील चित्रपटदेखील असू शकतो याची खात्री पटवणाऱ्या चित्रपटांपर्यंतचा प्रवास रंजक आहे. आणि यात भलतंच 'मिक्सिंग' आहे. अनेकजणांनी मिळून हे मिक्सिंग केलं आहे. म्हणजे 'अग्निपथ'च्या विजय दीनानाथ चौहान पासून 'कथा'मधल्या राजाराम पांडुरंग जोशीपर्यंत, विष्णुपंत पागनीसांच्या 'तुकारामा'पासून 'कमीन्या' चार्लीपर्यंत, 'अर्धसत्य'च्या अनंत वेलणकरपासून 'सत्या'च्या भिकू म्हात्रेपर्यंत, 'डेड पोएट्स सोसायटी'च्या जॉन कीटिंगपासून 'देअर विल बी ब्लड'च्या डॅनियल प्लेनव्ह्यूपर्यंत, 'स्कारफेस'च्या टोनी मोंटानापासून 'माय फ़ेअर लेडी'च्या हेन्री हिगिन्सपर्यंत, 'उंबरठा'च्या सुलभा महाजनपासून 'मिस लव्हली'च्या पिंकीपर्यंत, गुरुदत्तच्या 'प्यासा'पासून इम्तियाज अलीच्या 'रॉकस्टार'पर्यंत आणि सानेगुरुजींच्या श्यामपासून 'फँड्री'च्या जब्यापर्यंत! प्रत्येकाची एक गोष्ट आहे, प्रत्येकाचं सुख-दुःख आहे आणि समाजवास्तवाच्या भयचकित करणाऱ्या प्रवाहाच्या पार्श्वभूमीवर आपलं, म्हणजे प्रेक्षकांचं त्यांचं त्यांनाच दृश्यमान होणारं जगणं आहे. 

सिनेमाविषयी पुष्कळ बोललं जातं, बोलता येईल. पण मला विचार करताना नेहमी वाटतं की एक धागा या कलेशी कायम जोडलेला आहे आणि तो म्हणजे 'क्रिएटिव्ह टॅलंट'चा धागा. चांगला सिनेमा कुठल्याही विषयावरचा असला, त्या पात्रांची पार्श्वभूमी कोणतीही असली तरी तो 'चांगला' होतो या कलात्मक बुद्धिमत्तेमुळे. चित्रपट पाहणारा तो चित्रपट स्वतःबरोबर घरी नेतो तो याच कलात्मक बुद्धिमत्तेमुळे. आणि ही चित्रपटात जागोजागी दिसते. ती 'देव डी'च्या स्टायलाइज्ड निर्मितीत दिसते, 'ओंकारा' किंवा 'अब तक छप्पन' च्या भेदक संवादात दिसते, मराठीत अभावानेच दिसणाऱ्या 'फँड्री'च्या अचूक कास्टिंगमध्ये दिसते, 'एलएसडी', 'अग्ली'च्या खिळवून ठेवणाऱ्या बांधणीत दिसते, 'आंखो देखी' किंवा 'शिप ऑफ थिसियस'च्या समृद्ध जाणिवांमध्ये, सखोल चिंतनामध्ये दिसते - अगदी 'कजरारे'सारख्या गाण्याच्या योग्य प्लेसमेंटमध्येसुद्धा दिसते. मला प्रामाणिकपणे असंही वाटतं की कलात्मक बुद्धिमत्ता हा दुष्प्राप्यच प्रकार आहे. ती सहजी प्रसन्न होणारी गोष्ट नाही. त्यामुळे कुठल्याही कलेसारखीच इथेही गरजेची असते ती प्रतिभा आणि जोडीला अफाट  प्रयत्नांची साधना!

हिंदी, मराठी आणि इंग्लिशमधल्या अनेक प्रतिभावंत लेखक-दिग्दर्शकांनी हा आनंद दिला आहे. हिंदी आणि मराठीबाबत बोलायचं झालं तर आज चांगले चित्रपट चालण्याची जरी नाही तरी निर्माण होण्याची शक्यता खूप वाढली आहे हे आशादायक आहे. मुख्य म्हणजे लेखन, अभिनय आणि सादरीकरण या महत्त्वाच्या अंगांना न्याय देणाऱ्या चित्रपटांचं स्वागत होत आहे ही समाधानाची बाब आहे. मात्र सिनेमा हे आधी होतं तितकं सोपं प्रकरण राहिलेलं नाही याची नोंद घेणं गरजेचं झालं आहे. आजचा सिनेमा हा निःशंक मनाने आस्वाद घ्यावा असा कलाप्रकार म्हणून मर्यादित राहिलेला नाही. सिनेमाचं कलात्मक निर्मिती म्हणून असलेलं एक रूप, त्याचं व्यवसाय म्हणून असलेलं आणखी एक वेगळं रूप, सिनेमाच्या अर्थकारणामागची काळी बाजू, सलमान खानसारख्या प्रकरणांमुळे संवेदनेवर बसणारे घाव, सिनेमाला आणि अभिनेत्यांना मिळत असलेलं अवास्तव महत्त्व, सिनेमा ही कला आहे - प्रत्यक्ष जगणं वेगळं आहे आणि आपल्याकडून कृतीची अपेक्षा करणारं आहे याचा पडणारा विसर अशा अनेक गोष्टी सिनेमाकडे फक्त कला म्हणून न बघता समाजावर आघात करणारी गोष्ट म्हणून बघायला भाग पाडतायत. अशा वेळी वाटतं ते एकच - कला असो, व्यवसाय असो की आणखी काही असो, समाजाची सर्व अंगे मूल्यभान असलेल्यांच्या हातातच सुरक्षित राहू शकतात. त्यामुळे सिनेमादेखील मूल्यभान असणाऱ्यांच्या हातातच राहावा ही सदिच्छा!       

(दिव्य मराठी, मधुरिमा)

Saturday, March 21, 2015

सिनेमा असा असतो!

दिबाकर बॅनर्जी हे नाव पहिल्यांदा ऐकलं ते 'खोसला का घोसला' या चित्रपटामुळे. दिल्लीतील एका सभ्य गृहस्थाची बिल्डरने केलेली फसवणूक आणि या गृहस्थाच्या मुलाने त्या बिल्डरला शिकवलेला धडा हे मध्यवर्ती सूत्र असलेला हा चित्रपट अनेकांना माहीत असेल. हिंदी चित्रपटात नव्या लाटेतील चित्रपटात अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज, रजत कपूर यांच्यासह दिबाकर बॅनर्जी हे नाव ठळकपणे पुढे आलं ते 'ओये लकी लकी ओये', 'एलएसडी' आणि 'शांघाय' या त्याच्या चित्रपटांमुळे. हे सगळेच माझे आवडते चित्रपट असले तरी दिबाकर बॅनर्जीच्या एका छोट्या फिल्मने मात्र मला क्लीन बोल्ड केलं. ही फिल्म पाहिल्यावर येणारा अनुभव शब्दातीत होता. पंचवीस-तीस मिनिटांची ही फिल्म म्हणजे आशयघन चित्रपटनिर्मितीचा वस्तुपाठ आहे. 

भारतीय चित्रपटाला शंभर वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २०१३ साली बॉम्बे टॉकीज' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात करण जोहर, झोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी आणि अनुराग कश्यप या चार दिग्दर्शकांनी केलेल्या चार शॉर्ट फिल्म्स आहेत. चारही फिल्ममध्ये एक समान सूत्र आहे आणि ते म्हणजे हिंदी सिनेमा. विविध सामाजिक स्तरातील व्यक्तींवर सिनेमाचा प्रभाव किंवा त्यांच्या आयुष्यातील सिनेमाशी जोडलेला एखादा धागा या फिल्म्समधून उलगडतो. 'बॉम्बे टॉकीज' चित्रपट म्हणून मला आवडला असला तरी एक गोष्ट मात्र माझ्या मनात राहिली. चित्रपटांचा समाजावरील प्रभाव वा व्यक्तींचं चित्रपटांशी जोडलेपण याबरोबरच चित्रपटांचा समाजावर नकारात्मक प्रभावदेखील आहे हे विसरता येत नाही. (इथे मला रायगड जिल्ह्यात गेली अनेक वर्षं विविध सामाजिक प्रश्नांवर संघटनात्मक कार्य करणाऱ्या उल्का महाजनांची आठवण होते. एका विषयासंदर्भात लिहिताना त्यांनी हिंदी चित्रपट हा एक फार मोठा प्रॉब्लेम असल्याचं म्हटलं आहे आणि त्यांच्या या म्हणण्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.) त्यामुळे सिनेमाची शंभर वर्षं सेलिब्रेट करताना इतर बाजूही लक्षात घ्याव्या लागतील. 

तर सध्याचा विषय दिबाकर बॅनर्जीची कथा. सत्यजित राय यांच्या एका लघुकथेवर आधारित हे रूपांतर आहे. या कथेत आपल्याला दिसतो तो पुरंदर (नवाजुद्दिन सिद्दिकी). मुंबईत आपल्या बायको-मुलीबरोबर राहणारा एक सामान्य माणूस. हा मूळचा सांगलीचा, थिएटर अभिनेता, पण त्यात यश न आलेला आणि आता संसाराच्या चक्रात अडकलेला. त्याची मुलगी आजारी आहे. तिला रोज एखादी गोष्ट सांगून हसवणं हे त्याचं एक मुख्य काम आहे. तो सकाळी घराबाहेर पडून एके ठिकाणी नोकरीसंदर्भात जातो, पण ती जागा आता रिकामी नाही. तो तिथून बाहेर पडतो आणि रस्त्यावर एक शूटिंग चाललंय तिथे घुटमळतो. 'चालताना हीरोचा धक्का लागतो तो माणूस' या दोन मिनिटांच्या शॉटसाठी त्याला विचारण्यात येतं आणि तो तयार होतो. धक्का लागल्यावर म्हणायच्या 'ऎ' या 'संवादा'ची रिहर्सल करण्यासाठी तो तिथल्याच मागच्या एका निवांत ठिकाणी जातो आणि तिथे या फिल्मचा हायलाईट प्रसंग घडतो. त्याच्या दिवास्वप्नात तो सांगलीतील त्याच्या थिएटर गुरूंशी (सदाशिव अमरापूरकर) बोलतो. या संवादातून पुरंदरमधला रिस्क न घेणारा, तळ्यात-मळ्यात करणारा, अभिनेता असलेला पण अभिनयकलेशी 'कमिटेड' नसलेला एक कलाकार आपल्याला दिसतो. 'ऎ' हा एकच शब्द असला तरी जेव्हा तो अभिनित करून म्हणायचा असतो तेव्हा त्यात मेहनत असते हे त्याचे गुरू त्याला सांगतात, त्याला प्रात्यक्षिक दाखवतात आणि नाहीसे होतात.  

पुरंदर शॉट देऊन घरी परततो आणि आपल्या मुलीला त्याचा शूटिंगचा अनुभव अभिनित करून दाखवतो. आणि इथे फिल्म संपते. 

कोणतीही कला आणि तिचा आविष्कार ही जाता जाता करायची गोष्ट नव्हे, ते 'मेहनती'चं काम आहे आणि चित्रपटातील चकाचौंध, ग्लॅमर याच्या पलीकडे चित्रपट निर्मिती, अभिनय ही मूलतः कलासाधना आहे, गांभीर्याने करायची गोष्ट आहे हे या छोट्याशा गोष्टीतून इतक्या प्रत्ययकारी पद्धतीनं समोर आलं आहे की आपण ते बघताना स्तिमित होतो. एकीकडे अभिनयातील मेहनतीबाबत आग्रही असणारे गुरू आणि त्यांचा हा अस्थिर वृत्तीचा, तुकड्या तुकड्यात आयुष्य जगणारा शिष्य यांच्यातील जुगलबंदी तर खिळवून ठेवणारी आहेच, पण संपूर्ण फिल्मची बांधणी करताना दिबाकर बॅनर्जीने जे बारकावे टिपले आहेत त्याला तोड नाही. दोन दोन मिनिटांच्या भूमिकेतील पात्रांच्या निवडीतील आणि त्यांच्याकडून अभिनय करून घेण्यातील 'मेहनत' या फिल्ममध्ये दिसते.

काही चित्रपट किंवा कधीकधी एखाद्या चित्रपटांतील एखादा प्रसंग, एखाद्या पात्राचा अभिनय कलात्मक आविष्काराची उंची गाठणारा नमुना म्हणून लक्षात राहतो. दिबाकर बॅनर्जीची ही फिल्म याच प्रकारात मोडते. फिल्ममध्ये सदाशिव अमरापूरकर 'कुणी घर देता का घर?' म्हणताना जो स्वर लावतात त्याने अंगावर काटा येतो आणि 'नाटक असं असतं' म्हणणारा नटसम्राट आठवतो. सगळी व्यवासायिक गणितं, पब्लिक डिमांड आणि सुमारसद्दीच्या पलीकडे जाऊन 'सिनेमा असा असतो' म्हणायला लावणारी ही फिल्म आवर्जून बघावी अशी आहे!

(दिव्य मराठी, मधुरिमा)

Friday, February 13, 2015

प्रेम : एक करणे

 'प्रेम म्हणजे नक्की काय असतं?' याचा उलगडा नीटसा न होताही प्रेम या संकल्पनेने आजवर जगात कथा, कविता, कादंबरी, नाटक, चित्रपट, चित्र, शिल्प, नृत्य आणि इतर स्वरूपात जे जे निर्मिलं आहे ते अजोड आहे. पुलंना उद्धृत करायचा मोह अनावर होतोय. 'माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझं माझ्यावर प्रेम आहे. आपलं दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. मग तो थेरडा असं काय करतोय? - या कालवाकालवीतून प्रेमकाव्य वाहिले.'  (पूर्ण मजकुरासाठी 'हसवणूक' पहावे. 'आमचा धंदा: एक विलापिका', पृ. ७) तर प्रेम ही एक कालवाकालव आहे असं ढोबळमानाने म्हटलं आणि हिंदी चित्रपटात तरी प्रेमकथेला कारण बनायचं मुख्य श्रेय मुलांच्या प्रेमाला नकार देणाऱ्या अनेक थेरड्यांना जातं हे खरं असलं तरी प्रेमकथा आकर्षून घेते खरी. आणि ती अगदी जमिनीवरची प्रेमकथा असेल (म्हणजे संजय भंसाळीची प्रेमकथा नसेल) तर त्याची बातच और आहे. चित्रपटात ज्यांच्या घराच्या नुसत्या दर्शनाने डोळे दिपतात अशांच्या प्रेमकथेबद्दल वैर असण्याचं काहीच कारण नाही, पण यश चोप्राच्या शिफॉन नेसलेल्या आणि स्वित्झर्लंडमध्ये बहरणाऱ्या छान प्रेमकथेपेक्षाही मुंबईतल्या लोकलमधून प्रवास करणारी, घराचे इएमआय जोडीने भरणारी प्रेमकथा अधिक जवळची वाटते. अलीकडेच 'छोटी सी बात' बघताना लक्षात आलं की आपण कितीही प्रयत्न केला तरी यशराजच्या हृतिक रोशन-ऐश्वर्या राय किंवा शाहरूख खान-माधुरी दीक्षित तर सोडाच, पण ऋषी कपू-श्रीदेवीशीदेखील आपण पटकन जोडून घेऊ शकत नाही. आपलं कनेक्शन जुळतं ते विद्या सिन्हा आणि अमोल पालेकरशी,  'कथा'मधल्या दीप्ती नवल-नसीरुद्दीन शहाशी, 'चष्मेबद्दूर' आणि 'साथ साथ'मधल्या फारूक शेख आणि दीप्ती नवलशी! अर्थात गंमत अशी आहे की यशराज किंवा धर्मा प्रॉडक्शनच्या चकचकीत चित्रपटांतील शाहरूख खानचा राहुल जरी फारसा जवळचा वाटला नसला तरी 'कभी हां कभी ना'मध्ये त्याच शाहरूख खानने रंगवलेल्या 'सुनील'शी मी कनेक्ट होऊ शकलो होतो. 

विचार करताना असं जाणवतं की एकूणातच प्रेम आणि प्रेमाचे आयाम कलाकृतीतून लोकांपर्यंत पोचवणं काहीसं अवघडच. चित्रपटही त्याला अपवाद नाही. आता जवळजवळ प्रत्येक हिंदी चित्रपटातून एक प्रेमकथा सांगितली जाते ते सोडा, पण प्रेम या संकल्पनेची वीण उलगडून दाखवणारे, त्यातून अनुभूतीचं वैविध्य देणारे चित्रपट विरळा. बरेचदा असंही होतं की प्रेमकथा हा मूळ विषय नसलेल्या चित्रपटातील प्रेमकथा स्पर्शून जाते, पण याच विषयावर बनलेला पूर्ण लांबीचा चित्रपट पकड घेऊ शकत नाही! 

मला प्रेमकथेबाबत श्याम बेनेगलचा 'सूरज का साँतवा घोडा' प्रकर्षाने आठवतो. धर्मवीर भारती यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट १९९२ साली प्रदर्शित झाला. माणिक मुल्ला (रजत कपूर) आणि त्याच्या आयुष्यातील तीन मुली यांची ही कथा आहे. या तिघींपैकी एक गरीब पण म्हणूनच करारी आहे, एक बुद्धीनिष्ठ, वाचनप्रेमी आहे आणि एक मध्यमवर्गीय, मध्यममार्गी आहे. या तिघींशी नायकाचे वेगवेगळ्या पातळ्यांवर आलेले संबंध आणि त्यातून घडलेली त्याची प्रेमाविषयीची भूमिका हे सगळं तो आपल्या मित्रांना सांगतोय. प्रेमालाही 'वर्गचरित्र' असतं हा यातला प्रमुख मुद्दा. आणि तीन प्रातिनिधिक कथांमधून तो फार प्रभावीपणे मांडला गेलाय. प्रेमाच्या 'देवदासीकरणाला' प्रश्न करणारा हा चित्रपट आवर्जून पाहावा असा आहे. 

दोघांमध्ये प्रेम निर्माण होणं आणि ते प्रेम प्रेक्षकांपर्यंत पोचवणं हे साध्य करणं जमू शकतं आणि मुळात प्रेम ही सर्वांच्या मनात असणारी, तरल भावना असल्याने ते बघणं आवडतंही, पण व्यावसायिक हिंदी चित्रपट प्रेमाकडे ज्या 'पॉप्युलर' दृष्टीने बघतो ती लक्षात घेता प्रेमाच्या बाबतीत काहीतरी मूलभूत बोलणारे, 'आणि ते सुखाने नांदू लागले'पेक्षाही प्रेमात असणाऱ्यांचं स्वतंत्र व्यक्तित्व आणि त्यांचं प्रेम यांचा मेळ कसा बसला, बसला का? ते इतर कुणाकडे ओढले गेले तेव्हा काय झालं? अशा खऱ्याखुऱ्या आव्हानात्मक प्रश्नांना सामोरे जाणारे चित्रपट बघणं काहीतरी ‘अधिक’ देतं. इथे फरक पडतो तो प्रेमाचं व्यक्तिकेंद्रित, व्यक्तीच्या बुद्धी-भावनांशी आणि व्यक्तीच्या एका परिघातील संघर्षाशी निगडीत असं चित्रण आणि भोवतालचं सामाजिक-राजकीय वास्तव जेव्हा सगळ्यांनाच ढवळून काढत असतं अशा परिस्थितीत, एका मोठ्या कॅनव्हासवर आपली जागा शोधणाऱ्या प्रेमाचं चित्रण, या दोन प्रकारांमध्ये. या दोन्हीचा समावेश असलेल्या जुन्या-नव्या चित्रपटांबाबत बोलायचं झालं तर मला वर उल्लेख केलेल्या चित्रपटांबरोबर गोविंद निहलानीचा 'दृष्टी', बासु चॅटर्जींचा 'रजनीगंधा', गुलजारचे 'मौसम', 'इजाजत', रितुपर्णो घोषचा 'रेनकोट', इम्तियाज अलीचा 'सोचा न था', 'जब वी मेट',  'हायवे',  शाद अलीचा 'साथिया',  अभिषेक चौबेचा 'इश्किया', 'डेढ इश्किया' हे चित्रपट आठवतात. 

प्रेमकथा 'कालवाकालवीतून' वाहते हे खरं असलं तरी प्रेमाची मोहिनी जबरदस्त आहे हेही खरं. पडद्यावर पहिल्यांदा आलं तेव्हापासून आजवर 'त्या दोघांचं' प्रेम चालू आहे आणि राहीलच. आणि आजूबाजूचं पर्यावरण बदलत असताना ही दोघे एकमेकांत गुंतली आहेत आणि त्यांना काही काळापुरतं तरी इतर कुणीही नको आहे ही कल्पनाच एक स्वयंभू रोमँटिक अशी आहे!

(दिव्य मराठी, मधुरिमा)

Friday, January 16, 2015

द ट्रूमन शो : शो आणि रिअ‍ॅलिटी

मोबाईल आणि इंटरनेट हातात खेळायला लागायच्या आधीपासून ज्या एका गोष्टीनं लोकांवर गारूड केलं होतं आणि जे गारुड अजूनही कायम आहे, एवढंच नाही तर अनाकलनीयरित्या वाढत चाललं आहे ते म्हणजे टीव्ही. मला स्वतःला खरं तर टेलिव्हिजनबद्दल फारशी आस्था नाही, किंबहुना टेलीव्हिजन चार तासांवरुन चोवीस तासांवर जाणं याचे एकूणात वाईटच परिणाम झाले आहेत असं मला वाटतं. त्यामुळे तो लवकरात लवकर पुन्हा चार तासांवर जावा अशी माझी एक भाबडी, कदाचित हास्यास्पद, कदाचित अव्यवहार्य अशी आशा आहे. पण या माध्यमाची लोकांना प्रभावित करण्याची ताकद फार मोठी आहे हे मात्र मान्य करावंच लागेल. मग ते कुणाला आवडो किंवा न आवडो. 

'द ट्रूमन शो' हा १९९८ साली प्रदर्शित झालेला चित्रपट. त्यावेळी आपल्याकडचा सॅटेलाईट टीव्ही बाल्यावस्थेत, कदाचित किशोरावस्थेत, होता. अमेरिका आणि इतर पाश्चात्त्य देशांमध्ये मात्र खासगी वाहिन्यांनी जनमानसाचा कधीच कब्जा घेतला होता. डेली सोप वगैरे प्रकार सुरु झाले होते आणि टेलिव्हिजनचा तिथला दर्शकही त्यामुळे भारतीय दर्शकांपेक्षा वेगळ्या मनोवस्थेचा होता. 'द ट्रूमन शो' या चित्रपटाला एकाहून जास्त पदर आहेत. म्हटलं तर हा चित्रपट म्हणजे टेलिव्हिजनवरचं एक प्रत्ययकारी भाष्य आहे, म्हटलं तर हा एक तात्त्विक ऊहापोह आहे किंवा एक गंभीर अस्तित्ववादी चर्चा आहे! 

चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे ट्रूमन बरबँक (जिम कॅरी). 'सीहेवन' नावाच्या एका गावात तो राहतोय आणि तिथेच नोकरी करतोय. त्याची बायको मेरिल एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते आहे. त्याचं सुखी, आखीव-रेखीव आयुष्य नीट सुरु आहे. पण आपलं आयुष्य फार म्हणजे फार म्हणजे फारच आखीव-रेखीव आहे याची जाणीव ट्रूमनला काही घटना आणि प्रसंगांमधून व्हायला लागते आणि अखेरीस त्याला त्याच्या आयुष्याचं सत्य उमगतं. आपलं रोजचं आयुष्य हा टीव्हीवर रोज चोवीस तास चालणारा एक 'शो' आहे हे ते सत्य! हा टीव्ही शो आहे हे आपण सोडून सगळ्यांना माहीत आहे, आपली बायकोदेखील या शोमधली एक कलाकार आहे, हे पूर्ण गाव या शोकरता मुद्दाम वसवलं गेलं आहे आणि आपण ज्यांना रोज भेटतोय ते सगळे लोक आपल्या बायकोसारखेच या शोमधले कलाकार आहेत हे त्याला कळतं. आणि मग या आभासी जगातून मुक्त व्हायची त्याची धडपड सुरु होते. तो मुक्त होतोदेखील, पण बऱ्याच प्रयत्नांनंतर. या शोचा निर्माता, दिग्दर्शक क्रिस्टोफ (एड हॅरिस) ट्रूमनशी प्रत्यक्ष संवाद साधतो आणि 'खऱ्या जगात तुझ्या या कृत्रिम पण स्वतःच्या जगाहून वेगळं असं काहीच सत्य नाही' असं सांगून त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो. पण ट्रूमन आपल्या स्वतःच्या, रोजच्या, पण खोट्या जगातून बाहेर पडायचा निर्णय घेतो. 

हजारो छुप्या कॅमेऱ्यांमार्फत ट्रूमनचं रोजचं जगणं लोकांसमोर कसं आणलं जातं, त्याला टप्प्याटप्प्याने आपल्या आयुष्याचं सत्य कसं उलगडत जातं, क्रिस्टोफ़ काय काय युक्त्या योजतो हे सगळं प्रत्यक्ष बघणं रोचक आहे, थरारक आहे आणि मुख्य म्हणजे आपल्याला खरं आयुष्य-खोटं आयुष्य आणि त्यातील सीमारेषा यावर विचार करायला लावणारं आहे. हा चित्रपट खूप गाजला आणि त्यावर पुष्कळ चर्चा झाली. धार्मिक अंगाने, तात्विक अंगाने आणि मानसशास्त्रीय अंगाने मतं मांडली गेली. मला स्वतःला हा चित्रपट बघताना जी.ए.कुलकर्णी यांच्या 'स्वामी' या कथेची आठवण येत होती. एका छोट्या जागेत मठाचा 'स्वामी' बनवून अडकवला जाणारा इसम आणि हे अडकणं स्वतंत्र असण्यापेक्षा खरं तर चांगलंच आहे हे तात्विक अंगाने त्याला पटवायचा प्रयत्न करणारा त्याला अडकवणारा इसम या दोघातला संवाद ज्यांनी वाचला आहे त्यांना माझं म्हणणं लक्षात येईल.       

आपण ज्या जगात राहतो आहोत ते जग खरं तर मुक्त आहे, कारण इथला प्रत्येकजण त्याच्या प्रेरणेने जगतो आहे. पण ट्रुमनच्या भोवतीची माणसं जरी भाडोत्री कलाकार असली तरी अखेरीस आपल्या भोवतीच्या माणसांना तरी एका मर्यादेपलीकडे स्वातंत्र्य कुठे आहे? आपल्यालादेखील ते कुठे आहे? मग आपण जगतो आहोत ते 'खरं' जग आहे असं तरी का म्हणायचं? कदाचित 'खरं', 'मुक्त' जग वेगळंच असेल. या जगात आपण सगळेच खरं तर बाहुल्यांसारखे आहोत. मात्र तरीदेखील आपलं ट्रुमनसारखं झालं तर आपणही या जगातून बाहेर पडायचा प्रयत्न करु. जरी तिथे लौकिकार्थाने सुखी असलो तरी. आणि याचं कारण हे की मर्यादांनी निश्चित केलेलं का असेना, पण ते 'आपलं' स्वातंत्र्य आहे. आपल्यापुरतं आहे, कदाचित पूर्ण नाही, पण तरी 'आपलं' आहे.    

'द ट्रूमन शो'ची कल्पना भन्नाट आहे. आणि त्याहून भन्नाट आहे ते म्हणजे ट्रूमनला जेव्हा 'हे सगळं खोटं आहे' ही जाणीव होते ते क्षण बघणं आणि अनुभवणं.  पडद्यावर ते बघत असताना आपण अस्वस्थ होतो.  कारण त्या क्षणी ट्रुमनशी आपल्याला एक जोडलेपण जाणवत असतं. आपल्या भोवतालातला 'खोटेपणा' जाणवण्याचे क्षण आपल्याला आठवतात आणि मनातल्या मनात आपलाही 'ट्रूमन शो' सुरु होतो!

(दिव्य मराठी, मधुरिमा)