अलीकडे एकदा रेल्वे प्रवासात
शेजारच्या सीटवर बसलेल्या मुलीच्या हातातील मोबाइल स्क्रीनवर लक्ष गेलं तेव्हा ती 'फ्रेंड्स' बघते आहे असं लक्षात आलं. (ती
हेडफोन लावून बघत होती हे एक उल्लेखनीय. कारण सार्वजनिक ठिकाणचा किंवा खरं तर
कुठल्याही ठिकाणचा मोबाइल वापर यावर वेगळ्या शाळा सुरु करण्याची गरज निर्माण झाली
आहे. असो.) मुलगी विशीतली होती. दोन हजार नंतर जन्मलेलं कुणीतरी 'फ्रेंड्स' बघतं आहे हे मला लक्षणीय वाटलं. तिच्याशी
काही बोलणं झालं नाही; पण तिच्या वयाच्या मुला-मुलींना 'फ्रेंड्स' कशी वाटते हे समजून घेणं रोचक ठरेल! 'फ्रेंड्स'चा माझा आजवरचा अनुभव लक्षात घेतला तर 'फ्रेंड्स' प्रचंड आवडलेली माझी अनेक मित्रमंडळी
आहेतच. याशिवाय 'अरे मी आत्ता पाहिली फ्रेंड्स आणि मला जाम
आवडली!' असं म्हणणारी काही वयाने ज्येष्ठ मंडळीही आठवतात आणि
लोकप्रिय कलाकृतींवर सहसा नाखूष असणाऱ्या (दॅट इज टू मेनस्ट्रीम!) काही मंडळींनी 'हं...फ्रेंड्स!!' असं म्हणून फ्रेंड्सला निकालात काढलेलंही आठवतं.
न्यू यॉर्कच्या मॅनहटन परिसरात राहणारे सहा मित्र-मैत्रिणी, त्यांचं एक नेहमीचं कॉफी हाऊस, तिथल्या त्यांच्या अचाट-अद्भुत गप्पा, त्यांची आपसातली आणि इतरांबरोबरची प्रेमं आणि प्रेमभंग, कौटुंबिक आणि इतर नात्यांमधलली मौज, प्रत्येकाचं करिअर आणि त्या आघाडीवरचे गोंधळ आणि गमती, या सहाजणांचा वेडेपणा आणि शहाणपणा आणि या दोन टोकांच्या मधल्याही जागा अशा एका रसरशीत वाहत्या रसायनाने दहा वर्ष या मालिकेने प्रेक्षकांना गुंगवून ठेवलं. २२ सप्टेंबर १९९४ रोजी फ्रेंड्सचा पहिला आणि ६ मे २००४ रोजी शेवटचा एपिसोड प्रदर्शित झाला. पहिला एपिसोड अंदाजे दोन कोटी प्रेक्षकांनी पाहिला होता तर शेवटचा एपिसोड अंदाजे साडेपाच कोटी लोकांनी पाहिला. (सगळी कुंडली इंटरनेटवर सहज मिळेलच). फ्रेंड्सच्या अगोदर, त्याच धर्तीची 'साइनफेल्ड' ही मालिका १९८९ साली सुरु झाली होती. ती १९९८ साली संपली. १९९४ ते १९९८ अशी चार वर्षं दोन्ही मालिका एकाच वेळी सुरु होत्या. पण फ्रेंड्सने जनमानसावर जे गारुड केलं ते अजोड ठरलं. मोनिका-चँडलर-रॉस-रॅचेल-फीबी-जोई हे सहाजण जगभरातील प्रेक्षकांच्या भावविश्वात जे उतरले ते उतरलेच! अगदी आता आतापर्यंत नेटफ्लिक्सच्या भारतातील 'टॉप टेन' मध्ये फ्रेंड्सचा समावेश होता. ('साइनफेल्ड'बद्दल खरं तर वेगळं लिहिता येईल कारण दोन्ही मालिका एकाच धर्तीच्या असल्या, 'सिटकॉम' (सिच्युएशनल कॉमेडी) असल्या तरी 'साइनफेल्ड'मधला संथपणे तीक्ष्ण असणारा बौद्धिक विनोद आणि मालिकेचं स्ट्रक्चर वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळं होतं).
'फ्रेंड्स' मी दोन हजारच्या दशकात केव्हातरी पाहिली. मी पाहिलेली ही पहिलीच पाश्चात्त्य मालिका. त्यानंतर आज वेब सीरिज काळापर्यंत अनेक उत्तमोत्तम मालिका पाहिल्या गेल्या. 'मॉडर्न फॅमिली' हा देखणा फॅमिली ड्रामा, 'बिग बँग थिअरी' ही फ्रेंड्सची वारस म्हणता येईल अशी विलक्षण ताकदीची कॉमेडी, 'हाउस ऑफ कार्ड्स' हा जडजहाल राजकीय ड्रामा, 'गेम ऑफ थ्रोन्स'सारखा प्रत्येक एपिसोडगणिक तोंडात बोटं घालायला लावणारा प्रकार, 'ब्रेकिंग बॅड' आणि 'बेटर कॉल सॉल'सारख्या मालिकांचा कथनात्मक आणि दृश्यात्मक पातळीवरचा अविस्मरणीय प्रभाव, 'द ऑफिस'सारखी लाजवाब क्रिन्ज कॉमेडी, 'ब्लॅक मिरर'चा सुन्न करणारा 'डिस्टोपिया' आणि इतरही अनेक. हे कलाविष्कार अनुभवताना निर्मात्यांच्या कल्पनाशक्ती-लेखन-दिग्दर्शन-अभिनय-सादरीकरण या सर्वच आघाड्यांवरील मजबूत पकडीचा हेवा वाटला. लेखनाचा तर फारच वाटला. पण या सफरीची सुरुवात केली ती 'फ्रेंड्स'ने. म्हणूनही माझ्यासाठी 'फ्रेंड्स'चं एक विशेष स्थान आहे.
'फ्रेंड्स'ने जो मनाचा ताबा घेतला होता त्यातही लेखन हा कळीचा मुद्दा होताच. मुळात फ्रेंड्स ही इतर सिटकॉम्ससारखीच बहुतांशी इनडोअर शूटिंग झालेली मालिका. अशा मालिकेत तांत्रिक करामतींना एका मर्यादेपर्यंतच वाव असतो. मुख्य मदार लेखन, अभिनय यावरच. (अर्थात लेखन ही गोष्ट अगदी तांत्रिकदृष्ट्या बलाढ्य अशा ‘गेम ऑफ थ्रोन्स’सारख्या मालिकेतही प्रथम स्थानी असते हेही नोंदवण्यासारखं आहे.). 'इन द बिगिनिंग देअर वॉज द वर्ड' असं बायबलमधलं एक विधान आहे. (अँड द वर्ड वॉज विथ गॉड अँड द वर्ड वॉज गॉड हा त्या विधानाचा पुढचा भाग). एखादी चांगली कलाकृती पाहून झाली की मला हे विधान हटकून आठवतं. मार्टा काउफमन आणि डेव्हिड क्रेन हे दोघे फ्रेंड्सचे जनक, कर्तेधर्ते. पण त्यांच्या लेखकीय टीममध्ये इतर पुष्कळजण होते. फ्रेंड्सची कथा पुढे नेताना घडणाऱ्या अनेक प्रासंगिक विनोदांपैकी कुठला प्रसंग कुणी लिहिला हे सांगणं अवघड आहे; पण फ्रेंड्स बघताना या लेखकांना उठून दाद देण्याचे प्रसंग वारंवार येतात. (तरी 'रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका'च्या '१०१ बेस्ट रिटन टीव्ही सीरिज'च्या यादीत फ्रेंड्स चोविसाव्या स्थानावर आहे हे जाता जाता नोंदवतो).
भारतीय-मराठी-मध्यमवर्गीय मुशीत वाढलेल्या माझ्यासारख्याला फ्रेंड्सची जी मोहिनी पडली त्यात पटकथा आणि सादरीकरणाच्या पलीकडे जाणारं बरंच काही होतं. संस्कृती, परंपरा आणि मंडळींच्या कडेकोट बंदोबस्तात असलेल्या पौगंडावस्थेपासून पुढे येताना काहीजणांना त्याबद्दल प्रश्न पडतात तर काहीजणांना बहुधा 'तो बंदोबस्तच योग्य आहे' असं वाटू लागतं. (सांस्कृतिक स्टॉकहोम सिंड्रोम!) अशा बंदोबस्तात वाढलेले आम्ही कॉलेजच्या पहिल्या-दुसऱ्या वर्षापर्यंतदेखील 'मैत्रीण' शब्दाच्या नुसत्या उल्लेखानेही जिथे महिरत होतो तिथे फ्रेंड्समधल्या मित्र-मैत्रिणींची भाषा, त्यांचे एकमेकांना होणारे सहज स्पर्श, प्रेमापासून शरीरसंबंधांपर्यंत होणाऱ्या सहज चर्चा, सर्वच मानवी उर्मींना समजून घेत त्यांच्याशी 'डील' करायची वृत्ती हे सगळं बौद्धिक पातळीवर फारच आनंददायक वाटत होतं. तोवर असं 'रॅशनल' दर्शन आपल्याकडच्या चित्रपट-मालिकांमधून कधी घडलं नव्हतं. कुटुंबव्यवस्थेचं, संस्कारांचं उदात्तीकरण बघत होतो; पण पौगंडावस्थेत शरीर आणि मन एकेकट्याने किंवा एकत्रितपणे काही अवघड प्रश्न विचारतात त्यांची उत्तरं मिळत नव्हती. रोमँटिक प्रेमाला 'लफडं' हा शब्द माहीत होत होता आणि शारीरिक आकर्षणाला तर नीट शब्दच नव्हता. एकूणच पौगंडावस्थेत आणि त्यानंतरही जे काही होतं ते सांगण्यासाठीची भाषाच मुळात उपलब्ध नव्हती. फ्रेंड्स बघताना ती भाषा सापडली हे माझ्या दृष्टीने फ्रेंड्सचं मोठं देणं आहे.
'फ्रेंड्स'चे जनक - केव्हिन ब्राइट, मार्टा काउफमान आणि डेव्हिड क्रेन |
तुम्ही कुणालातरी भेटता, मग डेटिंग सुरू होतं, मग तुम्हाला पुढे जावंसं वाटलं तर तुम्ही
एकत्र राहू लागता, त्यानंतर वाटलं तर लग्न करता असा एक 'तार्किक प्रवास' फ्रेंड्समुळे बघायला मिळाला. आणि
यातल्या कुठल्याही पायरीवरून मागे फिरता येतं आणि दुसऱ्याबरोबर हाच प्रवास करता
येतो हे तर आणखी थोर. एकदम लग्नच करून न टाकण्याचा पर्याय उपलब्ध असू शकतो हे
मोठंच ज्ञान मिळालं. शिवाय या सगळ्या प्रवासात काही ठेचा खाव्या लागल्या तरी 'बाटलीशरण देवदास' होण्याची गरज नाही; तुम्ही माफक प्रमाणात दुःखी होऊन पुन्हा आपल्या कामावर लक्ष द्यावं,
आपलं आयुष्य नीट जगावं हेही इथे शिकायला मिळालं! आपल्याकडे त्यावेळी
'तू नहीं तो कोई नहीं', 'लुट गये तेरी
मोहोब्बत में', 'जिंदगी में हम प्यार सिर्फ एक बार करते है'
असा 'सिंग्युलर’ पातळीवरचा प्रेमविव्हल धडाका
सुरु होता.
प्रेमाबरोबरच दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे शारीरिक आकर्षण. प्रेमाबद्दलच जिथे संकल्पना आणि व्यवहार दोन्ही पातळ्यांवर आनंदीआनंद होता तिथे लैंगिक गरजेबाबतची चर्चा म्हणजे दूरची गोष्ट. हा विषय कडेकोट बंदोबस्ताच्याही कडेकोट बंदोबस्तात होता. आणि इथे हे सहाजण तर कॉफी पिता पिता आपल्या लैंगिक अनुभवांबाबत बोलत होते. त्याबाबतची वैचारिक देवाणघेवाणही करत होते. आपण मित्रांशी जसं इतर अनंत विषयांवर बोलतो तसंच हाही एक विषय आहे, त्याचं ओझं होऊ देण्याची गरज नाही, कॉफी संपली की हा विषयही संपवून आपल्या कामाला जावं यातली सहजता फारच सुंदर होती.
अर्थात फ्रेंड्सच्या केंद्रस्थानी आहे ती मैत्री. ती या मालिकेची मुख्य 'थीम'. सहापैकी चौघे (मोनिका-चँडलर आणि रॉस-रॅचेल) एकत्र येतात. त्याआधी त्यांची अन्य रोमँटिक नाती आहेतच. पण लग्नापर्यंत गेलेलं रोमँटिक नातं हे त्यांच्या मुळातल्या मैत्रीची परिणती म्हणून येतं. तारुण्यातील परस्परसंबंध, त्यांचं 'व्यवस्थापन' यात रोमँटिक नात्याच्या बरोबरीचा वजनदार घटक म्हणजे मैत्री आणि त्यातले ताणतणाव, गैरसमज इ. फ्रेंड्समध्ये मैत्रीतले हे ताणतणाव ज्या प्रगल्भपणे हाताळले जातात ते पाहणं तरुणांना आणि प्रौढांनाही काही शिकवणारं ठरलं. अर्थात अशी प्रगल्भ हाताळणी होऊन शेवट गोड होणं हे तसं 'मेनस्ट्रीम' आहे हे खरंच. पण फ्रेंड्सची धाटणीच ती आहे. 'ब्लॅक मिरर'सारख्या मालिकेत जसं तुम्ही गोड शेवटाची अपेक्षा करू शकत नाही तसंच 'फ्रेंड्स'सारख्या मालिकेत तुम्ही कठोर शेवटाची अपेक्षा करू शकत नाही. (कठोर म्हणजे वास्तववादी का? असा प्रश्न येऊ शकेल; पण कलेतील वास्तव हे 'वास्तवातलं वास्तव' नसून 'कल्पनेतलं वास्तव' असतं हे लक्षात घेऊ. इथे थोडा संघर्ष आहे हे खरं. पण तो स्वतंत्र विषय आहे).
फ्रेंड्सच्या अफाट लोकप्रियतेमागचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे विनोद. प्रसंगनिष्ठ, व्यक्तीनिष्ठ, शब्दनिष्ठ अशा सर्व आघाड्यांवर फ्रेंड्समधला विनोद बाजी मारतो. मला यासंदर्भात सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे एखाद्या गंभीर प्रसंगातही अचानकपणे अवतीर्ण होणारा विनोद! अमेरिकन समाजाचं प्रत्यक्ष 'स्वभावचित्र' असं असेल-नसेल; पण कल्पिताच्या पातळीवर तरी अशी तरतरीत विनोदबुद्धी असणारी माणसं दिसणं हे मोठंच समाधान आहे. एखाद्या गंभीर प्रसंगातही उत्तम विनोद 'प्लेस' करता येणं हे बौद्धिक क्षमतेचं काम आहे. मला तर विनोद हा सृजनशील आविष्कारापेक्षाही 'ॲटिट्यूड'चा (प्रवृत्ती) भाग जास्त वाटतो. शिवाय फ्रेंड्समध्ये लैंगिक संदर्भातील विषयांना, उल्लेखांना वरचेवर विनोदाच्या मुशीतून काढून अतिशय देखण्या पद्धतीने हाताळलं गेलं आहे. 'कामतृप्तीच्या सात झोन्स' याबाबतच्या चर्चेचा मोनिकाचा चँडलर आणि रॅचेलबरोबरचा अतिशय गाजलेला प्रसंग हे चटकन आठवलेलं उदाहरण. अशी बरीच देता येतील. याखेरीज इतर अनंत विनोदी प्रसंग आणि शाब्दिक विनोद आहेतच. यात चँडलर (ही भूमिका करणाऱ्या मॅथ्यू पेरीचं अलीकडेच निधन झाल्याचं काहीजणांना आठवत असेल) विशेष उल्लेखनीय. चँडलरच्या 'वन लायनर्स' हा एक मोठाच विषय आहे!
सहा मुख्य पात्रांच्या अभिनयाबद्दल काय बोलावं? एकालाही दुसऱ्यापेक्षा कमी-जास्त तोलता येणार नाही इतके हे सहाजण एकमेकांना पुरून उरले आहेत. कोर्टनी कॉक्स, लीसा कूड्रो, जेनिफर ॲनिस्टन, मॅथ्यू पेरी, डेव्हिड श्विमर, मॅट ल ब्लांक या सहा अभिनेत्यांना इतर कुठल्याही भूमिकेपेक्षा, त्यांच्या स्वतःहीपेक्षा, फ्रेंड्समधलं एक पात्र म्हणून कायमची ओळख मिळाली यातच सगळं आलं.
सामाजिकदृष्ट्या किंवा कलात्मकदृष्ट्या 'आयडियॉलॉजिकल' अंगाने विचार केला तर कुठल्याही कलाकृतीमध्ये कुणाला काही तर कुणाला काही न्यून सापडतंच. पण शेवटी कुठलीही कलाकृती तिच्या काळाचे ठसे घेऊनच येत असते. दोन हजारोत्तर जगात एकीकडे अस्मितेच्या राजकारणाला उधाण आलेलं असलं तरी अलीकडील अमेरिकन-युरोपियन वेब सीरिज, चित्रपट पाहिले तर कृष्णवर्णीय, हिस्पॅनिक, इस्लामिक, चिनी, कोरियन, भारतीय मुळांची अनेक पात्रं दिसतात. गे, लेस्बियन आणि अन्य सेक्शुअल ओरिएंटेशनच्या पात्रांचीही रेलचेल असते. ओटीटी, टेलिव्हिजन आणि सिनेमाचं जग तरी अधिक समावेशक झालेलं आहे. नव्वदीच्या दशकात आलेल्या फ्रेंड्समध्ये मुख्य पात्रं आणि सहायक पात्रांमध्ये काही तुरळक अपवाद सोडता गोऱ्या अमेरिकन्सचाच बोलबाला होता. एका लेस्बियन जोडप्याचं छोटं उपकथानक आहे. (काही वर्षांनी आलेल्या 'मॉडर्न फॅमिली'मध्ये एक गे जोडपं मध्यवर्ती भूमिकेत आहे आणि संबंधित चर्चाही बरीच आहे). पण हा काही मालिकेचं मूल्यमापन करण्याचा प्रबळ मुद्दा असू शकत नाही. 'फ्रेंड्स'सारख्या राक्षसी लोकप्रियता लाभलेल्या मालिकेबद्दल आजवर पुष्कळच लिहिलं गेलं आहे. मागे केव्हातरी एका वेबसाइटवरील लेखात ‘फ्रेंड्स’मध्ये समावेशकता नाही’ अशा आशयाची टिप्पणी वाचली तेव्हा गंमत वाटली होती. कारण मुद्दे काढायलाच बसलं तर बरेच मुद्दे जन्माला घालता येऊ शकतात. 'फ्रेंड्स'मधली सगळी मुख्य पात्रं ‘स्ट्रेट’ आहेत हाही मग कदाचित टीकेचा मुद्दा होऊ शकेल! (जे दाखवलं जातं असतं ती ‘कथा’ असते; ते ‘सामाजिक कर्तव्य’ म्हणून केलं जावं हा आग्रह अस्थानी आहे).
दहा वर्ष चाललेल्या, २३६ भागांच्या ‘फ्रेंड्स’मध्ये कलात्मक, मूल्यात्मक अंगाने टिप्पणी करावी अशा काही जागा सापडू शकतीलच. पण ‘फ्रेंड्स’ त्याहून खूप जास्त काही आहे हे खरं. वर उल्लेख केला त्याप्रमाणे काही प्रौढ मित्रमंडळी 'फ्रेंड्स' अतिशय आवडल्याचं सांगत तेव्हा मला कळायचं की यांनादेखील हे 'दर्शन' बहुधा नवीन असणार. त्यांना असं 'लिबरेटिंग', मुक्तपणाचा अनुभव देणारं जगणं माहीत नसणार. 'फ्रेंड्स'ने निर्माण केलेला अवकाश हा अशा मुक्ततेचा अवकाश आहे. माझ्यासाठी आणि इतरही अनेकांसाठी तो नवीन होता. काही वेगळ्या, मजबूत पाया असलेल्या शक्यतांच्या जगात नेणारा होता. मला इतर कशाहीपेक्षा हे जास्त मोलाचं वाटलं. बाकी मग कला, कलेचं प्रयोजन, कलासमीक्षा यावर हजारो पानं आणि परिसंवाद खर्ची पडतच असतात. त्यामुळे ती चर्चा थोडी बाजूला ठेवून, तीस वर्षांपूर्वी जन्मलेल्या आणि नंतर सातत्याने 'क्रिएटिव्ह किक' देणाऱ्या या मालिकेचा कुठलाही एपिसोड कुठूनही पाहायला सुरुवात करत, हातातला प्याला उंचावून फक्त 'टू द फ्रेंड्स!' इतकंच म्हणावंसं वाटतं.
(लोकसत्ता, 'लोकरंग' २९ सप्टेंबर २०२४)