Tuesday, March 24, 2020

बागी का धरम का होत है?

चित्रपट सुरू होतो. संपूर्ण काळा स्क्रीन. 'बेवकूफ और चूतिये में धागेभर का फरक होता है गा भैय्या' हे सैफ अली खानच्या आवाजातलं वाक्य ऐकू येतं. मग सीन सुरू. डोंगरांच्या विस्तीर्ण पार्श्वभूमीवर, एका कड्यावर दोघेजण प्रेक्षकांकडे पाठ करून बसलेले आहेत. पुढचं वाक्य - 'धागे के इंगे बेवकूफ और उंगे चूतिया...और जो धागा हैंच लो तो कौण है बेवकूफ और कौण है चूतिया - करोड रूपये का प्रसन है भैया...'

सिटी प्राइड मल्टिप्लेक्समध्ये रात्री मित्रांबरोबर 'ओंकारा' पाहायला आलेलो असताना स्क्रीनवर हे इथवरचं मी उभ्यानेच पाहिलं. कारण कायतरी गडबड झाली होती आणि आमच्या जागा सापडत नव्हत्या. मग थोड्या वेळाने असा साक्षात्कार झाला की तिकिटं काढायला चुकली आहेत. नक्की काय झालं होतं आठवत नाही. पण स्क्रीनमधून बाहेर यावं लागलं. 'आता काय करायचं?' वगैरे चर्चा सुरू झाली. मित्रांची लग्न झालेली असल्याने ते बहुधा मोक्षापर्यंत पोचले होते. त्यामुळे पहिल्या सीनच्या दर्शनाने आणि पहिला डायलॉग ऐकल्यानंतर माझ्या मनात जी खळबळ उडवली ती त्यांच्या मनात बहुधा उडाली नव्हती. निर्विकारपणे कॉफी प्यायला जायचं ठरलं. म्हणून मग कॉफी प्यायला गेलो. घरी आलो. सकाळी उठल्यावर मी पहिल्यांदा सिटी प्राइड गाठलं. 'ओंकारा' पाहिला. त्यानंतर जीव शांत झाल्याचं लक्षात आलं.

हे २००६ साल होतं. (२००७ साली माझंही लग्न झालं तरी अजून मोक्ष मिळालेला नाही, मिळायला नकोही आहे!) 'ओंकारा'मुळे अभिषेक चौबे हे नाव माहीत झालं. विशाल भारद्वाजबरोबर त्याने 'ओंकारा' लिहिला होता. पुढे विशाल भारद्वाज आणि इतरांबरोबर 'कमीने' लिहिला. 'इश्किया', 'डेढ इश्किया' आणि 'उडता पंजाब' इतरांबरोबर लिहिले. हे तीन त्यानेच दिग्दर्शित केले होते. 'डार्क, पण तरी सिल्व्हर लायनिंग आहे' अशा प्रकारचे हे चित्रपट आवडलेच आणि अभिषेक चौबेची ही स्टाइल आहे (विशाल भारद्वाजच्या जवळ जाणारी) हे लक्षात येऊ लागलं.

मग 'सोनचिडिया' पाहिला आणि मी अभिषेक चौबेचा जवळजवळ जयजयकार केला! 'कॅरॅक्टर बिल्डिंग' म्हणून काहीएक गोष्ट असते. 'कास्टिंग' म्हणून काहीएक गोष्ट असते. 'अभिनय' म्हणून काही एक गोष्ट असते. 'भाषा' म्हणून काहीएक गोष्ट असते. सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे 'चित्रपट करतानाचं गांभीर्य' म्हणून काहीएक गोष्ट असते. 'चित्रपट' ही एक 'समग्र कला' आहे हा अनुभव देणारे जे उत्तम चित्रपट असतात त्यातला एक म्हणजे 'सोनचिडिया'. कुठलीही चांगली कलाकृती हा 'अनुभव' असावा लागतो. आपण 'तिथे गेलो आहोत' 'आपल्यासमोर हे सगळं चाललंय' असा अनुभव. 'सोनचिडिया' तुम्हांला चंबळचं खोरं दाखवतोच, डकैत दाखवतोच, पण तो त्यांची जी कथा सांगतो ती तुम्हांला हलवून सोडते.

चित्रपट एकाच वेळी संथ आणि वेगवान आहे. पण कमाल एंगेजिंग आहे. घटनाक्रमातून हळूहळू गोष्टी उलगडत जातात आणि तुम्ही चित्रपटात 'जाऊन बसता'. हा नुसता 'क्राइम ड्रामा' नाही. हा एक 'प्रोफाउंड ड्रामा ऑफ लाइफ' आहे. 'बागी' झालेले जीव आपली मुक्ती चंबळच्या दऱ्याखोऱ्यात शोधतायत. त्यांनी हातात घेतलेल्या बंदुकांचा ट्रिगर ओढणारे हात फक्त डाकूंचे नाहीत. ते केविलवाण्या माणसांचेही आहेत. 'बागी का धरम का होत है?' 'ये तो बदला हुआ, न्याय कैसे हुआ?' हे प्रश्न इथे एक बागी डाकूच विचारतोय. इथली हिंसा ही हा मूळ ध्वनी नाही, प्रतिध्वनी आहे. आणि म्हणूनच 'सोनचिडिया' हा चित्रपट एक अव्वल आधिभौतिक अनुभव ठरतो. 

पात्रनिवड, अभिनय, कॅमेरा आणि कडक बुंदेली भाषा ही चित्रपटाची काही उल्लेखनीय बलस्थानं आहेत. मनोज वाजपेयीची भूमिका छोटी असली तरी ऑस्करच्या तोडीची आहे. काय अभिनेता आहे हा! 'सहृदय डकैत' मानसिंगची भूमिका त्याने अफाट ताकदीने केलीय. रणवीर शौरीला पाहताना त्याच्या 'तितली'मधल्या भूमिकेची आठवण होते. अत्यंत आक्रमक आणि अत्यंत भावनाशील! रणवीर शौरी भूमिकेला पुरून उरतो. सुशांत सिंग राजपूतने त्याच्या शहरी बाजाला पूर्ण छेद त्याची भूमिका प्रभावीपणे केली आहे. भूमी पेडणेकरला बघताना मला 'उडता पंजाब'मधली आलिया भट आठवत राहिली. पितृसत्ताक पद्धतीने पूर्णपणे कब्जात घेतलेल्या व्यवस्थेत आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याची भयकारी धडपड करणारी स्त्री. भूमी पेडणेकर आणि तिच्याबरोबरची मुलगी यांच्याभोवतीच खरं तर चित्रपटाचा उत्तरार्ध फिरत राहतो. या दोघी चित्रपटाच्या 'स्पिरिच्युअल क्वेस्ट'चा प्रमुख भाग आहेत. मात्र विशाल भारद्वाज आणि अभिषेक चौबेच्या इतर चित्रपटांप्रमाणेच 'सोनचिडिया'चे हीरोज दुय्यम पात्रंही आहेत. मानसिंगच्या गॅंगमधले बागी असोत, निव्वळ डोळ्यांनीच समोरच्याला खाऊन टाकणाऱ्या आशुतोष राणाच्या टीममधले लोक असोत, गावातली इतर पात्रं असोत - 'सोनचिडिया' बिलॉन्ग्ज टू ऑल ऑफ देम! यातल्या फूलन देवीला (चित्रपटात ती 'फुलिया' या तिच्यावर बेतलेल्या पात्राच्या रूपात दिसते) बघून तर मी हात उंचावून टाळ्या वाजवायच्या घाईला आलो होतो! कमाल, कमाल! तिच्या अजिबात ड्रॅमॅटिक नसलेल्या एंट्रीलाही शिट्टीचा मोह होतो!

अनुराग कश्यपचा डार्कनेस हा कंप्लीट डार्कनेस आहे. तो रूथलेस होऊन काही गोष्टी दाखवतो. विशाल भारद्वाजचा डार्कनेस मला मिश्र स्वरूपाचा वाटतो. पण त्यातही असं लक्षात येईल की त्याने शेक्सपियरची जी रूपांतरे केली आहेत त्यात मूळ कथा डार्क असल्याने रूपांतरेही तशी आहेत. पण त्याची मूळ प्रकृती वर लिहिल्याप्रमाणे डार्कनेसला सिल्व्हर लायनिंग देण्याची आहे असं वाटत राहतं. अभिषेक चौबे आणि विशाल भारद्वाज यांच्यात याबाबतीत एक साम्य आहे असं जाणवतं. 'उडता पंजाब'मध्ये जे अनुभवायला मिळतं (कठोर वास्तव आणि तरी दिलासा देणारा शेवट) तेच 'सोनचिडिया'बाबतही होतं.

चित्रपट जरूर पहा. संवाद जरा कान देऊन नीट ऐकायला लागतील, पण ऐका. विशाल भारद्वाजचं संगीत हा एक स्वतंत्र विषयच आहे. 'ओंकारा'मधल्या श्रेया घोषालने गायलेल्या 'ओ साथी रे' सारखंच रेखा भारद्वाजने गायलेलं 'सोनचिडिया' आतमध्ये रेंगाळत राहतं. शूटआउटचे सीन्स, चंबळमधले कोरडेठक्क, रखरखीत, एकाकी पडलेल्या  योग्यासारखे डोंगर, जातिसंस्थेचा विजयी वावर, स्त्रीदास्याची दाहकता, धर्म-बिरादरी-ईश्वर यांची पोलादी पकड - हे सगळंच आतमध्ये रेंगाळत राहतं.

लहानपणी वाचलेल्या गोष्टींमध्ये राजाचा प्राण पोपटात वगैरे असण्याची गोष्ट असायची. 'सोनचिडिया' म्हणजे ज्यात आपला जीव आहे अशी चिमणी आहे आणि जो तो आपापली चिमणी पकडायला धावतोय ही भावना चित्रपट व्यापून उरते. आपल्या प्रत्येकाच्या जगण्याच्या कथेत 'अंतर्द्वंद्व' आणि 'बाह्यद्वंद्व' या दोन गोष्टी असतात. नीट पाहिलं तर यातलं 'बाह्यद्वंद्व' वेगळं असं काही आहे का असा प्रश्न पडतो. पहिलंच सगळं काही आहे असं वाटू लागतं. 'सोनचिडिया' ही या अंतर्द्वंद्वाची कथा आहे. यात बंदुका आहेत. आपल्या बंदुका वेगळ्या आहेत इतकंच.                               
#Sonchidiya
#Zee5

(फेसबुक पोस्ट)

Wednesday, March 18, 2020

'फ्लीबॅग' पाहिल्यावर... 

'कोसला वाचल्यावर' या शीर्षकाचा पु. ल. देशपांडेंचा एक लेख आहे. 'कोसला'मुळे भारून जाऊन त्यांनी तो लिहिला आहे हे वेगळं सांगायला नकोच. (कोसला १९६३ साली प्रकाशित झाली. हा लेख १९९६ सालच्या मौज दिवाळी अंकात आला होता. हे ३३ वर्षांच्या गॅपचं गणित मात्र मला कळलेलं नाही.) कोसला वाचायला सुरूवात केली आणि पांडुरंग सांगवीकर एकदम  दोस्तीत येऊन बोलायला लागला; आम्ही दोघे आरामात पाय पसरून गप्पा मारायला लागलो अशा आशयाचं पुलं लिहितात. 'फ्लीबॅग' आणि 'कोसला' हे कनेक्शन तसं विचित्र वाटेल, पण फ्लीबॅग पाहिल्यापासून 'फ्लीबॅग पाहिल्यावर' अशाच शीर्षकाने काही लिहावंसं वाटू लागलं. कारण फ्लीबॅगसुद्धा पहिल्या एपिसोडच्या पहिल्या फ्रेमपासून सांगवीकरसारखीच दिल खोलके बोलत होती. एकूण २ सीझन्स, १२ एपिसोड्स भडाभडा बोलली आणि मग गप्प झाली. आणि जे बोलली ते उदाहरणार्थ फारच थोर होतं.

फोर्थ वॉल - प्रेक्षक आणि अभिनेत्याच्या दरम्यानची अदृश्य भिंत - ब्रेक करत पात्राने बोलण्याचा माझा पहिला अनुभव 'हाऊस ऑफ कार्ड्स'चा होता. फ्लीबॅग फोर्थ वॉल अधूनमधून ब्रेक करत नाही, तर जवळजवळ तोडूनच टाकते. म्हणजे तुम्ही जवळजवळ तिच्यासमोर टेबलावर बसून तिची वटवट मनोभावे ऐकता. फ्लीबॅग लिहिणारी आणि साकारणारी फीबी वॉलर-ब्रिज आधी एक एकपात्री प्रयोग सादर करायची त्यावर आधारलेली ही मालिका आहे. 'फ्लीबॅग' या विचित्र नावाची ही ब्रिटिश मुलगी आहे. लंडनमध्ये राहते. स्वतःचा कॅफे चालवते. एका घटनेमुळे अपराधभावाने ग्रासलेली आहे. इमोशनली ब्रोकन आहे. सेक्शुअली चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे. गोंधळलेली आहे. काही बाबतीत भलतीच क्लिअरही आहे. तिच्या मोठ्या बहिणीशी तिचं विशेष नातं आहे. वडिलांशी नातं आहे - ते अधेमधेच विशेष होताना दिसतं. तिच्या आयुष्यातले पुरूष लोकोत्तर आहेत. तिचं आणि त्यांच्यातलं डायनॅमिक्स अलौकिक आहे. ती या सगळ्याचबद्दल तुमच्याशी काहीही हातचं राखून न ठेवता बोलते. फ्लीबॅगचं एक वैशिष्ट्य असं की 'ही जरा अंगावर येतेय' असं वाटण्याची क्षमता असणारी ही व्यक्तिरेखा अजिबात अंगावर येत नाही. यू फील ओन्ली लव्ह फॉर हर...ऑल्वेज! तिच्याबद्दल, तिच्या सगळ्या उपद्व्यापांबद्दल, तिच्या भरकटलेपणाबद्दलदेखील तुम्हांला फक्त प्रेमच वाटतं. यात फीबी वॉलर-ब्रिजच्या कमाल अभिनयाचा, स्पाँटेनिटीचा फार मोठा वाटा आहे. फ्लीबॅगसाठी तिला लेखनाबरोबरच अभिनयाचीही अनेक अवॉर्ड्स मिळाली यात नवल नाही. तिच्या बरोबरीने तिची मोठी बहीण क्लेअर (सियान क्लिफर्ड), तिचा नवरा मार्टिन (ब्रेट गेलमन), वडील (बिल पॅटरसन), सावत्र आई (ऑलिव्हिया कोलमन - टेरिफिक!) आणि लास्ट बट नॉट द लीस्ट - फ्लीबॅग अंतिमतः ज्याच्यापाशी स्थिरावते तो प्रीस्ट (अँड्र्यू स्कॉट) यांची कामं उत्तम झालेली असली तरी फीबी ओन्स द शो! मुळात एक असं आहे की फ्लीबॅगसारख्या उत्तम निर्मितीविषयी 'चांगला अभिनय' ही वेगळेपणाने सांगायची गोष्ट राहतच नाही. तीन मिनिटांची भूमिका करणारा अभिनेतादेखील कायम लक्षात राहील असा अभिनय करून जातो. प्रत्येक पात्र काही ना काही वैशिष्ट्ये घेऊन, अत्यंत धारदार लेखणीतून उभं राहिलेलं असल्याने त्या कलाकृतीच्या एकूण 'प्रोजेक्ट'मध्ये आपली जागा उजळून काढतं.

फ्लीबॅग 'बॅड फेमिनिस्ट' आहे हे एक मला जामच आवडलं. ती अजिबात पॉलिटिकली करेक्ट राहायचा प्रयत्न करत नाही. त्या अर्थी ती स्त्रीवादाला न घाबरणारी स्त्री आहे. एका प्रसंगात I sometimes worry that I wouldn't be such a feminist if I had bigger tits हे तिचं म्हणणं मला तरी प्रामाणिकपणे आल्याचं जाणवलं. याचं एक कारण म्हणजे शारीरिक ठेवणीविषयी, शरीरधर्माविषयी आणि अवयवांविषयी या मालिकेत आयडियॉलॉजिकल डीबेटच्या पलीकडे जाऊन बोललं गेलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूने फ्लीबॅगचा एकूण अप्रोच, तिचं मुक्त असणं, गोंधळलेलं असणं, हर्ट झालेलं असणं, झगडत राहणं, नात्यांबाबत प्रयोग करत राहणं यातून ती स्त्रीवादाचा औपचारिक-अनौपचारिक स्वीकार न करताही एक ऑर्गेनिकली ग्रोन आणि तरी लिबरेटेड वुमन म्हणून समोर येते. ती सतत गोष्टी एक्सप्लोअर करते आहे - तिच्या इंपल्सनुसार, बुद्धीनुसार, भावनिक आवेगानुसारही. त्यामुळे ती खरी वाटते आणि तेवढीच पुरेशी वाटते.

भावनिक पातळीवर अस्थिर असलेल्या फ्लीबॅगसाठी सेक्स हा एक अनुभवण्याचा आणि चिंतनाचाही विषय आहे. I'm not obsessed with sex, I just can't stop thinking about it. The performance of it. The awkwardness of it. The drama of it. The moment you realise someone wants your body. Not so much the feeling of it - असं ती म्हणते. मला असं दिसतं की इमोशनली ब्रोकन किंवा एकूण जगण्याबद्दल सिनिकल झालेली किंवा कशातच अर्थ न गवसणारी माणसं सेक्सचा आधार घेत असावीत. It might be working for them because that's the only pleasure/experience that does not pose any further questions. The whole thing is wrapped in the shades of excitement. It is the 'rawness' that works I guess. With the thought of sex and with the act of it, you kind of travel beyond the virtuous debates. इमोशनली ब्रोकन असलेल्या फ्लीबॅगबाबत हे लागू पडेल असं वाटतंही आणि नाहीही. ती सेक्सकडे तिच्या भावनिक दुखावलेपणाला बाजूला ठेवून बघते आहे असं समोर तरी येतं. Moreover, for her, sex doesn't just remain an act of pleasure, it's more of a conversation for her. तिचे जे सेक्शुअल एन्काउंटर्स आहेत त्यामध्ये 'चांगल्या प्रतीच्या सेक्ससाठी उत्सुक असणारी स्त्री' हे ठसठशीतपणे दिसतंच. सेक्शुअल ग्रॅटिफिकेशनच्या चाहुलीने निर्माण झालेली तिची अधीरता ती अजिबात लपवत नाही. आणि दुसऱ्या बाजूने तिची काही पुरूषांची निवड विचित्रही वाटते. All in all, sex purely for the sex's sake अपेक्षिणारी ती स्त्री आहे आणि ते मला अतिशय स्वागतार्ह वाटलं. Sexual promiscuity has been at the receiving end of moral indignation, but I think it certainly doesn't form the basis for moral judgement. Simply because sexual promiscuity does not demean any of the human values.       

भरकटलेलं आयुष्य जगणारी, त्यासाठी स्वतःवर अधेमधे उखडणारी, जगावर उखडूनच असलेली, बहिणीवर माया असणारी आणि मुख्य म्हणजे मनात एक 'दंगल' घेऊन वावरणारी फ्लीबॅग मालिका संपताना प्रेमाचा रस्ता चोखाळते हे पाहून तुम्हांलाच शांत शांत वाटतं. आणि ही मुलगी आता पुढे काय करणार ही शंकाही मनात येते. कारण इतक्या अटिपिकल मालिकेसाठी 'ते फायनली एकत्र येतात' हा शेवट एकदम टिपिकल वाटू शकतो. फ्लीबॅगचा पुढचा सीझन येणार नसल्याचं फीबी वॉलर-ब्रिजने अलीकडेच जाहीर केलं आहे. पण तिने प्रेमात पडलेल्या फ्लीबॅगला चितारण्यासाठी पुन्हा पेन हातात घ्यावं असं वाटतं खरं!

फीबी वॉलर-ब्रिजने कुठल्या धुंदीत ही व्यक्तिरेखा आणि ही मालिका लिहिली कोण जाणे, बट इट गिव्ह्ज यू हेल ऑफ अ किक! आणि फक्त फ्लीबॅगच नाही, तुम्ही इतरही पात्रांच्या - नकारात्मकसुद्धा - प्रेमात पडता. एकुणातच ही वेड्यावाकड्या माणसांची कथा आहे आणि ती तुम्हांला सरळसोट दृष्टी ठेवून बघताच येत नाही. उत्तम लेखन हे सोलून सोलून बारकावे दाखवतं, वाचणाऱ्याचं बोट धरून त्याला वेगवेगळ्या गुहांमधून फिरवून आणतं आणि गोंधळातही  पाडतं. फ्लीबॅग तुम्हांला १२ एपिसोड्समध्ये इतकं काही दाखवते आणि इतकं काही बोलते की तुम्ही ही मालिका पुन्हा पाहिल्याशिवाय राहू शकत नाही. आणि एवढं करूनही तुम्ही या मुलीला चिमटीत पकडू शकत नाही हे तिचं मोठं यश आहे. भालचंद्र नेमाडेंचे शब्द उसने घ्यायचे झाले तर फ्लीबॅग 'सर्वमुक्त. हेमुक्त. तेमुक्त. रंगमुक्त.अंगमुक्त. मनमुक्त. संज्ञामुक्त. मुक्तीमुक्त' आहे.

'नेमाड्यांनी ह्या कादंबरीत सर्व 'स्व' ओतल्यावर त्यांची यापुढली पुस्तके काय नमुन्याची उतरणार कोण जाणे ही पापशंका. कोसला मागे ठेवून हे पाखरू उडाले आहे. आता ते कोण्या देशी जाऊन तिथल्ली वार्ता घेऊन येते ती ऐकायला मी फारफार उत्सुक आहे.' - हा 'कोसला वाचल्यानंतर' या लेखाचा शेवटचा परिच्छेद आहे. हा परिच्छेद फीबी वॉलर-ब्रिज आणि फ्लीबॅग ही दोन नावं टाकून मला बाकी जसाच्या तसा घ्यावासा वाटतो. अर्थात गूगल जगन्नियंता असल्याने फीबी वॉलर-ब्रिज पुढच्या बॉंडपटाची सहलेखिका आहे हे अनेकांना माहिती आहे. तर तिचा जेम्स बॉंड चेझ, अ‍ॅक्शन आणि सिडक्शनबरोबर ब्रोकन माइंड, व्हॅल्यू स्ट्रगल आणि फेमिनिझमच्याही काही लेयर्स ओपन करून दाखवतो का हे पाहायला मी फार फार उत्सुक आहे!

# Fleabag
# Amazon Prime

(फेसबुक पोस्ट)