चित्रपट सुरू होतो. संपूर्ण काळा स्क्रीन. 'बेवकूफ और चूतिये में धागेभर का फरक होता है गा भैय्या' हे सैफ अली खानच्या आवाजातलं वाक्य ऐकू येतं. मग सीन सुरू. डोंगरांच्या विस्तीर्ण पार्श्वभूमीवर, एका कड्यावर दोघेजण प्रेक्षकांकडे पाठ करून बसलेले आहेत. पुढचं वाक्य - 'धागे के इंगे बेवकूफ और उंगे चूतिया...और जो धागा हैंच लो तो कौण है बेवकूफ और कौण है चूतिया - करोड रूपये का प्रसन है भैया...'
सिटी प्राइड मल्टिप्लेक्समध्ये रात्री मित्रांबरोबर 'ओंकारा' पाहायला आलेलो असताना स्क्रीनवर हे इथवरचं मी उभ्यानेच पाहिलं. कारण कायतरी गडबड झाली होती आणि आमच्या जागा सापडत नव्हत्या. मग थोड्या वेळाने असा साक्षात्कार झाला की तिकिटं काढायला चुकली आहेत. नक्की काय झालं होतं आठवत नाही. पण स्क्रीनमधून बाहेर यावं लागलं. 'आता काय करायचं?' वगैरे चर्चा सुरू झाली. मित्रांची लग्न झालेली असल्याने ते बहुधा मोक्षापर्यंत पोचले होते. त्यामुळे पहिल्या सीनच्या दर्शनाने आणि पहिला डायलॉग ऐकल्यानंतर माझ्या मनात जी खळबळ उडवली ती त्यांच्या मनात बहुधा उडाली नव्हती. निर्विकारपणे कॉफी प्यायला जायचं ठरलं. म्हणून मग कॉफी प्यायला गेलो. घरी आलो. सकाळी उठल्यावर मी पहिल्यांदा सिटी प्राइड गाठलं. 'ओंकारा' पाहिला. त्यानंतर जीव शांत झाल्याचं लक्षात आलं.
हे २००६ साल होतं. (२००७ साली माझंही लग्न झालं तरी अजून मोक्ष मिळालेला नाही, मिळायला नकोही आहे!) 'ओंकारा'मुळे अभिषेक चौबे हे नाव माहीत झालं. विशाल भारद्वाजबरोबर त्याने 'ओंकारा' लिहिला होता. पुढे विशाल भारद्वाज आणि इतरांबरोबर 'कमीने' लिहिला. 'इश्किया', 'डेढ इश्किया' आणि 'उडता पंजाब' इतरांबरोबर लिहिले. हे तीन त्यानेच दिग्दर्शित केले होते. 'डार्क, पण तरी सिल्व्हर लायनिंग आहे' अशा प्रकारचे हे चित्रपट आवडलेच आणि अभिषेक चौबेची ही स्टाइल आहे (विशाल भारद्वाजच्या जवळ जाणारी) हे लक्षात येऊ लागलं.
मग 'सोनचिडिया' पाहिला आणि मी अभिषेक चौबेचा जवळजवळ जयजयकार केला! 'कॅरॅक्टर बिल्डिंग' म्हणून काहीएक गोष्ट असते. 'कास्टिंग' म्हणून काहीएक गोष्ट असते. 'अभिनय' म्हणून काही एक गोष्ट असते. 'भाषा' म्हणून काहीएक गोष्ट असते. सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे 'चित्रपट करतानाचं गांभीर्य' म्हणून काहीएक गोष्ट असते. 'चित्रपट' ही एक 'समग्र कला' आहे हा अनुभव देणारे जे उत्तम चित्रपट असतात त्यातला एक म्हणजे 'सोनचिडिया'. कुठलीही चांगली कलाकृती हा 'अनुभव' असावा लागतो. आपण 'तिथे गेलो आहोत' 'आपल्यासमोर हे सगळं चाललंय' असा अनुभव. 'सोनचिडिया' तुम्हांला चंबळचं खोरं दाखवतोच, डकैत दाखवतोच, पण तो त्यांची जी कथा सांगतो ती तुम्हांला हलवून सोडते.
चित्रपट एकाच वेळी संथ आणि वेगवान आहे. पण कमाल एंगेजिंग आहे. घटनाक्रमातून हळूहळू गोष्टी उलगडत जातात आणि तुम्ही चित्रपटात 'जाऊन बसता'. हा नुसता 'क्राइम ड्रामा' नाही. हा एक 'प्रोफाउंड ड्रामा ऑफ लाइफ' आहे. 'बागी' झालेले जीव आपली मुक्ती चंबळच्या दऱ्याखोऱ्यात शोधतायत. त्यांनी हातात घेतलेल्या बंदुकांचा ट्रिगर ओढणारे हात फक्त डाकूंचे नाहीत. ते केविलवाण्या माणसांचेही आहेत. 'बागी का धरम का होत है?' 'ये तो बदला हुआ, न्याय कैसे हुआ?' हे प्रश्न इथे एक बागी डाकूच विचारतोय. इथली हिंसा ही हा मूळ ध्वनी नाही, प्रतिध्वनी आहे. आणि म्हणूनच 'सोनचिडिया' हा चित्रपट एक अव्वल आधिभौतिक अनुभव ठरतो.
पात्रनिवड, अभिनय, कॅमेरा आणि कडक बुंदेली भाषा ही चित्रपटाची काही उल्लेखनीय बलस्थानं आहेत. मनोज वाजपेयीची भूमिका छोटी असली तरी ऑस्करच्या तोडीची आहे. काय अभिनेता आहे हा! 'सहृदय डकैत' मानसिंगची भूमिका त्याने अफाट ताकदीने केलीय. रणवीर शौरीला पाहताना त्याच्या 'तितली'मधल्या भूमिकेची आठवण होते. अत्यंत आक्रमक आणि अत्यंत भावनाशील! रणवीर शौरी भूमिकेला पुरून उरतो. सुशांत सिंग राजपूतने त्याच्या शहरी बाजाला पूर्ण छेद त्याची भूमिका प्रभावीपणे केली आहे. भूमी पेडणेकरला बघताना मला 'उडता पंजाब'मधली आलिया भट आठवत राहिली. पितृसत्ताक पद्धतीने पूर्णपणे कब्जात घेतलेल्या व्यवस्थेत आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याची भयकारी धडपड करणारी स्त्री. भूमी पेडणेकर आणि तिच्याबरोबरची मुलगी यांच्याभोवतीच खरं तर चित्रपटाचा उत्तरार्ध फिरत राहतो. या दोघी चित्रपटाच्या 'स्पिरिच्युअल क्वेस्ट'चा प्रमुख भाग आहेत. मात्र विशाल भारद्वाज आणि अभिषेक चौबेच्या इतर चित्रपटांप्रमाणेच 'सोनचिडिया'चे हीरोज दुय्यम पात्रंही आहेत. मानसिंगच्या गॅंगमधले बागी असोत, निव्वळ डोळ्यांनीच समोरच्याला खाऊन टाकणाऱ्या आशुतोष राणाच्या टीममधले लोक असोत, गावातली इतर पात्रं असोत - 'सोनचिडिया' बिलॉन्ग्ज टू ऑल ऑफ देम! यातल्या फूलन देवीला (चित्रपटात ती 'फुलिया' या तिच्यावर बेतलेल्या पात्राच्या रूपात दिसते) बघून तर मी हात उंचावून टाळ्या वाजवायच्या घाईला आलो होतो! कमाल, कमाल! तिच्या अजिबात ड्रॅमॅटिक नसलेल्या एंट्रीलाही शिट्टीचा मोह होतो!
अनुराग कश्यपचा डार्कनेस हा कंप्लीट डार्कनेस आहे. तो रूथलेस होऊन काही गोष्टी दाखवतो. विशाल भारद्वाजचा डार्कनेस मला मिश्र स्वरूपाचा वाटतो. पण त्यातही असं लक्षात येईल की त्याने शेक्सपियरची जी रूपांतरे केली आहेत त्यात मूळ कथा डार्क असल्याने रूपांतरेही तशी आहेत. पण त्याची मूळ प्रकृती वर लिहिल्याप्रमाणे डार्कनेसला सिल्व्हर लायनिंग देण्याची आहे असं वाटत राहतं. अभिषेक चौबे आणि विशाल भारद्वाज यांच्यात याबाबतीत एक साम्य आहे असं जाणवतं. 'उडता पंजाब'मध्ये जे अनुभवायला मिळतं (कठोर वास्तव आणि तरी दिलासा देणारा शेवट) तेच 'सोनचिडिया'बाबतही होतं.
चित्रपट जरूर पहा. संवाद जरा कान देऊन नीट ऐकायला लागतील, पण ऐका. विशाल भारद्वाजचं संगीत हा एक स्वतंत्र विषयच आहे. 'ओंकारा'मधल्या श्रेया घोषालने गायलेल्या 'ओ साथी रे' सारखंच रेखा भारद्वाजने गायलेलं 'सोनचिडिया' आतमध्ये रेंगाळत राहतं. शूटआउटचे सीन्स, चंबळमधले कोरडेठक्क, रखरखीत, एकाकी पडलेल्या योग्यासारखे डोंगर, जातिसंस्थेचा विजयी वावर, स्त्रीदास्याची दाहकता, धर्म-बिरादरी-ईश्वर यांची पोलादी पकड - हे सगळंच आतमध्ये रेंगाळत राहतं.
लहानपणी वाचलेल्या गोष्टींमध्ये राजाचा प्राण पोपटात वगैरे असण्याची गोष्ट असायची. 'सोनचिडिया' म्हणजे ज्यात आपला जीव आहे अशी चिमणी आहे आणि जो तो आपापली चिमणी पकडायला धावतोय ही भावना चित्रपट व्यापून उरते. आपल्या प्रत्येकाच्या जगण्याच्या कथेत 'अंतर्द्वंद्व' आणि 'बाह्यद्वंद्व' या दोन गोष्टी असतात. नीट पाहिलं तर यातलं 'बाह्यद्वंद्व' वेगळं असं काही आहे का असा प्रश्न पडतो. पहिलंच सगळं काही आहे असं वाटू लागतं. 'सोनचिडिया' ही या अंतर्द्वंद्वाची कथा आहे. यात बंदुका आहेत. आपल्या बंदुका वेगळ्या आहेत इतकंच.
#Sonchidiya
#Sonchidiya
#Zee5
(फेसबुक पोस्ट)
(फेसबुक पोस्ट)