भारतीय चित्रपटाला शंभर वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २०१३ साली बॉम्बे टॉकीज' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात करण जोहर, झोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी आणि अनुराग कश्यप या चार दिग्दर्शकांनी केलेल्या चार शॉर्ट फिल्म्स आहेत. चारही फिल्ममध्ये एक समान सूत्र आहे आणि ते म्हणजे हिंदी सिनेमा. विविध सामाजिक स्तरातील व्यक्तींवर सिनेमाचा प्रभाव किंवा त्यांच्या आयुष्यातील सिनेमाशी जोडलेला एखादा धागा या फिल्म्समधून उलगडतो. 'बॉम्बे टॉकीज' चित्रपट म्हणून मला आवडला असला तरी एक गोष्ट मात्र माझ्या मनात राहिली. चित्रपटांचा समाजावरील प्रभाव वा व्यक्तींचं चित्रपटांशी जोडलेपण याबरोबरच चित्रपटांचा समाजावर नकारात्मक प्रभावदेखील आहे हे विसरता येत नाही. (इथे मला रायगड जिल्ह्यात गेली अनेक वर्षं विविध सामाजिक प्रश्नांवर संघटनात्मक कार्य करणाऱ्या उल्का महाजनांची आठवण होते. एका विषयासंदर्भात लिहिताना त्यांनी हिंदी चित्रपट हा एक फार मोठा प्रॉब्लेम असल्याचं म्हटलं आहे आणि त्यांच्या या म्हणण्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.) त्यामुळे सिनेमाची शंभर वर्षं सेलिब्रेट करताना इतर बाजूही लक्षात घ्याव्या लागतील.
तर सध्याचा विषय दिबाकर बॅनर्जीची कथा. सत्यजित राय यांच्या एका लघुकथेवर आधारित हे रूपांतर आहे. या कथेत आपल्याला दिसतो तो पुरंदर (नवाजुद्दिन सिद्दिकी). मुंबईत आपल्या बायको-मुलीबरोबर राहणारा एक सामान्य माणूस. हा मूळचा सांगलीचा, थिएटर अभिनेता, पण त्यात यश न आलेला आणि आता संसाराच्या चक्रात अडकलेला. त्याची मुलगी आजारी आहे. तिला रोज एखादी गोष्ट सांगून हसवणं हे त्याचं एक मुख्य काम आहे. तो सकाळी घराबाहेर पडून एके ठिकाणी नोकरीसंदर्भात जातो, पण ती जागा आता रिकामी नाही. तो तिथून बाहेर पडतो आणि रस्त्यावर एक शूटिंग चाललंय तिथे घुटमळतो. 'चालताना हीरोचा धक्का लागतो तो माणूस' या दोन मिनिटांच्या शॉटसाठी त्याला विचारण्यात येतं आणि तो तयार होतो. धक्का लागल्यावर म्हणायच्या 'ऎ' या 'संवादा'ची रिहर्सल करण्यासाठी तो तिथल्याच मागच्या एका निवांत ठिकाणी जातो आणि तिथे या फिल्मचा हायलाईट प्रसंग घडतो. त्याच्या दिवास्वप्नात तो सांगलीतील त्याच्या थिएटर गुरूंशी (सदाशिव अमरापूरकर) बोलतो. या संवादातून पुरंदरमधला रिस्क न घेणारा, तळ्यात-मळ्यात करणारा, अभिनेता असलेला पण अभिनयकलेशी 'कमिटेड' नसलेला एक कलाकार आपल्याला दिसतो. 'ऎ' हा एकच शब्द असला तरी जेव्हा तो अभिनित करून म्हणायचा असतो तेव्हा त्यात मेहनत असते हे त्याचे गुरू त्याला सांगतात, त्याला प्रात्यक्षिक दाखवतात आणि नाहीसे होतात.
पुरंदर शॉट देऊन घरी परततो आणि आपल्या मुलीला त्याचा शूटिंगचा अनुभव अभिनित करून दाखवतो. आणि इथे फिल्म संपते.
कोणतीही कला आणि तिचा आविष्कार ही जाता जाता करायची गोष्ट नव्हे, ते 'मेहनती'चं काम आहे आणि चित्रपटातील चकाचौंध, ग्लॅमर याच्या पलीकडे चित्रपट निर्मिती, अभिनय ही मूलतः कलासाधना आहे, गांभीर्याने करायची गोष्ट आहे हे या छोट्याशा गोष्टीतून इतक्या प्रत्ययकारी पद्धतीनं समोर आलं आहे की आपण ते बघताना स्तिमित होतो. एकीकडे अभिनयातील मेहनतीबाबत आग्रही असणारे गुरू आणि त्यांचा हा अस्थिर वृत्तीचा, तुकड्या तुकड्यात आयुष्य जगणारा शिष्य यांच्यातील जुगलबंदी तर खिळवून ठेवणारी आहेच, पण संपूर्ण फिल्मची बांधणी करताना दिबाकर बॅनर्जीने जे बारकावे टिपले आहेत त्याला तोड नाही. दोन दोन मिनिटांच्या भूमिकेतील पात्रांच्या निवडीतील आणि त्यांच्याकडून अभिनय करून घेण्यातील 'मेहनत' या फिल्ममध्ये दिसते.
काही चित्रपट किंवा कधीकधी एखाद्या चित्रपटांतील एखादा प्रसंग, एखाद्या पात्राचा अभिनय कलात्मक आविष्काराची उंची गाठणारा नमुना म्हणून लक्षात राहतो. दिबाकर बॅनर्जीची ही फिल्म याच प्रकारात मोडते. फिल्ममध्ये सदाशिव अमरापूरकर 'कुणी घर देता का घर?' म्हणताना जो स्वर लावतात त्याने अंगावर काटा येतो आणि 'नाटक असं असतं' म्हणणारा नटसम्राट आठवतो. सगळी व्यवासायिक गणितं, पब्लिक डिमांड आणि सुमारसद्दीच्या पलीकडे जाऊन 'सिनेमा असा असतो' म्हणायला लावणारी ही फिल्म आवर्जून बघावी अशी आहे!