'आँखों देखी' हा याच वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट. फारसा कुणाला माहीत असेल असं वाटत नाही. चित्रपटगृहातही त्याचा मुक्काम थोडेच दिवस होता. रजत कपूरचा चित्रपट म्हणून त्याची नोंद मी घेतली होती, पण तो बघितला गेला नव्हता. गेल्या महिन्यात तो पाहिला आणि 'शिप ऑफ थिसियस'नंतर आत्मशोधाच्या प्रक्रियेची मांडणी करणारा आणखी एक अप्रतिम चित्रपट पाहिल्याचं समाधान मिळालं.
दिल्लीतल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाची ही कथा आहे आणि त्या कुटुंबातल्या सर्वात ज्येष्ठ, साधारण पन्नाशीतल्या पुरुषाचा हा 'आत्मशोध' आहे. एकत्र कुटुंबव्यवस्था महत्त्वाची मानणारा हा एक सरळ, मध्यमवर्गीय गृहस्थ. बायको, एक मुलगी, एक मुलगा असं त्याचं कुटुंब. धाकटा भाऊ, त्याची बायको, एक मुलगा असं दुसरं कुटुंब. सगळ्यांचं एकत्र जगणं रीतसर सुरु आहे. आखून दिलेल्या वाटेवरून प्रत्येकजण चालतोय. मात्र एके दिवशी आपल्या कथानायकाला एक जाणीव होते. ती जाणीव आहे सत्याच्या प्रचलित, 'बळजबरीच्या' अस्तित्वाची आणि त्याला छेद देणाऱ्या त्याच्या स्वतःच्या सत्यशोधनाच्या ऊर्मीची. आपण दुसऱ्यांनी सांगितलेल्या कशावरही विश्वास ठेवतो आणि आपली मतं बनवतो, आपल्या डोक्यात हजारो कल्पना कोंबल्या जातात हे त्याला टोचू लागतं. वस्तू हातातून पडली की ती खालीच का पडते याचं सर्वमान्य उत्तर 'गुरुत्वाकर्षण' हे आहे, पण याचं 'माझं' उत्तर काय असायला हवं? - 'वस्तू हातातून सोडली की ती खाली पडते हे सत्य आहे, कारण ते मी बघतो, पण ती खालीच का पडते हे मला माहीत नाही' हे! मंदिरात मिळतो त्याला 'प्रसाद' म्हणतात, पण वस्तुतः तो एक गोड पदार्थ असतो. मला जर तो 'एक गोड पदार्थ' म्हणूनच अनुभवास येतो तर त्याला मी 'प्रसाद' का म्हणू? त्याचं हे तर्कशास्त्र आसपासच्या लोकांना त्याच्याकडे आकर्षित करतं. हा कुणीतरी 'ज्ञानी' माणूस आहे असं त्यांना वाटू लागतं. मात्र तो कुठलंही 'गुरू'पद स्वीकारायचं नाकारतो. मी पाटी कोरी करून नव्याने सगळीकडे पाहतो आहे, 'माझं सत्य' शोधतो आहे, तुम्ही तुमचं शोधा असा त्याचा त्यांना आग्रह असतो.
त्याच्या सत्यशोधनाचा प्रवास चित्रपटात छोट्या-छोट्या, जिवंत प्रसंगांतून, संवादांतून उलगडत जातो. या प्रवासाला चित्रपटात प्रमुख पार्श्वभूमी आहे ती त्याच्या मुलीच्या लग्नाची. मुलीच्या प्रेमप्रकरणाच्या संबंधाने चित्रपट सुरु होतो आणि तिच्या लग्नापाशी संपतो. तिचं प्रेम, लग्न ठरेपर्यंतच्या घटना, लग्नाची गडबड याच्या पार्श्वभूमीवर त्याचा आंतरिक प्रवास सुरु राहतो आणि तो आपल्याला चांगलाच गुंतवून ठेवतो. हा त्याचा आंतरिक प्रवास शेवटी त्याला एका मुक्कामाला नेतो, पण ते प्रत्यक्ष पाहणंच इष्ट. (चित्रपटाची डीव्हीडी फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. बाजारातही असावी.)
चित्रपटातील फ्रेम्स अतिशय जिवंत आहेत. पात्रांची निवड, त्यांचा अभिनय याला विशेष दाद द्यायला हवी. दिल्लीतल्या त्या घरात कॅमेरा लावून ठेवला आहे असं वाटावं इतकं सगळं सहज आहे. कथानायकाचा आत्मशोध आणि इतरजणांचं 'रुटीन', त्यांचं ऐहिकातलं जगणं याची रोचक सांगड घालण्यात रजत कपूर यशस्वी झाला आहे. एक उल्लेख करावाच लागेल तो चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखांचा. 'आदर्श हिंदू' कुटुंबातल्या या आदर्श स्त्रिया आहेत. सतत घरातल्या कुठल्या ना कुठल्या कामात गर्क असलेल्या, नवऱ्याला सकाळी डबा करुन ऑफिसला पाठवणाऱ्या, त्याची न्याहारी होईपर्यंत हातात पाण्याचा ग्लास धरून उभ्या असलेल्या, वटसावित्रीला वडाला फेऱ्या मारणाऱ्या, नवऱ्याच्या मित्रमंडळाला चहा करुन देणाऱ्या स्त्रिया. चित्रपटात कथानायकाच्या मानसिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्याची बायको, मुलगी, त्याच्या भावाची बायको यांचं असं संसारात 'लुप्त' झालेलं दर्शन ठसठशीतपणे समोर येतं. कुठलाही मूल्यसंघर्ष, संरचनात्मक संघर्ष उपस्थित न करता, लग्न-कुटुंब ही कार्यात्मक (फंक्शनल) व्यवस्था आहे आणि ती जपायला हवी या विचाराने, 'श्रमविभागणी' या दृष्टीने कामात असणाऱ्या या स्त्रिया बघताना मला काहीतरी वेगळं वाटत होतं. काय ते सांगता येत नाही, पण मौज वाटत होती. माझ्या स्त्रीवादी दृष्टीकोनातला एक कोन प्रश्नांकित रुपात वर आल्यासारखं काहीतरी. असो.
'प्रश्न विचारणारे' चित्रपट फार कमी असतात. 'आँखों देखी' असा चित्रपट आहे. रजत कपूरने चित्रपट लिहिताना आणि दिग्दर्शित करताना तात्विक आणि आधिभौतिक दोघांची उत्तम जोड दिली आहे. संजय मिश्रा याचा मुख्य भूमिकेतला अभिनय लाजवाब. जी कलाकृती स्वतः प्रश्न विचारते, तुम्हाला प्रश्नात टाकते, तुमच्या आकलनाचं पेज 'रिफ्रेश' करायला लावते तिचं स्थान वेगळं असतं. 'आँखों देखी' असा अनुभव देतो. 'मी कोण आहे?' हा माणसाला पडलेला पुरातन प्रश्न आहे, पण 'सत्य काय आहे?' हा मला एक 'उत्क्रांत झालेला' प्रश्न वाटतो. या प्रश्नाचा आपल्या परीने शोध घेणाऱ्याची ही कथा आवर्जून बघावी अशी आहे. माध्यमांचा, माहितीचा भडिमार होत असताना शांतपणे, प्रत्यक्ष अनुभवाला प्राधान्य देत आपल्या धारणा नक्की करणं गरजेचं झालेल्या अस्वस्थ वर्तमानात तर हा चित्रपट फारच सुसंगत ठरतो!