Friday, July 11, 2014

मोनालिसा बियाँड स्माईल

'मोनालिसा स्माईल' हा माईक नेवेल या दिग्दर्शकाचा २००३ साली प्रदर्शित झालेला चित्रपट. 'फोर वेडिंग्ज अँड अ फ्यूनरल' या गाजलेल्या ब्रिटिश चित्रपटाचा हा दिग्दर्शक. 'मोनालिसा स्माईल'च्या केंद्रस्थानी एक गुरू आणि तिच्या शिष्या आहेत आणि त्यांच्यातील संघर्ष चित्रपटाची एक मुख्य बाजू आहे. कॅथरीन वॉटसन (ज्युलिया रॉबर्ट्स) ही कॅलिफोर्निया विद्यापीठातून 'कलेचा इतिहास' या विषयात पदवी घेतलेली तरूणी मॅसेच्युसेट्समधील वेलस्ली कॉलेजमध्ये याच विषयाची शिक्षिका म्हणून रूजू होते. वेलस्ली कॉलेज हे परंपरा जपणारं 'आधुनिक' कॉलेज आहे. तिथे मुलींना सर्व प्रकारचं शिक्षण दिलं जातं, पण अंतिम उद्देश 'उत्तम गृहिणी' तयार करणं हाच आहे. कॅथरीन स्वतंत्र विचारांची कलाशिक्षक आहे. ती मुलींना अभ्यासक्रमाबाहेरील चित्रकारांची, सौंदर्याच्या रूढ व्याख्येत न बसणाऱ्या त्यांच्या चित्रांची ओळख करून देऊ लागते आणि तिच्या शिकवण्याच्या दिशेबाबत तिचे आणि तिच्या एका विद्यार्थिनीचे -  बेटी वॉरेनचे (कर्स्टन डंस्ट) खटके उडू लागतात. बेटी अभिजन वर्गाची प्रतिनिधी आहे, परंपराप्रिय आहे आणि तिच्या कलाविषयक भूमिका ठाम आहेत. एकूणातच 'जे आहे ते कायम ठेवण्याकडे' तिचा कल आहे. कॅथरीन वयाच्या तिसाव्या वर्षीही अविवाहित आहे यावर तिचा विशेष रोष आहे. कॉलेजच्या वर्तमानपत्रातून ती कॅथरीनवर हल्ला चढवते आणि गुरू शिष्येचं नातं बिघडू लागतं. 

बेटीच्या तीन मैत्रिणी कॅथरीनच्या जवळ येतात. मुलींनी लग्न करावं पण ते सर्वस्व आहे असं मानू नये, लग्नापलिकडे स्वतःचा शोध घ्यावा हे कॅथरीन मुलींच्या मनावर ठसवायचा प्रयत्न करते. या तिघींपैकी एक - जोन - हुशार आहे. तिला वकील व्हायचं आहे, पण तिने आपल्या आवडत्या पुरूषाबरोबर लग्न करून संसार थाटणं पसंत केलं आहे. तिने पुढे शिकावं असा कॅथरीनचा आग्रह आहे. यावर जोन 'गृहिणी ही जणू काही एक निर्बुद्ध माणूस आहे, गृहिणी किंवा आई होण्याला प्राधान्य देणं कमीपणाचं आहे असं तुला का वाटतं?' असा प्रश्न विचारते तेव्हा कॅथरीन निरूत्तर होते आणि तिला शुभेच्छा देऊन थांबते. 

लग्नाकरता उत्सुक असणाऱ्या बेटीचं लग्न होतं, पण नवऱ्याचं अफ़ेअर सुरू आहे हे कळल्यावर ती कोसळून पडते. तिची आई पारंपरिक पद्धतीने 'काहीही झालं तरी आता तो तुझा नवरा आहे, त्याचं घर हेच तुझं घर' असं सांगते तेव्हा तिचा कॅथरीनबद्दलचा दृष्टिकोन बदलू लागतो. वेलस्ली कॉलेजसारख्या ठिकाणी आपण फार काळ राहू शकणार नाही हे लक्षात आल्यावर कॅथरीन तिथून निघायचं ठरवते तेव्हा तिला निरोप देताना बेटी, जोन आणि इतर दोघी आपापल्या सायकलींवरून तिच्या टॅक्सीची सोबत करतात. बेटीचं अखेरचं संपादकीय कॅथरीनबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारं असतं. 

'मोनालिसा स्माईल'बद्दल खरं तर समीक्षकांचा नकारात्मक सूर होता. १९५० च्या दशकाचं अधिक प्रत्ययकारी चित्रण चित्रपटातून व्हायला हवं होतं असं काहींचं मत पडलं. ज्युलिया रॉबर्ट्सने समरसून काम केलेलं नाही असंही काहींचं मत होतं. पण हा चित्रपट काही मूलभूत मुद्द्यांना स्पर्श करतो हे खरं. मुख्य म्हणजे गुरू आणि शिष्य हे नातं अगदी मानवी पातळीवर समोर येतं. शिक्षकाचं स्थान असाधारण खरंच, पण शिक्षकदेखील त्याच्या अंतर्मनातील झगड्यांमध्ये सापडलेला असतो, प्रसंगी त्याचे विद्यार्थीच त्याला आव्हान देतात हे या नात्याला वेगळं परिमाण देतं. परंपरा आणि नवता यातला संघर्ष सततच सुरू आहे. पण कळीचा प्रश्न हा की जगण्याचं श्रेयस कशात आहे यावर आपल्यात एकवाक्यता होऊ शकते का? 

कॅथरीन तिच्या भूमिकेवर ठाम आहे आणि व्यक्तीच्या (इथे स्त्रीच्या) अभ्युदयाच्या व्यक्तीकेंद्रित दृष्टीने तिचा विचार योग्यच आहे. मात्र परंपरेकडून तिला मिळालेल्या आव्हानापुढे ती शेवटी हार मानते. अर्थात त्याला हार तरी कसं म्हणायचं? नोकरी टिकवण्याकरता तिने समझोता केला असता तर ती हार ठरली असती. कॅथरीन आपला मार्ग सोडत नाही आणि आपल्या विद्यार्थिनींनाही नवा मार्ग दाखवते. स्त्रीच्या आत्मभानाबद्दल, तिच्या स्वातंत्र्याबद्दल बोलत असताना स्त्रीच्या स्वतंत्र विचाराला आणि तिने लग्नसंस्थेला आव्हान देण्याला केंद्रीय महत्त्व आहे. 'उंबरठा' चित्रपटातली सुलभा महाजन त्यामुळेच मला आश्वासक वाटते. कारण प्रस्थापित रचनेतील दोषांची उत्तरं त्या रचनेच्या बाहेर पडल्याशिवाय मिळत नाहीत. (आईन्स्टाईन म्हणतो तसं - The significant problems we face cannot be solved at the same level of thinking we were at when we created them.) माणसाची 'सहजीवनाची आस' जर केंद्रस्थानी आहे तर लग्न करणं, न करणं यातील चूक-बरोबर निकालात निघतं. कॅथरीन वॉटसन किंवा सुलभा महाजन जेव्हा वेगळी वाट शोधू पाहतात तेव्हा त्याचं स्वागत करणं आणि एका व्यक्तीच्या अस्तित्वाला त्या व्यक्तीच्या मनाजोगा अर्थ देण्याच्या प्रयत्नात ती वाट सुकर होईल, एका नवीन रचनेकडे नेईल यासाठी आपल्या परीनं प्रयत्न करणं हे सगळ्यांचंच काम आहे. प्रयोगाला न घाबरणं हे मला वाटतं निर्भीड आणि घट्ट मुळं असतील तरच जमू शकतं. मोनालिसाच्या स्माईलचा अर्थ लावण्याच्या प्रयत्नातली कॅथरीन अशीच आहे. व्यक्ती म्हणूनही आणि शिक्षक म्हणूनही. पुस्तकाबरहुकूम शिकवणं, शिकणं हे व्यवस्थेचा भाग म्हणून ठीकच, पण आपला मनोविकास पुस्तक मिटल्यावर आपण काय करतो त्याच्यावरही अवलंबून असतो!  

(दिव्य मराठी, मधुरिमा)