काही चित्रपट रूतून बसतात. पार्टी मी पहिल्यांदा पाहिला तेव्हा ते आजपर्यंत - रूतून बसला आहे. सिनेमॅटोग्राफर म्हणून १९७३-७४ पासून काम करणाऱ्या गोविंद निहलानी यांचा दिग्दर्शक म्हणून हा चौथा चित्रपट. त्यांच्या गाजलेल्या 'अर्धसत्य'नंतर एका वर्षाने, १९८४ साली प्रदर्शित झालेला. मुळात 'पार्टी' हे महेश एलकुंचवारांचं नाटक. या चित्रपटाची संवाद आणि पटकथाही त्यांचीच.
ही पार्टी चाललीय दमयंती राणे (विजया मेहता) यांच्या घरात.
दिवाकर बर्वे (मनोहर सिंग) या ज्येष्ठ लेखकाला भारत सरकारतर्फे साहित्याचं पारितोषिक
जाहीर झालं आहे आणि त्यांच्या सन्मानार्थ दमयंतीबाईंनी ही पार्टी आयोजित केली आहे.
पार्टीत साहित्य, नाटक, पत्रकारिता अशा क्षेत्रातील नामवंत मंडळी हळूहळू
येऊ लागली आहेत. दमयंती राणे म्हणजे मुंबईतील कला आणि सामाजिक सर्कलमधलं एक प्रस्थ
आहे आणि त्यांच्या घरची पार्टी ही समस्त कलाकार मंडळींसाठी तशी नित्याची बाब आहे.
पार्टीसाठी जे येत आहेत त्यात एक श्रीमंत कम्युनिस्ट स्त्री
आहे, एक होतकरू लेखक आहे, एक व्यावसायिक नाटकांचा लेखक आहे, एका इंग्लिश
मासिकाची संपादक आहे, रंगभूमीवरचा एक यशस्वी नट आहे आणि इतरही लोक आहेत.
पार्टीच्या सुरूवातीपासूनच या व्यक्तिरेखा उलगडत जातात. त्यांच्या धारणा आणि
त्यांचे मुखवट्याआडचे चेहरे दिसू लागतात. त्यांच्यात संवाद होतोय, वाद होतोय आणि
त्यातूनही आपल्याला त्यांच्याबद्दल कळतंय. त्यांच्या गप्पांतून कलाविषयक चर्चा
होतेय आणि सामाजिक प्रश्नही पुढे येतायत. त्यांचं व्यक्तिगत दुःखही दिसतंय आणि
त्यांचे परस्परसंबंध, जे प्रेम, द्वेष, ओढ अशा मानवी
भावनांवरच आधारलेले आहेत, दिसत आहेत. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून की
काय पण या प्रतिभावान, बुद्धिमान माणसांचं एक काहीसं अगतिक रूप आपल्यासमोर
येतंय.
या रंगलेल्या चर्चेत एक उल्लेख येतो तो अमृतचा. अमृत
(नसीरूद्दीन शहा) हा मुळात कवी, पण सध्या आदिवासी भागात सरकार आणि भांडवलशहांच्या
दडपशाहीविरुद्ध आंदोलन करतोय. त्याचा पत्रकार मित्र अविनाश (ओम पुरी) पार्टीच्या
शेवटाकडे हजर होतो आणि अमृतची बातमी आणतो. एका हल्ल्यात अमृत थोडा जखमी झाला आहे
आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेतो आहे हे उपस्थितांना समजतं. अमृतच्या एका कवितेच्या
सादरीकरणातून कला आणि जीवन हा वाद सुरू होतो. कलाकार राजकीयदृष्ट्या कमिटेड नसेल
तर त्याची कला रिलेव्हंट नाही असं मत अविनाश मांडतो. कलेची आराधना करताना एकाच
माणसामध्ये 'माणूस' आणि 'कलाकार' अशा दोन ओळखी तयार
होतात आणि दोन वेगळ्या नैतिक बांधीलकी तयार होऊ शकतात या मुद्द्याला उत्तर देताना
अविनाश कळीचा प्रश्न पुढे आणतो - माणसातला माणूस आणि कलाकार केव्हा ना केव्हा
एकमेकांसमोर उभे ठाकतात आणि एकाच प्रश्नाचं उत्तर शोधू लागतात. अशा वेळी निर्णय
घ्यावा लागतो की तुम्हाला कलाकार म्हणून जगायचं आहे की माणूस म्हणून?
हा प्रश्न अनुत्तरित सोडून चित्रपट शेवटाकडे येतो आणि फोनवर
बातमी येते की अमृतची हत्या झालेली आहे.
पार्टी संपते. सगळे घराकडे परत निघतात. पण कला आणि मानवी
अस्तित्वाच्या प्रयोजनाबद्दलचे अविनाशने उपस्थित केलेले प्रश्न आणि अमृतची आठवण
मात्र सगळ्यांच्या विचारपटलावर त्रासदायकरित्या पसरून राहिली आहे.
पार्टी हा असाधारण चित्रपट आहे. महेश एलकुंचवारांनी अतिशय
मूलगामी चिंतन या कथेतून पुढे आणलं आहे. एक व्यामिश्र अशी समाजव्यवस्था आणि त्याचे
भाग असणारे आपण. आपला यातला रोल कुठला? सभोवती रण माजलेलं असताना
आपण आपल्या स्थानावरच पक्कं राहायचं की न्याय हे अंतिम तत्त्व मानून रणात उडी
घ्यायची? पार्टी बघावा कारण तो प्रश्न विचारतो. आणि अवघड प्रश्न विचारतो. आपण कुठे आहोत
आणि आपण कुठे असलं पाहिजे असे अडचणीत आणणारे हे प्रश्न आहेत. प्रस्थापित
व्यवस्थेतल्या धुरीणांचे खरे आणि सामान्य चेहरे पार्टी समोर आणतो, पण आपण स्वतःला
त्याच लोकांमध्ये बघू लागतो कारण थोड्या-बहुत फरकाने आपण सगळेच असहाय आणि
परिस्थितीनुरूप आकार घेणारे असतो. त्यामुळे पार्टीतील कुठल्याच पात्राचा राग येत
नाही, ते पात्र एका क्षणी ढोंगी, सामान्य वाटलं तरी. मूलभूत प्रश्न विचारणारा 'पार्टी' प्रस्थापिततेची, सोप्या भूमिकांची
चिकित्सा करतो, पण अगदी तटस्थपणे.
उत्तम कलाकृती 'डिस्टर्ब' करणारी असते. पार्टी
हे चांगलंच डिस्टर्बिंग प्रकरण आहे. त्यात एका मानवीय अशा आंतरिक कोलाहलाचा
आविष्कार आहे आणि दुसरीकडे या आंतरिक कोलाहलावर प्रश्नचिन्हही आहे. अमरीश पुरी, दीपा साही, शफी इनामदार, रोहिणी हट्टंगडी, आकाश खुराना, के.के. रैना आणि इतर
अनेक कसलेल्या कलाकारांची टीम पार्टीला जिवंत करते. आणि बहुधा आपल्यालाही.
चित्रपट किती कोटींचा धंदा करतो यावर त्याची गुणवत्ता ठरण्याच्या काळात शांत, गंभीर आणि आंतरिक सूर लावणाऱ्या 'पार्टी'चे शोज मल्टीप्लेक्समधून मुद्दाम व्हावेत!
(दिव्य मराठी, मधुरिमा)