'एनीवन कॅन कुक' हे घोषवाक्य असलेला
गुस्ताव हा पॅरिसमधला एक नामवंत शेफ. अंतोन इगो हा पॅरिसमधला एक प्रख्यात 'फूड क्रिटिक' - अन्न समीक्षक. गुस्तावच्या घोषवाक्याशी असहमत असणारा. त्याच्या एका नकारात्मक
लेखामुळे 'गुस्ताव्ज' या रेस्टॉरंटचे 'रेटिंग' घसरते आणि त्या
धक्क्याने गुस्ताव मरण पावतो. दुसरीकडे आहे आपला कथानायक - रेमी. रेमी हा उंदीर
आपल्या टोळीबरोबर राहतोय, पण त्याचं वेड आहे स्वयंपाक. बाकीचे सगळे भाईबंद
काहीही, कसंही, कुठेही खायला उत्सुक असताना रेमीला आस आहे ती निगुतीने अन्न
शिजवून खाण्याची. रेमी अपघाताने एकदा 'गुस्ताव्ज'मध्ये पोचतो आणि
तिथे त्याला दिसतो लिंग्विनी. कुमारवयातला हा गोंधळलेला पण सरळ मनाचा मुलगा या
रेस्टॉरंटमध्ये सफाईचं काम करायला रूजू झालेला आहे. त्याच्याकडून एकदा किचनमध्ये
शिजत असलेल्या सूपचं भांडं पडतं आणि सूप सांडल्यामुळे तो काहीतरी करून ते
सुधारायचा प्रयत्न करू लागतो. रेमीच्या ते लक्षात येतं आणि तो सूप 'दुरूस्त' करतो. (हे सगळं
वाचताना विचित्र वाटत असेल कदाचित, पण ते चित्रपटात जरूर पाहा. कल्पनाशक्तीची झेप
म्हणजे काय आणि तिचं एकसंध, प्रभावी सादरीकरण कसं करायचं याचं 'रॅटाटुई' इतर अनेक अॅनिमेशनपटांसारखंच
उत्तम उदाहरण आहे!) लिंग्विनी सूप करतो आहे म्हणून चिडलेला स्किनर ('गुस्ताव्ज'चा सध्याचा मालक आणि
चीफ शेफ) जेव्हा ते सूप एका अन्न समीक्षकाला, जी जेवायला तिथे आली आहे, खूप आवडतं तेव्हा
अचंभित होतो. 'गारबेज बॉय' लिंग्विनी सूप करतो आहे म्हणून चिडलेला स्किनर
कॉलेटच्या (किचनमधली एकमेव स्त्री शेफ) आग्रहामुळे लिंग्विनीला काढून न टाकता
त्याला किचनमध्ये सामील करून घेतो.
यानंतर सुरू होतो लिंग्विनी आणि रेमी यांचा 'किचनप्रवास'. तो कसा होतो, शेवटी अंतोन इगो एका उंदराने केलेल्या 'रॅटाटुई' या फ्रेंच डिशमुळे
अवाक होऊन 'एनीवन कॅन कुक' मान्य कसं करतो हे प्रत्यक्ष
बघण्यातच मजा आहे.
'द आयर्न जायंट' आणि 'इन्क्रेडीबल्स' या चित्रपटांचा
दिग्दर्शक ब्रॅड बर्ड याचा हा तिसरा चित्रपट. रातातुयबद्दल सांगावं असं पुष्कळ
काही असलं तरी त्यातला हायलाईट म्हणता येईल अशी एक गोष्ट,
जी चित्रपटाचं सारच
आहे, ती म्हणजे अंतोन इगोचं चित्रपटाच्या अखेरचं कला, कलाकार आणि समीक्षक यांच्याविषयीचं
स्वगत. आपण कल्पनाही करू शकत नव्हतो अशा एका जिवाकडून आपल्या आईच्या हातच्या 'रातातुय'ची आठवण करून देणारं
रातातुय खायला मिळाल्यावर इगो
समीक्षक म्हणून आपल्या ताठर भूमिकेवर पुनर्विचार करतो. नवीन काहीतरी करण्याची
ऊर्मी असलेला कलाकार, आपल्या निर्मितीतून बोलणारा कलाकार आणि कसलीही
रिस्क न घेता फक्त कलाकृतींची चिरफाड करणारा समीक्षक यात अखेरीस निर्मितीक्षम
कलाकारच महत्त्वाचा ठरतो हे इगो मान्य करतो.
मुळात कलानिर्मिती ही कशातही आणि मुख्य म्हणजे 'कोणा एकात' बांधून ठेवता येत
नाही. निर्मिती एकीकडे सुरू असते, तिची ओढ असलेले जातिवंत निर्माते त्यात रमलेले
असतात, धडपडत असतात आणि ती अस्सल आहे की टाकाऊ, तिचे दृश्य-अदृश्य परिणाम
याची चर्चा दुसरीकडे सुरू असते. समीक्षेचं एक महत्त्व नक्कीच आहे, पण मुद्दा हा की
समीक्षा कलानिर्मितीवर भारी पडतेय का? आणि तसं होत असेल तर तिथे चिंतेला
जागा आहे!
रंग, स्वाद, गंध याची ओढ लागलेल्या एका
उंदराची स्वयंपाक करण्याची 'प्रोसेस', त्याच्या सगळ्या मोहक
हालचाली, त्याने आणि लिंग्विनीने मिळून केलेला स्वयंपाक हे पाहत असताना किंवा पिक्सार, डिस्ने, ड्रीमवर्क्स यांचे
कुठलेही चित्रपट पाहत असताना जाणवतं की प्रत्यक्षात हे काहीच शक्य नाही हे
आपल्याला कळतंय, पण चित्रपटाचे कर्ते या कल्पित दुनियेत नेऊन जे दाखवत आहेत
ते आवडतंय, ते भन्नाट आहे आणि ते आपल्याला वेगळ्या सजीवाच्या
स्थानावरून माणसाला विचारात पाडणारं भाष्य करत आहेत. त्यामुळे 'रातातुय ' किंवा इतर चित्रपट
बघत असताना मला अल्बर्ट आईन्स्टाईनचं एक प्रसिद्ध विधान सारखं आठवतं – ‘इमॅजिनेशन इज इंटेलिजंस हॅविंग फन!’
…आणि या 'फन'मधून अवचित जे गवसत आलं आहे त्याने मी कायमच भारून जात आलो आहे! कारण ते
कधीकधी वस्तुनिष्ठ विचार करूनही गवसत नाही!
(दिव्य मराठी, मधुरिमा)