कॉलेजमधलं एखादं लेक्चर बंक करून, त्याबद्दल अपराधीभाव बाळगत, सिनेमा बघायचं जे वय असतं त्या वयात मी 'कथा दोन गणपतरावांची' हा चित्रपट बघितला होता. मात्र हा चित्रपट लेक्चर बंक करून पाहिला नव्हता, तर पुण्यातल्या 'नॅशनल फिल्म अर्काइव्हज'मध्ये रीतसर बघितला होता. हा चित्रपट तेव्हा तर मला आवडला होताच, पण दहा-पंधरा वर्षांनी जेव्हा तो परत पाहिला तेव्हा तर तो अधिकच आवडू लागला. कारण माणसाचे मनोव्यापार आणि त्यातून घडणारे-बिघडणारे मानवी संबंध याचा प्रत्यक्षातला अनुभवही थोडा अधिक परिपक्व झाला होता.
अरुण खोपकर हे कलाक्षेत्रातलं भारदस्त नाव. 'कथा दोन गणपतरावांची' हा त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट म्हणजे 'स्टोरीटेलिंग'चा वस्तुपाठ तर आहेच, पण 'स्टोरी ट्रीटमेंट'चा आणि अभिनयाचादेखील वस्तुपाठ आहे. निकोलाय गोगोलच्या 'इव्हान निकिफोरोविचबरोबर इव्हान इव्हानोव्हीच'कसा भांडला याची कथा' यावर आधारित हा चित्रपट. अक्कडगाव या काल्पनिक गावात घडणारी ही कथा. गणपतराव मोरे पाटील (मोहन आगाशे) आणि गणपतराव तुरे पाटील (दिलीप प्रभावळकर) या दोन जिवलग मित्रांची ही गोष्ट. सोबतीला गावातली इतर नमुनेदार माणसं आहेतच, पण कथेचे नायक हे दोघे. आणि कथेचा विषय म्हणजे त्यांची अतूट मैत्री आणि या मैत्रीला गेलेला तडा.
पाश्चात्त्य राहणीमानाचा प्रभाव असणारे तुरे पाटील आणि संपूर्ण देशी मोरे पाटील हे दोघे लहानपणापासूनचे मित्र. दोघांनीही लग्न केलेलं नाही. तुरे पाटील शिडशिडीत बांध्याचे, नीटनेटके, शिस्तीला महत्त्व देणारे, काहीसे धूर्त आणि चलाख. मोरे पाटील म्हणजे अगदी अघळपघळ गडी. साधे सरळ आणि आळशी. पण दोघांमधली मैत्री मात्र विशेषच. गावाच्या चर्चेचा विषय असणारी. आई-वडील आपल्या मुलांना उदाहरण देतात अशी मैत्री. एकदा तुरे पाटील मोरे पाटलांच्या घरातली एक जुनी तलवार बघतात आणि तिच्या मोहात पडतात. मोरे पाटलांची ती 'खानदानी' तलवार. तुरे पाटलांनी 'नाहीतरी तुझ्या घरी ती ट्रंकेतच पडून आहे, त्यापेक्षा मला दे, मी काळजी घेईन' असं आर्जव करूनही मोरे पाटील काही बधत नाहीत. त्यात त्यांना चिथवायला मदत होते ती आत्याबाईंची. (उत्तरा बावकरांनी साकारलेली ही व्यक्तिरेखा केवळ लाजवाब!) तुरे पाटील तलवारीच्या मोबदल्यात काही देऊन 'मैत्री नाही तर नाही, व्यवहारच करू' असाही प्रयत्न करून बघतात. पण यश येत नाही. वितुष्ट मात्र येतं. आणि ते चांगलंच गंभीर रूप घेतं.
आता दोन्ही पाटील एकमेकांना भेटणं तर सोडाच, एकमेकांकडे पाहायलाही तयार नसतात. मैत्रभाव संपतो आणि अस्सल मानवी द्वेषभाव डोकं वर काढतो. मग एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न सुरू होतात. एका टप्प्यावर दोघांची दिलजमाई होतेही, पण ती क्षणापुरतीच. आधीचं उसवलेलं काही शिवून निघत नाही आणि दोघे दोस्त कोर्टाच्या चकरा मारू लागतात. मैत्रीचा एक निखळ अध्याय संपतो.
चित्रपटाबाबत पुष्कळ बोलण्यासारखं असलं तरी दोन गोष्टी खास सांगायच्या आहेत. एक म्हणजे मोहन आगाशे आणि दिलीप प्रभावळकर काय ताकदीचे अभिनेते आहेत हे पहायचं असेल किंवा अगदी 'अभिनय म्हणजे काय?' हे शिकायचं असेल तरी हा चित्रपट बघावा. पु. ल. देशपांडे दिलीप प्रभावळकरांबाबत 'असा आर्टिस्ट तिकडे हॉलिवूडमध्ये असता तर त्याने रान पेटवलं असतं' असं एकदा म्हणाले होते. त्याची खात्रीच पटते! मोहन आगाशे ही काय चीज आहे हेही वेगळं सांगायची गरज नाही. 'बेगम बर्वे' आणि 'घाशीराम कोतवाल'मधून प्रेक्षकांची विकेट घेणारे आगाशे इथेही अभिनयाचा जो मानदंड समोर ठेवतात त्याला तोड नाही. या दोघा कसलेल्या अभिनेत्यांची जुगलबंदी या चित्रपटाला अफाट उंचीवर नेऊन ठेवते.
दुसरं म्हणजे एखाद्या वस्तूची अभिलाषा आपल्याला काय काय गमवायला लावते याचा प्रत्यय हा चित्रपट देतो. एका वस्तूसाठी तुरे पाटील हट्ट धरतात, तो ताणतात आणि पुढे मग हा हट्ट मैत्रीच्याही डोक्यावर बसतो! आता ती तलवार मोरे पाटलांच्याही उपयोगाला येत नव्हती हे खरं, पण ती अगदी 'जीवनावश्यक' गोष्टसुद्धा नव्हतीच. अशावेळी अभिलाषा सोडायची की मैत्री? वस्तूच्या लालसेपायी माणसात विकार प्रवेश करतो आणि बघता बघता त्याच्या नियंत्रणाबाहेर जात त्याच्याही नकळत तो त्या माणसावर कसा राज्य गाजवू लागतो हे या चित्रपटात दिसतं. एखाद्या क्षुल्लक गोष्टीमार्फत सूक्ष्मपणे माणसात हा कली कसा शिरतो आणि हसत्या खेळत्या नात्याची कशी धूळधाण करतो हे बघणं चकित करतं, उदास करतं आणि महत्त्वाचं म्हणजे काही कानपिचक्याही देऊन जातं.
दोन गणपतरावांची ही गोष्ट मी कधीही बघू शकतो. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर आणि इतरही सगळ्यांच्या अभिनयासाठी, शांता गोखले यांच्या बांधीव पटकथेसाठी, सतीश आळेकरांच्या संवादासाठी आणि अरुण खोपकरांचा कॅमेऱ्यामागचा डोळा आणि दिग्दर्शकीय दृष्टी जे 'दर्शन' घडवते त्यासाठी!