प्रास्ताविक
सिनेमा हा एक अत्यंत प्रभावी कलाप्रकार आहे. (मी स्वतः
सिनेमाचा मोठा चाहता आहे हेही सांगून टाकतो!). सिनेमाने
जगभरातल्या लोकांवर गारुड करूनही आता बराच काळ लोटला. आज हे माध्यम फारच 'उत्क्रांत' झालं आहे.
सिनेमाचं मुख्य वैशिष्ट्य हे की इथे अनेकविध कला एकत्र येतात. कथा लिहिण्यापासून
सुरुवात होते आणि मग पात्रयोजना, अभिनय, छायाचित्रण, संवादलेखन, गीतलेखन, संगीत, ध्वनी, संकलन, इतर तांत्रिक बाजू आणि या माध्यमाचा सर्वात महत्त्वाचा भाग
- दृश्य मांडणी – यांचे विविध आविष्कार एकत्र बांधून एक सलग कलाकृती आपल्यासमोर येते. या माध्यमाने
आज इतकी तांत्रिक प्रगती केली आहे की सिनेमातून एक प्रतिसृष्टी निर्माण होऊ शकते. हॉलीवूडचे
काही चित्रपट, मालिका याची साक्ष देतात. लेखक, कवी, चित्रकार म्हणून काम करणाऱ्या जवळजवळ प्रत्येकाला आपण
एखादा सिनेमा केला पाहिजे किंवा एखाद्या सिनेमाचा भाग बनलं पाहिजे
असं वाटत असतं. सिनेमाबद्दल बरंच काही बोलता येईल. बोललं जातंही. बासु चॅटर्जी किंवा हृषीकेश मुखर्जी यांच्यासारख्या
दिग्दर्शकांच्या एखादी साधी-सुंदर कथा सांगणाऱ्या सिनेमापासून ते गुन्हेगारी जगाचं
दाहक चित्रण करणाऱ्या एखाद्या सिनेमापर्यंत, एखाद्या
संगीतिकेपासून एखाद्या 'सीरियल किलर'च्या कथेपर्यंत सिनेमाच्या पडद्यावर अनेक इंप्रेशन्स उमटत
जातात आणि प्रेक्षकाला उल्हसित, रोमांचित, भयचकित करत राहतात.
मात्र सिनेमाबाबत आणखी एक गोष्ट आहे. सिनेमा हा एक
कलाप्रकार असला तरी 'सिनेमामुळे मुलं बिघडतात' हा एक तक्रारीचा सूर बरेचदा ऐकायला मिळतो. माझ्या लहानपणी, म्हणजे ऐंशी, नव्वदच्या दशकात
हा सूर बहुधा जास्त कानावर पडत असे. आज मोबाइल आणि ओटीटीमुळे सिनेमा एका वेगळ्या प्रतलावर पोचला आहे. 'सिनेमा बिघडवतो' हा अंतःस्वर कुठे
कुठे जागा असला तरी सिनेमाचा प्रभाव फक्त तरुणांपुरता मर्यादित राहिलेला नाही.
सिनेमाचा आस्वाद घेण्यासाठी सगळ्याच पिढ्या
पुढे सरसावल्याने तो अंतःस्वर तसा क्षीण झाला आहे.
याला सिनेमात झालेला गुणात्मक बदलही कारणीभूत आहेच. नवा सिनेमा अधिक 'खरा', अधिक अस्वस्थ करणारा, अधिक सर्वस्पर्शी
आहे. नायक-नायिका-खलनायक हा पारंपरिक साचा मोडून सशक्त, गुंतागुंतीच्या, चौकटीत न
बसणाऱ्या व्यक्तिरेखा, त्यांचे परस्परसंबंध आता पडद्यावर येत
आहेत. ठरीव रेषेवर चालण्यापेक्षा वेगळीकडे, आडवाटेकडे धाव घेणारी कथासूत्रे सादर होत आहेत. ओटीटीने वेगळ्या धाटणीच्या
सिनेमांसाठी एक अवकाश खुला केला आहे. तिथली व्यावसायिक वा इतर गणितं जमली नाहीत तर
यूट्यूबसारखा पर्याय उपलब्ध आहे. फीचर फिल्म नाही तर वेब सीरिज, छोटे व्हिडिओज, वेगळे दृकश्राव्य प्रयोग करणं शक्य होत आहे.
दुसऱ्या बाजूला सोशल मीडिया हाताशी असल्याने सिनेमाबद्दल
सर्वसामान्य प्रेक्षकांकडून पुष्कळ लिहिलं-बोललं जातंय. त्यातून वादही होतायत!
अमुक सिनेमा आवडला/आवडला नाही हा आज मोठ्या, घनघोर फेसबुक
चर्चेचा विषय होऊ शकतो. कधीकधी तर कलास्वादाच्या 'अपेक्षांची दोरी' सिनेमा बघणं आणि त्यावर मतप्रदर्शन करणं हे जणू आपलं
कर्तव्य आहे इथपर्यंतही खेचली जाताना दिसते. मोजकी माध्यमं असणारा, 'कंटेंट'चं 'राउंड द क्लॉक' वैपुल्य नसणारा
काळ आणि आजचा काळ यात एक ठळक फरक आहे. त्यातून माध्यमं आणि अभिव्यक्ती समाजमानसावर
किती दूरगामी परिणाम करतात याची साक्ष पटते.
'अॅनिमल' या नुकत्याच
प्रदर्शित झालेल्या सिनेमाभोवती जे वादंग निर्माण झालं त्याबद्दल बोलायच्या आधी
वरील प्रास्ताविक करणं गरजेचं वाटलं कारण सिनेमा, प्रेक्षक आणि काळ
हा 'कॉन्टेक्स्ट' लक्षात घेणं
आवश्यक वाटलं. आता 'अॅनिमल'कडे येऊ.
चित्रपट : 'स्टोरीटेलिंग' आणि प्रबोधन
'अॅनिमल'चा दिग्दर्शक
संदीप रेड्डी वंगा याने दिग्दर्शित केलेला 'अर्जुन रेड्डी' (तेलुगू) आणि त्यानेच दिग्दर्शित केलेला या चित्रपटाचा हिंदी
रीमेक 'कबीर सिंग' हे दोन्ही
चित्रपट त्यातील नायकाच्या वादग्रस्त चित्रणामुळे गाजले होते. स्त्रीवादी दृष्टीने
पाहता तर हे चित्रपट फारच आक्षेपार्ह आहेत. 'अॅनिमल'बाबत जो आक्षेप घेतला गेला त्यातही सिनेमातील स्त्री
पात्रांचं चित्रण आणि नायकाचा त्यांच्याबद्दलचा – कदाचित एकूण स्त्रियांबद्दलचा - दृष्टिकोन यावर आक्षेप घेतला गेला
आहे. दुसऱ्या बाजूने पाहता अनेकांना हे चित्रण त्या 'व्यक्तिरेखे'चं चित्रण आहे
म्हणून फारसं आक्षेपार्ह वाटलेलं नाही. मला स्वतःला विचार करताना असं जाणवतं की
अशा चित्रणाबाबत मला 'बायनरी' (इकडे किंवा
तिकडे) भूमिका घेणं अवघड जातं; पण चित्रपटाचा
समाजमानसावर परिणाम होतो हे लक्षात घेता 'चित्रपट आस्वादक' आणि 'समाजाचा घटक' यात संतुलन साधत शेवटी
‘समाजाच्या घटका’ला झुकतं माप देणंही गरजेचं वाटतं.

चित्रपट हे 'कथा सांगण्याचं
माध्यम' आहे. ते समाजप्रबोधनाचं माध्यम नाही. त्यातून
समाजप्रबोधन होऊ शकतं, ते व्हायला काहीच
हरकत नाही; पण चित्रपटावर त्याची सक्ती
करणं वाजवी नाही या भूमिकेशी मी सहमत आहे. दुसरं असं की सगळेच चित्रपट समाजप्रबोधन करत नसले तरी सहसा काही संकेत पाळलेच जातात. 'सज्जनांचा विजय आणि दुर्जनांची हार' हे सूत्र चित्रपटांमधून एकेकाळी फार सरधोपटपणे वापरले जाई.
खलनायक पूर्ण 'ब्लॅक' तर नायक पूर्ण 'व्हाइट' असे. आज
खलप्रवृत्तीचं चित्रण अधिक गुंतागुंतीचं, अधिक 'मानवी' होऊ लागलेलं असलं, माणसात खलप्रवृत्ती तयार होण्याची काही कारणं आहेत हे
चित्रित होऊ लागलं असलं तरी 'अंतिम विजय
सत्प्रवृत्तीचाच होतो' या गाभ्याला धक्का लागलेला नाही. वास्तववादी, 'डार्क' चित्रपट तयार होत
असले तरी चांगुलपणा, न्याय, सहिष्णुता, सकारात्मकता, कुटुंबव्यवस्थेतून
आलेली मूल्ये, एकूण नैतिकतेच्या कल्पना यांना उचलूनच धरलं जातं. हे
संकेत पाळायचं कारण काय? तर निर्माता-दिग्दर्शकांना
मूलभूत, मूल्यात्मक पायाला धक्का लागता कामा नये ही जाणीव
असते. चित्रपट 'डार्क' असला तरी त्याने
आशेचे सगळेच किरण विझवता कामा नयेत हा विचार जागा असतो. यात निव्वळ वैचारिकता आहे
असंही नाही. प्रेक्षकांना चित्रपट आवडायला हवा या साध्या-सरळ व्यावसायिक
दृष्टीमुळेही हे घडतं. चित्रपट पाहून प्रेक्षकांना सकारात्मक वाटावं, भावनिकदृष्ट्या त्यांना उचंबळून यावं, चित्रपटाचे दोन-तीन तास काहीही घडलं तरी शेवट गोड व्हावा या
हेतूनेच मुख्य प्रवाहातील बहुतेक चित्रपट तयार होतात. प्रखर वास्तववादी
चित्रपटांनी हे संकेत तंतोतंत पाळले नाहीत तरी आधी
म्हटल्याप्रमाणे मूलभूत संकेत सर्वस्वी नाकारले जात नाहीत.
चित्रपटांवर प्रबोधनाची सक्ती नाही हे कदाचित काहींना मान्य
होणार नाही. पण सध्या आपण तो मुद्दा बाजूला ठेवू. कारण त्यावर वेगळी चर्चा होऊ
शकेल. सक्ती नाही हे मान्य केलं आणि कबीर सिंग किंवा अॅनिमलसारख्या चित्रपटांकडे
पाहिलं तरी त्यातील काहीच खटकत नाही असं नाही. फक्त मला असं दिसतं की या
व्यक्तिरेखा मुळातच सरळसोट नाही आहेत. त्यांचं 'कॅरॅक्टर स्केच' समजून घ्यायला जड जात असल्याने बहुधा आपण त्याला एक लेबल
लावतो. हे नायक 'टॉक्सिक' आहेत असं म्हटलं
तरी दुसरीकडे त्यांची प्रेयसी/बायकोबाबतची हळवी बाजूही आहे.
'अॅनिमल'चा नायक आपल्या
विवाहित बहिणीला स्वतंत्र विचार करायला प्रोत्साहित करतो. आता याला कुणी
लेखक-दिग्दर्शकाची चलाखी म्हणेल; पण एखाद्या
कथेच्या चौकटीत त्यातील प्रमुख व्यक्तिरेखांचं वर्तन आपल्याला मूल्यात्मकदृष्ट्या
पटण्याजोगं वाटलं नाही तरी व्यक्तिरेखा म्हणून ती असं वर्तन करू शकते हे समजून
घ्यायला आपली हरकत नसावी. तिच्या वर्तनात सातत्य आहे की विरोधाभास जाणवतो हा
मुद्दा जरूर आहे. पण व्यक्तिरेखा आदर्श असायला हवी असा अट्टाहास धरता येत नाही.
इथे आपण काही तुलना करून पाहू.
'आक्षेपार्ह काय' हा निर्णय आहे, निष्कर्ष नव्हे
'गॉडफादर' हे चित्रपटाच्या
इतिहासातील एक अतिशय गाजलेलं नाव आहे. 'क्लासिक' समजल्या जाणाऱ्या या सिनेमाने किती दिग्दर्शकांना प्रभावित
केलं, त्याच्या कथेची किती वेगवेगळी व्हर्जन्स निघाली याची
गणतीच नाही. जगभरातल्या समीक्षकांनी, सिनेरसिकांनी हा
चित्रपट उचलून धरला आहे. आता गॉडफादर ही वास्तविक गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या
कुटुंबाची कथा आहे. डॉन कॉर्लिऑन आणि त्याचा सर्वात धाकटा मुलगा मायकेल हे दोघे
चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहेत. ज्याला 'रिग्रेसिव्ह' म्हणता येईल असं चित्रण सिनेमात आहे.
'डू यू स्पेंड टाइम विथ युअर फॅमिली? बिकॉज अ मॅन हू डझन्ट स्पेंड टाइम विथ हिज फॅमिली कॅन
नेव्हर बी अ रिअल मॅन' असं म्हणणारा डॉन कॉर्लिऑन एका प्रसंगात 'विमेन अँड चिल्ड्रेन कॅन अफोर्ड टू बी केअरलेस, बट नॉट मेन' असंही म्हणतो.
मायकेल आणि त्याची बायको वेगळे राहू लागल्यानंतर मायकेल मुलांना स्वतःकडे ठेवतो. आईपासून
वेगळं करतो. एका प्रसंगात तो तिच्यावर हातही टाकतो. असं असूनही गॉडफादर हा एक
श्रेष्ठ सिनेमा समजला जातो. मार्टिन स्कॉर्सीससारख्या दिग्दर्शकाचे काही चित्रपटही
पुरुषकेंद्री आणि 'पुरुषी' वर्तनाला 'अनअपॉलॉजेटिकली' चितारणारे आहेत
असं दिसतं. अर्थात यापैकी कुठल्याच चित्रपटात लैंगिक दुर्वर्तनाचं/गुन्हेगारीचं
समर्थन केलेलं नाही. त्याअर्थी त्यातील पुरुष हे 'गुड मेन' आहेत. (आपल्याकडे 'प्यार का पंचनामा' या पुरुषकेंद्री सिनेमातही सुरुवातीलाच एका छोट्या सीनमध्ये
चित्रपटाचे नायक अशा वर्तनाच्या विरुद्ध आहेत असं सूचित केलं आहे). हिंदी सिनेमाचा
विचार केला तर नायकाने नायिकेचं प्रेम मिळवण्यासाठी तिच्या मागे लागण्यापासून इतर
अनेक प्रकारातून रिग्रेसिव्ह वर्तनाचं चित्रण केलेलं दिसतं. 'बाजीगर'मध्ये शाहरुख
खानने अँटी हीरो साकारला आहे. त्यात तो जेव्हा आपला 'सूडाचा प्लॅन' साध्य करण्यासाठी
शिल्पा शेट्टीबरोबर प्रेमाचं नाटक करून तिचा खून करतो तेव्हा त्याला रिग्रेसिव्ह
म्हणायचं की अँटी हिरोइक यावर चर्चा होऊ शकते. डर, अंजाम या
चित्रपटांमधून त्याने 'ऑब्सेसिव्ह लव्हर'च्या ज्या भूमिका
केल्या त्याही गाजल्या आहेत. एआयबी या इंटरनेट मीडिया कंपनीने मागे रिचा चड्ढा या
अभिनेत्रीला घेऊन 'हरॅसमेंट थ्रू द एजेस' या शीर्षकाचा एक
व्हिडीओ केला होता. तो इंटरनेटवर उपलब्ध आहे. नायकाने नायिकेच्या 'मागे’ लागण्याचं हिंदी सिनेमाने
किती ग्लोरिफिकेशन केलं यावर हा व्हिडीओ आहे.
थोडक्यात सांगायचं तर अशा प्रकारचं, आक्षेपार्ह वाटेल असं चित्रण सिनेमातून होत असतं. आता होतं
असं की ते चित्रण आपल्याला आक्षेपार्ह वाटतंय की 'जस्टिफायेबल' वाटतंय याचा निर्णय आपण आपले ठोकताळे लावून करत असतो.
त्यासाठी कुठलंही 'रुल बुक' नाही. (अर्थात
छापील पुस्तक नसलं तरी मूल्यात्मक निर्णय देऊ शकणारं एक पुस्तक आपल्या डोक्यात
असावं अशी आशा करायला हरकत नाही). आणखी एक मुद्दाही जाणवतो. 'नावडतीचं मीठ अळणी' या छोट्याशा
म्हणीतून स्पष्ट केलेला तो एक मोठा मानसशास्त्रीय मुद्दा आहे. शाहरूख खान, अल पॅसिनो हे अभिनेते आपल्याला आवडतात. त्यामुळे
त्यांच्याकडून स्क्रीनवर काही वावगं झालं तर आपण त्यांना माफ करू शकतो. किंवा ते
अपवादात्मक आहे असं म्हणू शकतो. इथून पुढे जात आपण तर्कसंगती लावूनही काही निर्णय
देतो. उदा. 'गॉडफादर'सारख्या
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कुटुंबातील पुरूषांचं चित्रण बघताना आपण ते गुन्हेगारी
पार्श्वभूमीचे आहेत असं म्हणून त्या चित्रणाला काहीशी सूट देतो. अमुक पात्राचं
वर्तन त्या विशिष्ट कथेच्या चौकटीत बघताना ते 'लार्जर
आयडियॉलॉजिकल सेन्स'ने पाहता चुकीचं असलं तरी त्या पात्राच्या
व्यक्तिमत्वाच्या कक्षेत, त्या कथेच्या कक्षेत ते ठीक आहे, पटण्यासारखं आहे असं आपण म्हणतो. (आता इथे गुन्हेगारी
पार्श्वभूमीच्या लोकांचं चित्रण करावं का, त्यातून त्यांचं
ग्लोरिफिकेशन केलं जातं ते योग्य नाही असेही मुद्दे निघतील. सध्या ते नोंदवून पुढे
जाऊ). थोडक्यात आपण स्क्रीनवर जे पाहतो आहोत ते आपल्याला 'कन्व्हिन्सिंग' वाटतंय की नाही
असा निकष आपण लावतो आणि तो योग्य आहे असं मला वाटतं. (एकाला जे कन्व्हिन्सिंग
वाटेल ते दुसऱ्याला नाही हे पुन्हा आहेच. पण ते असो.)
कबीर सिंग, अॅनिमल
यासारख्या चित्रपटांबाबत मला असं दिसतं की 'लार्जर आयडियॉलॉजिकल
सेन्स'ने पाहता ते चित्रण आक्षेपार्ह असलं तरी आपल्याला
ज्याचे मार्ग आवडत नाहीत असं एखादं पात्र निर्माण होऊ शकतं आणि जोवर त्या
आक्षेपार्ह वर्तनाला शब्दांमधून जस्टिफाय करण्याचा प्रयत्न होत नाहीये तोवर ठीक
आहे. कारण 'आयडियॉलॉजिकल करेक्टनेस' हा एक आदर्श आहे आणि चित्रपटांमधून निर्माण होणारी पात्रं
कायम तो बाळगूनच वागतील अशी अपेक्षा करणं योग्य होणार नाही. चित्रपट ही कथा आहे
आणि कथेमध्ये गुंतागुंतीची, रिग्रेसिव्ह-प्रोग्रेसिव्ह सगळ्याच प्रकारच्या
वृत्तीची पात्र असू शकतात. मुख्य पात्राने पुरोगामित्वाच्या सर्व निकषांवर
टिकमार्क करत जात 'संपूर्ण पुरोगामी' असावं असाही
आग्रह धरू नये. कारण ती एक कथा आहे. कथा पुरोगामी किंवा प्रतिगामी
नसेलच असं नाही; पण तिचं प्रथम ‘कथा असण्याचं’ स्वतंत्र्य आपण मान्य करायला हवं
आणि तिचं मूल्यमापन कथेच्या निकषांवर करायला हवं.
'अॅनिमल'ची अडचण
चित्रपटाचा विचार कथा म्हणून
केला तरी त्यातून प्रतीत होणारा विचार जर प्रतिगामी आणि म्हणून आक्षेपार्ह वाटला,
त्यात ‘प्रोपगंडा’ जाणवला तर ती मात्र गंभीर गोष्ट आहे. 'अॅनिमल' च्या बाबतीत
संदीप रेड्डी वंगाने हा घोळ नक्कीच घातला आहे. 'कबीर सिंग'लाही कदाचित पूर्ण सूट देता येणार नाही; पण 'अॅनिमल' त्याच्या बराच
पुढे जातो. व्यक्तिशः मला संदीप रेड्डी
वंगा हा दिग्दर्शक 'स्टोरीटेलर' म्हणून प्रभावी वाटतो.
तो आणखी काही इंटरेस्टिंग करू शकेलही; पण आत्ता तरी तो 'पारंपरिक
पुरूषत्वा'च्या प्रेमात पडून त्याचं उदात्तीकरण करत चालला आहे
असं दिसतं. चित्रपट समीक्षक भारद्वाज रंगनने अॅनिमलची समीक्षा करताना 'एक्झिलरेटिंग रॉनेस' (रोमांचित करणारा
ओबडधोबडपणा) असा शब्द वापरला आहे. (हिंदी सिनेमाबाबत बोलायचं झालं तर रामगोपाल
वर्माचे सुरुवातीचे चित्रपट, अनुराग कश्यपचे
चित्रपट यांनी जो 'एक्झिलरेटिंग रॉनेस' दिला तो नक्कीच
जास्त खोल आणि 'लार्जर आयडियॉलॉजिकल सेन्स'ला फार धक्का न लावता दिला आहे).
'अॅनिमल' च्या कथेबाबत, सादरीकरणाबाबत मला काही गोष्टी पटल्या नाहीत. पण आपली चर्चा
मूल्यात्मक अंगाने सुरु असल्याने त्या सध्या बाजूला ठेवू. एक मुख्य मुद्दा असा की
चित्रपट पाहताना तुम्हाला जर 'पुरूषांची लढाई'च दाखवायची आहे तर मग तीच फक्त नीट का नाही दाखवत असा
प्रश्न पडला. त्याच्या जोडीला स्त्री-पुरुष संबंधावरचं भाष्य आणत आपल्या भूमिकेचं
समर्थन करण्याची कसरत कशासाठी? कबीर सिंगवरील
टीकेमुळे ही अतिरिक्त काळजी घेतली की काय असं वाटायला पुष्कळ वाव आहे.
स्त्री-पुरुष नातं 'इंटेन्स', पण पुरुषाच्या
बाजूने झुकलेलं, पुरूषाच्या 'व्ह्यू पॉइंट'ने दाखवलेलं असल्याने होतं असं की या नात्याला दोन बाजू
आहेत, 'ड्युएल इम्पॉर्टन्स' आहे हे विसरलं
जातं. नाही म्हणायला चित्रपटात नायिकेला (रश्मिका मंदाना) एक भला मोठा संवाद दिला
आहे; पण हे फक्त बोलण्यापुरतं असणार आहे, एकदा यांचं हे बोलणं झालं की नंतर तो हातात बंदूक घेऊन
बाहेर पडणारच आहे तर थेट तिथेच का नाही जात असं काहीतरी वाटत राहतं!
ही 'जस्टिफिकेशन'ची, दोन डगरींवर पाय ठेवण्याची कसरत सिनेमाला मारक ठरली आहे.
तुम्हांला जर एक हिंसक सूडपट करायचा आहे तर तो करा. त्यात 'आयडियॉलॉजिकल डिबेट' आणण्याचं काय
कारण? (सहसा अशा हिंसक सिनेमांमध्ये स्त्री पात्रं
नावापुरतीच असतात; कारण त्या सिनेमाची जातकुळीच तशी असते. पण मग ते
परडवलं असं म्हणावं लागेल. निदान तिथे अती बोलून घोळ तरी घालत नाहीत! आता अशा सिनेमांबद्दल एकूण काय बोलावं हा
आणखी वेगळा मुद्दा). 'अॅनिमल'च्या नायकाने काही गोष्टींना तात्त्विक मुलामा देणं
ही एक गंभीर गोष्ट आहे. तो जेव्हा आदिम काळातील स्त्री-पुरुष संबंधांबद्दल बोलतो
आणि 'अल्फा मेल'चा उल्लेख करतो
तेव्हा आज आपण तिथून किती पुढे आलो आहोत हे त्याच्या गावी नसतं. अटळ जीवशास्त्रीय
संदर्भात काही गोष्टी बदलत नाहीत हे खरं आहे, 'बायॉलॉजी'ला हात घातल्याशिवाय 'आयडियॉलॉजी' जिंकणार नाही हे माझंही मत आहे. पण म्हणून 'बायॉलॉजी इज द अल्टिमेट एक्स्प्लनेशन' असं जर कुणी म्हणालं तर ती मोठीच अडचण आहे! 'पुरूषा'ला 'प्रेझेंट' करणं ही एक गोष्ट
झाली - जी वर उल्लेख केलेल्या इतर दिग्दर्शकांनीही केली आहे - पण 'पुरूषा'ला सतत बरोबर
ठरवण्याचा प्रयत्न करणं ही वेगळी गोष्ट आहे. असं सातत्याने करत राहिलं तर ते आर्टिस्टिक
न राहता पॉलिटिकल होतं आहे असं वाटतं. मला वाटतं याबाबत संदीप रेड्डी वंगा
दिग्दर्शक म्हणून 'डेंजर झोन'मध्ये आहे. आता
इथून तरी त्याने परत फिरावं! 'सॅडली, इट्स अ मॅन्स वर्ल्ड' असं वाक्य 'अॅनिमल'च्या नायकाच्या
तोंडी आहे. दिग्दर्शकाने या 'सॅडली'चा धांडोळा आपल्या पुढच्या सिनेमात घ्यायला हरकत नाही!
संदर्भ : भारतीय प्रेक्षक
सामाजिक संदर्भ, सामाजिक महत्त्व
असणाऱ्या एखाद्या विषयावर जगात सर्वत्र एकाच पद्धतीने विचार करता येत नाही. विविध
समाजांची घडण, त्यांची समज, साधारण स्वभाव
यानुसार विचार बदलावा लागतो. सिनेमा हा कलाप्रकार पाश्चात्त्य जगतात जन्माला आला, रुजला आणि वाढला. तिथे तो अधिक प्रगल्भ अवस्थेत आहे.
तिथल्या समाजात आणि आशियाई, विशेषतः भारतीय समाजात सिनेमाबाबत समजुतीचे जे फरक
आहेत त्याच्या मुळाशी हा एक मुख्य फरक आहे. सरासरी पाश्चात्त्य प्रेक्षक हा थोडा
अधिक प्रगल्भ प्रेक्षक आहे. तो वेगवेगळे चित्रपट हाताळू शकतो आणि चित्रपटांना
थिएटरमध्ये ठेवून घरी येऊ शकतो. आणि जर सिनेमाच्या प्रभावाखाली त्याच्याकडून काही
आगळीक घडलीच तर तिथली कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणा ते हाताळायला सक्षम आहे.
भारतासारख्या देशातला सरासरी प्रेक्षक हा असा प्रगल्भ प्रेक्षक नाही. पाश्चात्त्य
सिनेमातून किती वैविध्यपूर्ण विषय किती प्रगल्भतेने हाताळले गेले आहेत ते पाहता
इथल्या प्रेक्षकाला अचंबा वाटेल, कदाचित घेरी येईल, हे मी माझ्या पाश्चात्त्य
सिनेमाच्या अनुभवावरून सांगू शकतो. आपलं मानस अद्याप अशा 'मॅच्युअर थीम्स'साठी तयार नाही.
सिनेमाबाबत आपण अजूनही 'व्हल्नरेबल' आहोत. वर उल्लेख
केलेल्या मार्टिन स्कॉर्सीस या नामांकित दिग्दर्शकाचा 'द वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट' नावाचा एक
चित्रपट आहे. हा चित्रपट पाहिला तर आपल्या प्रेक्षकांना वर म्हटलं तसं घेरी येऊ
शकेल. शेअर बाजारात झपाट्याने वर चढलेल्या आणि घोटाळे केल्यामुळे उतरणीला
लागलेल्या जॉर्डन बेलफोर्ट या न्यू यॉर्कमधील एका स्टॉक ब्रोकरच्या आयुष्यावर
बेतलेला हा सिनेमा आहे. संपूर्ण चित्रपटात पैसा, लैंगिक व्यवहार, ड्रग्ज यांचं मुक्त चित्रण आहे. या चित्रपटाला पाच ऑस्कर नामांकनं
होती.

ऑस्कर मिळालं नाही; पण चित्रपटाला ऑस्कर नामांकनं मिळाली हे पुरेसं बोलकं
आहे. आपल्याला असं दिसेल की एक अगदी वेगळं, आपल्या
प्रस्थापित नैतिक कल्पनांना धक्का देईल असं जग सिनेमातून निर्माण करण्याची
सृजनशक्ती हॉलिवूडच्या चित्रपट निर्मात्यांकडे आहे आणि त्या जगाकडे सिनेमा म्हणून
पाहण्याची समज तिथल्या प्रेक्षकांकडे आहे. सिनेमा पाहताना त्यांचा निकष 'सांगितली जाणारी कथा सिनेमा म्हणून माझ्यातल्या सुजाण
प्रेक्षकाला बांधून ठेवते आहे का?' हा असतो.
कथेमध्ये येणारे लैंगिक वा इतर संदर्भ पूरक असतात. ते ‘निकष’ नसतात. दुसरं म्हणजे
मार्टिन स्कॉर्सीससारखे दिग्दर्शक जेव्हा पुरुषकेंद्री
चित्रपट तयार करतात तेव्हा त्यांची पात्रं आपलं 'कॅरॅक्टर' सोडून आयडियॉलॉजिकल चर्चेच्या फंदात पडत नाहीत. कारण त्या
चर्चेची ती जागाच नाही. त्या संदर्भात वेगळे चित्रपट तयार होऊ शकतात आणि होतातही. 'अॅनिमल'सारख्या
चित्रपटातून घातले जाणारे घोळ तिथे घातले जात नाहीत.
'पेज थ्री'चं प्रस्थ जेव्हा
वाढत चाललं होतं त्यावेळी बोलताना माझी एक मैत्रीण म्हणाली होती की पेज थ्री ही
जागा पार्ट्या, सेलिब्रिटी गॉसिप इ. गोष्टींकरताच राखीव आहे.
त्यामुळे त्याचा बाऊ करण्यात अर्थ नाही. वृत्तपत्राच्या संपादकीय पानावरील मजकूर
कसा आहे, बातम्या कशा दिल्या जातात यावरून त्या वृत्तपत्राचा
दर्जा जोखावा लागतो. त्यामुळे वृत्तपत्राची समीक्षा संपादकीय आणि बातम्यांवरून
व्हावी. पेज थ्री वरून नव्हे. तिच्या म्हणण्यात मला तथ्य वाटलं होतं. पण परत
मुद्दा असा आहे की पेज थ्री असल्याने लोक त्या पानावर जास्त प्रमाणात जात असतील
आणि संपादकीय पानाकडे दुर्लक्ष करत असतील तर काय करायचं? त्यामुळे मला वाटतं 'अॅनिमल'सारखे चित्रपट भारतीय प्रेक्षकांच्या संदर्भात धोकादायक ठरू
शकतात. चित्रपटाचं नावच 'अॅनिमल' आहे. त्यातून
चित्रपटाचा सूर काय असेल, कथानायक कसा असेल हे ध्वनित होतं. हा चित्रपट ‘चांगले संस्कार’ करण्यासाठी काढलेला नाही हे स्पष्ट होतं. चित्रपट पाहताना
ही 'अॅनिमल चौकट’ लक्षात
घेऊन पाहणं अपेक्षित आहे. अडचण अशी आहे की इथला प्रेक्षक चौकटीच्या आत घुसून
स्वतःच 'अॅनिमल' होऊ पाहील अशी
भीती वाटते. त्यामुळे 'अॅनिमल' हा 'सिनेमॅटिक प्रश्न’ म्हणून फार मोठा नाही; पण समाजशास्त्रीय प्रश्न म्हणून मोठा आहे!
- मिळून साऱ्याजणी, फेब्रुवारी २०२४